‘रफायल’ विमानांचा दुसरा ताफा भारतात दाखल

दुसरा ताफाजामनगर – फ्रान्सकडून भारताने खरेदी केलेल्या ‘रफायल’ विमानांचा दुसरा ताफा बुधवारी भारतात दाखल झाला. फ्रान्समधून कुठेही न थांबता ही विमाने गुजरातमधील जामनगर येथील वायुसेनेच्या तळावर उतरली. याआधी जुलै महिन्याच्या अखेरीस फ्रान्सने पाच ‘रफायल’ विमानांचा पहिला ताफा भारताच्या स्वाधीन केला होता आणि १० दिवसातच ही लढाऊ विमाने वायुसेनेच्या ताफ्यात दाखल झाली होती. याद्वारे चीनला सामरिक संदेश देण्यात आला होता. रफायल विमानाचा वायुसेनेत समावेश उचित वेळी झाल्याचे वायुसेनाप्रमुख म्हणाले होते.

दुसरा ताफातीन ‘रफायल’ विमानांचा ताफा फ्रान्समधून निघाल्यावर कुठेही न थांबता सलग उड्डाण करीत थेट जामनगरच्या वायुसेनेच्या तळावर उतरला. वायुसेनेकडून याबाबत माहिती जाहीर करण्यात आली. याद्वारे या अतिप्रगत लढाऊ विमानांनी आपली क्षमताही दाखवून दिली आहे. या ताफ्याबरोबर फ्रान्सची हवेतील हवेत इंधन भरणारी रिफ्युलिंग विमानेही होती. फ्रान्समधून रफायल आणण्यासाठी वायुसेनेच्या वैमानिकांचे एक पथक फ्रान्सला गेले होते व या वैमानिकांना फ्रान्समधील डिजियर एअरबेसवर यासाठी विशेष प्रशिक्षण देण्यात आले होते.

दुसरा ताफा

२०२१ च्या एप्रिलपर्यंत भारताच्या ताफ्यात २१ रफायल विमाने दाखल होतील. जानेवारीत फ्रान्सकडून आणखी तीन रफायल भारताकडे सुपूर्द केली जातील. तसेच मार्चमध्ये तीन आणि एप्रिलमध्ये सात रफायल भारतात दाखल होतील. या २१ विमानापैकी १८ विमाने ही हरियाणाच्या अंबाला येथील वायुसेनेच्या विमानतळावर ‘गोल्डन ऍरो स्क्वार्डन’चा भाग बनतील. तर पश्चिम बंगालच्या हसीमारा तळावर तैनात करण्यात येतील.. भारताने फ्रान्सबरोबर एकूण ३६ रफायल विमानांसाठी करार केला असून पुढील वर्षाच्या अखेरीपर्यंत सर्व विमाने भारतीय वायुसेनेच्या ताफ्यात दाखल होणार आहेत.

leave a reply