अफगाणिस्तान मुद्यावर भारत-रशिया-इराण चर्चा

मॉस्को – रशियाची राजधानी मॉस्कोमध्ये अफगाणिस्तान मुद्यावर त्रिपक्षीय चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे. या चर्चेत रशियासह भारत व इराणचे विशेषदूत सहभागी झाले होते. अमेरिकेने अफगाणिस्तानातून सैन्य माघारी घेतल्यास भयंकर परिणाम होतील, असा इशारा रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी नुकताच दिला होता. या पार्श्वभूमीवर झालेली ही चर्चा महत्त्वाची ठरते.

अफगाणिस्तान मुद्यावर

सध्या कतारमध्ये अफगाणिस्तान सरकार व तालिबानमध्ये शांतीचर्चा सुरू आहे. मात्र एक महिन्याहून अधिक काळ सुरू असलेल्या या चर्चेतून अद्यापही तोडगा निघालेला नाही. त्याचवेळी अफगाण मुद्याशी हितसंबंध जोडलेल्या देशांकडूनही विविध पातळ्यांवर हालचाली सुरू आहेत. रशियाच्या परराष्ट्र मंत्रालयाने गेल्या आठवड्यात प्रसिद्ध केलेल्या एका निवेदनात, पुढील काळात दोहाप्रमाणेच रशियातही अफगाण-तालिबान चर्चा पार पडू शकते, असे म्हटले होते. त्यानंतर रशियात झालेली ही बैठक, रशियाकडून सुरू झालेल्या हालचालींचा भाग मानला जातो.

दोहात शांतीचर्चा सुरू असतानाच अफगाणिस्तानचे मुख्य कार्यकारी अधिकारी अब्दुल्लाह अब्दुल्लाह यांनी भारत तसेच इराणला भेट दिली होती. अफगाणिस्तानमधील इतर वरिष्ठ नेते तसेच अधिकाऱ्यांनीही नुकताच भारताचा दौरा केला आहे. इराण अफगाणिस्तानचा शेजारी देश असून त्यांचे अफगाणिस्तानातील हजारावंशियांशी पारंपरिक संबंध आहेत. इराणने तालिबानशी जवळीक साधण्यातही यश मिळविल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे अफगाणिस्तान शांतीचर्चेत भारत व इराण या दोघांचीही भूमिका अतिशय महत्त्वाची ठरते.

ही सर्व पार्श्वभूमी लक्षात घेता रशियाने पुढाकार घेऊन भारत व इराणबरोबर स्वतंत्र बैठक घेणे लक्ष वेधून घेत आहे.

leave a reply