तैवानच्या राष्ट्राध्यक्षांना सदिच्छा देऊन भारताचा चीनला संदेश

नवी दिल्ली – तैवान हा चीनचा भूभाग नसून स्वतंत्र देश आहे, अशी आक्रमक भूमिका मांडणाऱ्या नेत्या ‘त्साई ईंग-वेन’ यांनी पुन्हा एकदा सार्वत्रिक निवडणुकीत विजय मिळवून तैवानच्या राष्ट्राध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतली. त्यांच्या शपथविधी सोहळ्याला भारताचे प्रतिनिधीही व्हर्च्यूअल उपस्थित होते. येत्या काळात भारत आणि तैवान या दोन देशांमधील सहकार्य अधिक भक्कम होईल, असा विश्वास भारतीय नेत्यांनी यावेळी व्यक्त केला. याआधी २०१६ साली झालेल्या त्साई यांच्या शपथविधी सोहळ्याला भारताचे प्रतिनिधी उपस्थित नव्हते. यावेळी मात्र भारताची भूमिका बदलली असून याद्वारे आपल्या कुरापती काढणाऱ्या चीनला योग्य तो संदेश दिल्याचे दिसत आहे.

तैवानमध्ये पार पडलेल्या सार्वत्रिक निवडणुकीत ‘डेमोक्रॅटिक प्रोग्रेसिव्ह पार्टी’ या सत्ताधारी पक्षाचा प्रचंड बहुमताने विजय झाला. यामुळे ‘त्साई ईंग-वेन’ पुन्हा तैवानच्या राष्ट्राध्यक्षा बनल्या असून पुन्हा त्यांचा शपथग्रहण सोहळा पार पडला. कोरोनाव्हायरसच्या पार्श्वभूमीवर जगभरातील विमानसेवा बंद असल्यामुळे सुमारे ४१ देशांच्या ९२ प्रतिनिधींनी या शपथग्रहण सोहळ्याला ‘व्हर्च्युअल उपस्थिती’ लावली होती. यामध्ये भारताकडून खासदार मीनाक्षी लेखी आणि राहुल कासवान यांचाही समावेश होता. तर तैवानमधील ‘इंडिया-तैपेई असोसिएशन’चे अध्यक्ष सोहांग सेन हे राजधानी तैपेईमधील सोहळ्याला हजर होते.

मीनाक्षी लेखी यांनी राष्ट्राध्यक्षा ईंग-वेन यांच्याशी बोलताना भारत आणि तैवान दोघेही लोकशाहीवादी देश असल्याचे सांगितले. ‘स्वातंत्र्य लोकशाही आणि मानवाधिकार यांचा आदर, या समान मूल्यांवर भारत आणि तैवानची लोकशाही आधारलेली आहे. गेल्या काही वर्षांमध्ये व्यापार, गुंतवणूक आणि इतर आघाड्यांवर भारत आणि तैवानमधील सहकार्य बहरत चालले असून पुढच्या काळात हे सहकार्य अधिक वाढेल’, असा विश्वास लेखी यांनी व्यक्त केला. तर ‘राष्ट्राध्यक्षा त्साई ईंग-वेन यांना त्यांच्या कार्यात यश मिळो’, अशी सदिच्छा शपथग्रहण सोहळ्याच्यावेळी भारतातर्फे देण्यात आली.

याआधी २०१६ साली ईंग-वेन यांनी राष्ट्राध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतली होती. त्यावेळी भारताने तैवानी राष्ट्राध्यक्षांच्या शपथग्रहणाला प्रतिनिधी पाठवणे टाळले होते. पण गेल्या चार वर्षात जागतिक पटलावर मोठ्या घडामोडी घडल्या असून तैवानी राष्ट्राध्यक्षांच्या या शपथविधीला भारतीय प्रतिनिधींची व्हर्च्यूअल उपस्थिती हेच दाखवून देत आहे. त्यात भारताच्या प्रतिनिधींनी तैवानचा देश म्हणून केलेला उल्लेख चीनसाठी इशारा ठरतो. चीनच्या ‘वन चायना पॉलिसी’ला भारताने दिलेला हा मोठा धक्का आहे. या सोहळ्याला भारतीय नेत्यांच्या उपस्थितीवर चीनने उघडपणे आक्षेप घेतलेला नाही. पण या सोहळ्याला उपस्थित असलेल्या ४२ देशांवर चीनने एकाच प्रतिक्रियेतून टीका केली आहे.

कोरोनाव्हायरसच्या साथीबाबत लपवाछपवी केल्यामुळे जगभरात चीनच्या विरोधातील संताप प्रचंड प्रमाणात वाढला आहे. असे असले तरी, ‘ईस्ट आणि साऊथ चायना सी’, तसेच तैवानच्या आखातातील चीनच्या हालचाली काही थांबलेल्या नाहीत. चीनमधील नेत्यांनी राष्ट्राध्यक्ष जिनपिंग यांना तैवानवर हल्ला चढवून ताबा घेण्याचा सल्ला दिला आहे. यापार्श्‍वभूमीवर अमेरिकेने या क्षेत्रातील आपल्या लष्करी हालचाली वाढवून चीनला सज्जड इशारा दिला आहे. गेल्या आठवडाभरात अमेरिकेची ‘यूएसएस थिओडोर रुझवेल्ट’ ही अजस्त्र विमानवाहू युद्धनौका ‘साऊथ चायना सी’ मध्ये दाखल झाली असून लान्सर या बॉम्बर विमानांचा ताफा दोन्ही सागरी क्षेत्रात गस्त घालत आहे. याव्यतिरिक्त अमेरिकेने तैवानसाठी अठरा कोटी डॉलर्सच्या टॉर्पेडोची विक्री मंजूर केली आहे. राष्ट्राध्यक्ष ईंग-वेन यांच्या शपथविधीच्या दिवशीच अमेरिकेकडून ही घोषणा झाली हे विशेष.

leave a reply