राजधानी इस्लामाबादमध्ये सुरक्षा वाढविल्याची पाकिस्तानच्या सुरक्षा यंत्रणांची घोषणा

इस्लामाबादइस्लामाबाद – अमेरिकेच्या पाठोपाठ ब्रिटन, सौदी अरेबिया आणि ऑस्ट्रेलिया या देशांनी देखील पाकिस्तानातील आपल्या नागरिकांना सावधानतेच्या सूचना दिल्या होत्या. या देशांनी पाकिस्तानची राजधानी इस्लामाबादमध्ये भीषण दहशतवादी हल्ल्यांची शक्यता वर्तवून आपल्या नागरिकांना दिलेल्या या सूचनांचे दबाव पाकिस्तानवर आल्याचे दिसत आहे. पाकिस्तानने इस्लामाबादमधील सुरक्षा अधिक कडक करण्याची घोषणा करून २५ नवे चेक पॉईंट्स उभारण्याचे जाहीर केले. तसेच पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी आपल्या देशातून दहशतवाद संपवून टाकण्याची घोषणा केली आहे.

बलोचिस्तान, खैबर-पख्तुनख्वा या पाकिस्तानच्या प्रांतांमध्ये दहशतवादी हल्ल्यांच्या बातम्या येत आहेत. बलोच लिबरेशन आर्मी’ या बंडखोर गटाच्या विशेष पथकाने आपण वेगवेगळ्या ठिकाणी केलेल्या बॉम्बस्फोटात पाकिस्तानच्या २८ जवानांना ठार केल्याची माहिती दिली. यातील सर्वच स्फोटांची माहिती पाकिस्तानच्या लष्कराने उघड केलेली नाही. तर दुसऱ्या बाजूला ‘तेहरिक-ए-तालिबान’ने पाकिस्तानात मोठ्या प्रमाणात घातपाती हल्ले चढविल्याचे दिसत आहे. यात मारल्या जाणाऱ्या पाकिस्तानी जवान व अधिकाऱ्यांची संख्या दिवसागणिक वाढत चालली आहे. अशा परिस्थितीत ‘तेहरिक’ने पाकिस्तानची राजधानी इस्लामाबादला लक्ष्य करण्याची धमकी काही दिवसांपूर्वी दिली होती.

या पार्श्वभूमीवर, अमेरिकेच्या इस्लामाबादमधील दूतावासाने सावधानतेचा इशारा दिला होता. विशेषतः इस्लामाबादमधील पंचतारांकित हॉटेल मॅरियटमध्ये जाण्याचे टाळा असे अमेरिकेने आपल्या राजनैतिक अधिकारी व कर्मचाऱ्यांना बजावले होते. अतिशय आवश्यक असल्याखेरीज बाहेर न पडण्याची सूचना देऊन अमेरिकेच्या दूतावासाने इस्लामाबादमधील सुरक्षाविषयक परिस्थिती अतिशय संवेदनशील बनल्याचे बजावले होते. याचे पडसाद उमटले आहेत. अमेरिकेच्या पाठोपाठ ब्रिटन, सौदी अरेबिया व ऑस्ट्रेलियाने देखील देखील पाकिस्तानातील आपल्या नागरिकांना सावधानतेचा इशारा दिला.

या पार्श्वभूमीवर, पाकिस्तानने राजधानी इस्लामाबादमधील सुरक्षाव्यवस्था वाढविण्याची घोषणा केली. या शहरात २५ नवे चेकपॉईंट उभारण्यात आले आहेत. तसेच प्रत्येकाची कसून चौकशी केली जात असल्याची माहिती पाकिस्तानच्या यंत्रणांनी दिली. तसेच अनोळखी व्यक्तीला कामावर नेमताना आवश्यक ती खबरदारी घ्या, अशी सूचना सुरक्षा यंत्रणांनी स्थानिक उद्योजक व व्यावसायिकांना केली आहे. तसेच इतर देशांच्या दूतावासाची सुरक्षा वाढविण्यात आली असून यासाठी विशेष खबरदारी घेतली जात असल्याची माहिती इथल्या सुरक्षा यंत्रणा देत आहेत.

तर पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी पाकिस्तानातून दहशतवाद संपविण्याची घोषणा केली आहे. माजी पंतप्रधान व सध्याचे विरोधी पक्षनेते इम्रान खान यांनी पाकिस्तानात सुरू असलेले दहशतवादी हल्ले रोखण्यात शाहबाज शरीफ यांच्या सरकारला येत असलेल्या अपयशावर सडकून टीका केली होती. सोमवारी खैबर पख्तुनख्वा प्रांतातील डेरा इस्माईल खान जिल्ह्यातील सभेत बोलताना पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी आपल्या सरकारवर इम्रान खान यांनी केलेल्या टीकेला उत्तर दिले. पाकिस्तानी सरकारच्या सुरक्षा यंत्रणा व प्रांतांच्या सुरक्षा दलांचा वापर करून दहशतवाद नेस्तनाबूत करण्यात येईल, असा दावा शाहबाज शरीफ यांनी केला आहे. तसेच पाकिस्तानच्या ‘नॅशनल सिक्युरिटी कमिटी’ची (एनएससी) बैठक लवकरच बोलविण्यात येईल अशी घोषणाही यावेळी पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी केली आहे.

leave a reply