निवडक संरक्षण कंपन्यांची मक्तेदारी अमेरिकेच्या सुरक्षेसाठी धोकादायक

- पेंटॅगॉनचा अहवाल

वॉशिंग्टन – अमेरिकेच्या संरक्षणक्षेत्रातील निवडक कंपन्यांची मक्तेदारी हा राष्ट्रीय सुरक्षेसाठी धोका असल्याचा इशारा ‘पेंटॅगॉन’ने दिला आहे. ही मक्तेदारी मोडून काढण्यासाठी स्पर्धेला अधिक प्रोत्साहन देणारी धोरणे राबवावित, अशी शिफारस अहवालात करण्यात आली आहे. १९९०च्या दशकात अमेरिकेच्या संरक्षण विभागाला शस्त्रपुरवठा करणार्‍या प्रमुख कंपन्यांची संख्या ५१ होती, मात्र आता ती पाचवर आली आहे, अशी माहितीही अहवालात देण्यात आली.

मंगळवारी अमेरिकेच्या संरक्षण विभागाने आपला अहवाल राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांना सादर केला. या अहवालातील काही मुद्दे समोर आले आहेत. ‘संरक्षणक्षेत्रातील गरजा पुरविण्यासाठी निवडक स्रोतच उपलब्ध असणे ही गोष्ट संरक्षणविभागाच्या मोहिमांसाठी धोकादायक ठरु शकते. एखाद्या विशिष्ट यंत्रणेचा किंवा शस्त्राचा पुरवठा करणार्‍या कंपनीवर शत्रूदेशाने प्रभाव टाकण्यात यश मिळविले तर त्यातून राष्ट्रीय सुरक्षेला जबरदस्त धक्का बसू शकतो’, असा इशारा अहवालात देण्यात आला आहे.

संरक्षणक्षेत्रात पुरेशी स्पर्धा नसल्याने संशोधनालाही मर्यादा पडतात व करदात्यांवर अधिक भार पडतो, असा दावाही अहवालात करण्यात आला. छोटे उद्योग हे अर्थव्यवस्थेसाठी महत्त्वाचे आहेत; मात्र संरक्षणक्षेत्रातील बड्या कंपन्यांनी छोट्या कंपन्यांना ताब्यात घेतल्यामुळे छोट्या उद्योगांची संख्या तब्बल ४० टक्क्यांनी घटल्याकडे अहवालात लक्ष वेधण्यात आले आहे. त्यामुळे संरक्षणविभागाला महत्त्वाच्या संरक्षणयंत्रणांसाठी मर्यादित पर्यायच उपलब्ध होतात, असेही अहवालात नमूद करण्यात आले आहे.

अमेरिकेच्या संरक्षण विभागाला शस्त्रपुरवठा करणार्‍या व या क्षेत्रात मक्तेदारी असणार्‍या पाच बड्या कंपन्यांचा उल्लेखही अहवालात आहे. या कंपन्यांमध्ये बोईंग, लॉकहीड मार्टिन, रेथॉन टेक्नॉलॉजीस्, जनरल डायनॅमिक्स व नॉथ्रोप ग्रुमन यांचा समावेश आहे. हा अहवाल प्रसिद्ध होत असतानाच लॉकहीड मार्टिन या आघाडीच्या कंपनीने ‘एरोजेट रॉकेटडाईन’ या कंपनीवर ताबा मिळविण्याच्या प्रस्तावातून माघार घेतल्याचे वृत्त समोर आले आहे.

leave a reply