ड्युरंड लाईनवर तालिबानचा पाकिस्तानी लष्कराशी संघर्ष

काबुल/इस्लामाबाद – ड्युरंड लाईनवर अफगाण तालिबान आणि पाकिस्तानी लष्कराच्या तोफा धडाडल्या. पाकिस्तान आणि तालिबानमध्ये संघर्ष अटळ असल्याचे इशारे पाकिस्तानचे ज्येष्ठ पत्रकार व विश्‍लेषक देत आहेत. अफगाणिस्तानच्या आधीच्या सरकारांप्रमाणे आपल्यालाही ड्युरंड सीमा मान्य नसल्याचे तालिबानने जाहीर करून इथे पाकिस्तानी लष्कराने टाकलेले कुंपण उखडले होते. यावरून तालिबानची पाकिस्तानच्या लष्कराशी चकमकी झडल्या होत्या. पण मंगळवारी ड्युरंड लाईनवर झालेला संघर्ष अधिक तीव्रतेचा होता.

मंगळवारी पाकिस्तानच्या लष्कराने अफगाणिस्तानच्या कुनार प्रांतात तोफांचे हल्ले चढविले. येथील दंगम जिल्ह्यात पाकिस्तानी तोफगोळे कोसळले. अफगाणिस्तानच्या हद्दीत तयारीत असलेल्या तालिबानच्या सदस्यांनी देखील तोफांचे हल्ले चढवून पाकिस्तानी लष्कराला प्रत्युत्तर दिले. त्यानंतर दोन्ही बाजूने जोरदार गोळीबार झाला. दीड महिन्यानंतर पहिल्यांदाच अफगाण तालिबान आणि पाकिस्तानी लष्करामध्ये ड्युरंड लाईनवर इतका मोठा संघर्ष भडकल्याचा दावा केला जातो. डिसेंबर महिन्यातही कुनार प्रांतातच तालिबान आणि पाकिस्तानी लष्कराने एकमेकांवर गोळीबार केला होता.

अफगाणिस्तान आणि पाकिस्तानमधील २,६४० किलोमीटर लांबीची सीमा ड्युरंड लाईन म्हणून प्रसिद्ध आहे. शंभर वर्षांपूर्वी ब्रिटीशांनी आखलेली ही ड्युरंड लाईन आपल्याला अजिबात मान्य नसल्याचे अफगाणिस्तानच्या प्रत्येक राष्ट्रप्रमुखाने जाहीर केले होते. तालिबानने देखील ही भूमिका कायम ठेवली आहे.

मंगळवारच्या घटनेनंतर तालिबानने संरक्षणमंत्री म्हणून घोषित केलेला मोहम्मद याकूब मुजाहिद याने पाकिस्तानला कठोर शब्दात खडसावले. ड्युरंड लाईनबाबत तालिबान आणि पाकिस्तानमध्ये अजूनही चर्चा सुरू आहे. हा वाद सुटलेला नाही. अशा परिस्थितीत, तालिबानने पाकिस्तानला या भागात काटेरी कुंपण उभारण्यासाठी परवानगी दिली नसल्याचे याकूब मुजाहिदने ठणकावले. यावरुन पाकिस्तान आपल्या परवानगीशिवाय काटेरी कुंपणही उभारू शकत नसल्याचे तालिबान दाखवून देत आहे.

ड्युरंड लाईन तसेच तेहरिक-ए-तालिबान, बलोच बंडखोर आणि इतर मुद्यांवर तालिबानची भूमिका पाकिस्तानच्या चिंता वाढविणारी ठरत आहे. सहा महिन्यांपूर्वी पाकिस्तानने तालिबानला काबुलच्या सत्तेवर बसविले होते. तसेच तालिबानच्या सत्तास्थापनेतही पाकिस्तानची कुख्यात गुप्तचर यंत्रणा ‘आयएसआय’ने मोठी भूमिका पार पाडल्याचा दावा पाकिस्तानी माध्यमांनी केला होता. मात्र सत्तेवर आल्यानंतर तालिबान आपल्याला अजिबात किंमत देत नसल्याची जाणीव पाकिस्तानला होऊ लागली आहे.

या पार्श्‍वभूमीवर, ‘आयएसआय’चे प्रमुख लेफ्टनंट जनरल नदीम अंजूम यांनी तुर्कीमध्ये तालिबानच्या विरोधात असलेल्या अफगाणी नेत्यांची भेट घेतल्याची माहिती समोर येत आहे. यामध्ये अब्दुल राशिद खान दोस्तम, अत्ता मुहम्मद नूर आणि मुहम्मद मुहकिक या कडव्या तालिबानविरोधी नेत्यांचा समावेश असल्याचा दावा अफगाणी दैनिकाने केला आहे. अफगाणिस्तानात सर्वसमावेश सरकार स्थापन करण्यासाठी पाकिस्तान तालिबानवर दबाव टाकत असून आयएसआय प्रमुखांची ही भेट यासाठी होती, असे या दैनिकाचे म्हणणे आहे. पण पाकिस्तानने यात काही तथ्य नसल्याचे सांगून सदर बातमी फेटाळली आहे.

leave a reply