अफगाणी लष्कराच्या हल्ल्यात तालिबानचा मोठा नेता ठार

अफगाणी लष्कराच्या हल्ल्यातकाबुल – तालिबानमधील प्रमुख गट असलेल्या हक्कानी नेटवर्कचा प्रमुख जलालुद्दीन हक्कानी याचा मुलगा अफगाणी लष्कराच्या कारवाईत ठार झाला. अफगाणी लष्कराला मिळालेले हे फार मोठे यश मानले जाते. तर तालिबानसह हक्कानी नेटवर्कला बसलेला हा सर्वात मोठा धक्का ठरतो. दोहा येथील वाटाघाटीत अनस हक्कानी सहभागी झाला होता.

अफगाणिस्तानच्या लष्कराने दोन दिवसांपूर्वी पाकिस्तानच्या सीमेवरील पाकतिका आणि हेल्मंड प्रांतात केलेल्या कारवाईत मोठ्या संख्येने तालिबानचे दहशतवादी ठार केले. यामध्ये तालिबानचे दोन मोठे कमांडर ठार झाल्याची माहिती अफगाणी वृत्तसंस्थेने प्रसिद्ध केली. यामध्ये दोहा येथील वाटाघाटीत सहभागी झालेल्या तालिबानी नेत्याच्या भावाचा व एका कमांडरच्या मुलाचा समावेश असल्याचे या बातमीत म्हटले होते. अनस हक्कानी व अब्दुल हक ओमारी ही ठार झालेल्या कमांडरची नावे आहेत.

अफगाणी लष्कराच्या हल्ल्यातओसामा बिन लादेन आणि मुल्ला ओमर यांच्याशी जवळीक असलेला जलालुद्दीन हक्कानी हयात नाही. त्यानंतर सिराजुद्दीन हक्कानीने हक्कानी नेटवर्कची सूत्रे हाती घेतली होती. तर अनस हक्कानी याला काही वर्षांपूर्वी अमेरिकेने ताब्यात घेतले होते. पण काही महिन्यांनी तालिबानने अपहृत परदेशी नागरिकांच्या बदल्यात अनस हक्कानीची सुटका करून घेतली होती. असा हा अनस हक्कानी तालिबानच्या काही प्रमुख नेत्यांपैकी एक मानला जातो. अमेरिका व तालिबानमध्ये कतारच्या दोहा येथे पार पडलेल्या वाटाघाटीत अनस हक्कानी सहभागी झाला होता. यावरून तालिबानमधील त्याचे स्थान लक्षात येऊ शकेल.

म्हणूनच अनस हक्कानी याला ठार करून अफगाणी लष्कराने तालिबानला फार मोठा हादरा दिला आहे. गेल्या काही आठवड्यांपासून तालिबान अफगाणिस्तानात जोरदार लष्करी मुसंडी मारत असल्याच्या बातम्या सातत्याने समोर येत होत्या. अफगाणी लष्कर न लढता तालिबानसमोर शरणांगती पत्करत असल्याचे दावे केले जात होते. काही ठिकाणी अशी परिस्थिती असली, तरी बर्‍याच ठिकाणी अफगाणी लष्कर तालिबानला टक्कर देत आहे आणि तालिबानवर मात देखील करीत आहे, असे दावे अफगाणिस्तानच्या सरकारने केले होते. आता अनिस हक्कानीसारख्या तालिबानच्या महत्त्वाच्या नेत्याला संपवून अफगाणिस्तानच्या लष्कराने तालिबानला खुले आव्हान दिल्याचे दिसते.

leave a reply