कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर गरीबी, असंतोष व भूराजकीय तणाव वाढेल

- आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या अहवालातील इशारा

भूराजकीयवॉशिंग्टन – कोरोना साथीच्या पार्श्‍वभूमीवर जागतिक अर्थव्यवस्था पूर्वपदावर येणार असली आर्थिक विकास असंतुलित राहण्याची भीती असून, गरीबी, असंतोष तसेच भूराजकीय तणावांमध्ये अधिकच भर पडेल, असा इशारा आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने दिला आहे. 2021 सालच्या अखेरीस अर्थव्यवस्थेत वाढ दिसून आली तरी पुढील वर्षी अर्थव्यवस्था पुन्हा मंदावेल, असेही नाणेनिधीच्या अहवालात बजावण्यात आले आहे.

नाणेनिधीच्या प्रमुख अर्थतज्ज्ञ गीता गोपीनाथ यांनी मंगळवारी ‘वर्ल्ड इकॉनॉमिक आऊटलुक रिपोर्ट’ प्रसिद्ध केला. या अहवालाचे शीर्षकच ‘फॉल्ट लाईन्स वायडन इन द ग्लोबल रिकव्हरी’ असे आहे. नाणेनिधीने एप्रिल महिन्यात प्रसिद्ध केलेल्या अहवालानंतर जागतिक स्तरावरील परिस्थितीत मोठा बदल झाल्याचे अहवालात नोंदविण्यात आले आहे. लसींची उपलब्धता हा एक प्रमुख घटक म्हणून उदयास आला असून जागतिक अर्थव्यवस्थेला दुभंग करणारी रेषा ठरल्याकडे अर्थतज्ज्ञ गीता गोपीनाथ यांनी लक्ष वेधले.

जागतिक अर्थव्यवस्था पूर्वपदावर येण्याची प्रक्रिया ‘लसीकरण’ नावाच्या रेषेने विभागली गेली आहे. जगातील जवळपास सर्व प्रगत अर्थव्यवस्था वर्षअखेरपर्यंत दैनंदिन व्यवहार पूर्वपदावर आणण्यासाठी पावले उचलत आहेत. त्याचवेळी दुसर्‍या बाजूला अनेक देशांमध्ये कोरोनाचा फैलाव व बळींची संख्या वाढते आहे. यात प्रामुख्याने उगवत्या अर्थव्यवस्था व विकसनशील अर्थव्यवस्थांचा समावेश आहे. जोपर्यंत इतर देशांमध्ये संक्रमण वाढते आहे तोपर्यंत फैलाव कमी असलेल्या देशांमध्येही अर्थव्यवस्था पूर्वपदावर येण्याची शाश्‍वती नाही, असे नाणेनिधीच्या अहवालात बजावण्यात आले आहे.

भूराजकीयआंतरराष्ट्रीय स्तरावर कोरोनाच्या साथीची पूर्णपणे अखेर झाल्याशिवाय जागतिक अर्थव्यवस्था पूर्वपदावर येईल असे निश्‍चितपणे सांगता येणार नाही, याची जाणीव नाणेनिधीच्या अर्थतज्ज्ञांनी करून दिली आहे. या वर्षाच्या सुरुवातीला लसीकरण सुरू झाल्यानंतर अनेक देशांनी निर्बंध उठवून अर्थव्यवस्थेला गती देण्यासाठी पावले उचलली होती. मात्र कोरोनाच्या नव्या प्रकारांचा फैलाव सुरू झाल्याने त्यात पुन्हा खंड पडला, याकडे नाणेनिधीने लक्ष वेधले.

मात्र याच काळात प्रगत अर्थव्यवस्थांनी लसीकरण व मोठ्या अर्थसहाय्याचे संकेत देऊन अर्थचक्र रुळावर आणण्यासाठी वेगाने पावले उचलली. उगवत्या व विकसनशील अर्थव्यवस्था याबाबतीत मागे पडल्या आणि त्याचे परिणाम आता समोर येत असल्याचे नाणेनिधीने आपल्या अहवालात म्हटले आहे. प्रगत अर्थव्यवस्थांमध्ये जवळपास 40 टक्के नागरिकांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. तर उगवत्या अर्थव्यवस्थांमध्ये हेच प्रमाण जेमतेम 11 टक्क्यांपर्यंतच असल्याचे नाणेनिधीने स्पष्ट केले.

कोरोनाचे अधिक वेगाने पसरणारे घातक ‘स्ट्रेन्स’ जागतिक अर्थव्यवस्था पूर्वपदावर येण्याच्या प्रक्रियेत मोठा अडथळा ठरु शकतात. या अडथळ्यांमुळे 2025 सालापर्यंत जागतिक अर्थव्यवस्थेला तब्बल 4.5 ट्रिलियन डॉलर्सचा फटका बसेल, असे अर्थतज्ज्ञ गीता गोपीनाथ यांनी बजावले. ‘पूर्वपदावर येण्याची प्रक्रिया सुरळीत ठेवायची असेल तर सर्व अर्थव्यवस्थांनी एकत्र येऊन सामायिक धोरण व उपाययोजना करायला हव्यात. तसेच झाले नाही तर अर्थव्यवस्थेचे संतुलन बिघडून गरीबी, सामाजिक असंतोष व भूराजकीय तणाव अधिक तीव्र होतील’, असा इशारा नाणेनिधीच्या अर्थतज्ज्ञांनी दिला.

leave a reply