कोरोनाव्हायरसच्या नव्या रुग्णांमुळे चीनच्या राजधानीत खळबळ

बीजिंग – चीनची राजधानी बीजिंगमध्ये कोरोनाव्हायरसच्या संसर्गाची सुमारे ५० नवीन प्रकरणे आढळल्याने खळबळ उडाली आहे. या नव्या उद्रेकानंतर राजधानी बीजिंगच्या काही भागात पुन्हा लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. बीजिंगमधील सर्वात मोठी भाजीपाला व मांसाची बाजारपेठ असणाऱ्या ‘शिंफदी मार्केट’सह शहरातील पाच मार्केट्स बंद करण्यात आली आहेत. देशाच्या राजधानीतच साथीचे नवे रुग्ण आढळल्याने कोरोनावर नियंत्रण मिळविल्याचे दावे करणाऱ्या चीनच्या कम्युनिस्ट राजवटीचे पितळ उघडे पडले आहे.

Coronavirus-Chinaगेल्या आठवड्यात राजधानी बीजिंगमधील शिंफदी मार्केटला भेट दिलेल्या एका व्यक्तीला कोरोनाव्हायरसची लागण झाल्याचे गुरुवारी समोर आले होते. त्यानंतर शुक्रवारी बीजिंगमध्ये काम करणार्‍या दोन सरकारी कर्मचाऱ्यांनाही कोरोनाचा संसर्ग झाल्याचे उघड झाले. या दोन्ही कर्मचाऱ्यांनी शिंफदीसह राजधानी बीजिंगमधील पाच इतर बाजारपेठांना भेटी दिल्याचे चौकशीतून समोर आले. या घटनेनंतर राजधानी बीजिंगमधील सरकारी यंत्रणा सतर्क झाल्या असून शुक्रवारी शहरातील विविध बाजारपेठा व सुपरमार्केट्स मध्ये काम करणाऱ्या सुमारे दोन हजार जणांची चाचणी घेण्यात आली.

या चाचणीतून शिंफदी मार्केट व हैदीअन डिस्ट्रिक्ट भागातील एका मार्केटमधील ५० जणांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले. राजधानी बीजिंगमध्ये अवघ्या तीन दिवसांत समोर आलेल्या या नव्या प्रकरणांनंतर जबरदस्त खळबळ उडाली आहे. राजधानी मधील साथीची व्याप्ती अधिक वाढू नये म्हणून शिंफदी मार्केटसह शहरातील सर्व मोठी मार्केट्स बंद करण्यात आले आहेत. त्याचवेळी या मार्केट्सच्या नजीक असलेल्या परिसरात लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे.

Coronavirus-Chinaचीनमधील सत्ताधारी राजवटीने दोन महिन्यांपूर्वीच कोरोना साथीवर विजय मिळवल्याची घोषणा करून आपली पाठ थोपटून घेतली होती. चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी साथीचे केंद्र ठरलेल्या वुहान शहराला भेट देऊन नागरिकांची संवाद साधल्याचे फोटोग्राफ्सही प्रसिद्ध झाले होते. मात्र हा सर्व कम्युनिस्ट राजवटीने उभा केलेला बनाव असल्याचे गेल्या महिन्यापासून समोर येणाऱ्या कोरोनाव्हायरसच्या प्रकरणांमधून स्पष्ट झाले आहे.

गेल्या महिन्यात वुहान तसेच चीनच्या इतर शहरांमध्ये कोरोनाचे नवे रुग्ण सापडण्यास सुरुवात झाली होती. वुहान शहरातील नव्या रुग्णांची नसंख्या ४० वर गेल्याचे सांगण्यात येते. त्यापाठोपाठ आता थेट राजधानी बीजिंगमध्ये ५०हून अधिक रुग्ण सापडल्याने कोरोनाची दुसरी लाट परतल्याचा दावा जोर पकडू लागला आहे. त्याचबरोबर चीन पुन्हा एकदा जगापासून याबाबत लपवाछपवी करीत असल्याचा आरोपही तीव्र होऊ लागला आहे.

leave a reply