अफगाणिस्तानच्या जलालाबादमध्ये दुहेरी बॉम्बस्फोट

दुहेरी बॉम्बस्फोटकाबुल – अफगाणिस्तानच्या जलालाबादमध्ये दहशतवाद्यांनी दुहेरी बॉम्बस्फोट घडविला. यामध्ये लहान मुलासह दोघांचा बळी गेल्याची माहिती स्थानिक यंत्रणा देत आहेत. पण बळींची संख्या सांगितली त्याहून कितीतरी अधिक असल्याचा दावा स्थानिक करीत आहेत. तालिबानच्या गस्तीवाहनाला लक्ष्य करण्यासाठी आयएसने हे स्फोट घडविल्याचा संशय व्यक्त केला जातो. दोन दिवसांपूर्वी राजधानी काबुलमध्ये स्फोटाद्वारे वीजेचा खांब उडवून देण्यात आला होता. आयएसच्या दहशतवाद्यांनी या घातपाताची जबाबदारी स्वीकारली आहे.

तालिबानने काबुलवर नियंत्रण मिळविल्यापासून गेल्या दोन महिन्यात अफगाणिस्तानच्या पूर्वेकडील नांगरहार प्रांताची राजधानी जलालाबाद येथे तालिबानच्या दहशतवाद्यांवरील हल्ले वाढले आहेत. आत्तापर्यंत तालिबानच्या दहशतवाद्यांवरील हल्ल्यांची जबाबदारी आयएसने स्वीकारलेली आहे. पाश्‍चिमात्य देशांबरोबर वाटाघाटी करुन सत्तेवर आलेली तालिबान २० वर्षांपूर्वीची संघटना राहिलेली नसल्याचा आरोप करुन आयएसने तालिबानवरील हल्ले तीव्र करण्याची धमकी दिली होती. त्यामुळे शनिवारी तालिबानच्या वाहनाला लक्ष्य करून घडविलेल्या स्फोटामागेही आयएस असल्याचा दावा केला जातो.

दोन दिवसांपूर्वी आयएसच्या दहशतवाद्यांनी राजधानी काबुलच्या उत्तरेकडील भागात वीजपुरवठा करणारा टॉवर स्फोटात उडवून दिला होता. यानंतर इथला वीजपुरवठा खंडीत झाला होता. तर तालिबानने देखील आयएसच्या दहशतवाद्यांवर कारवाई केल्याचा दावा केला जातो. नांगरहार प्रांतातच कुझ कुनार आणि हसका मिना या जिल्ह्यांमध्ये तालिबानने केलेल्या कारवाईत आयएसच्या ५० दहशतवाद्यांना ताब्यात घेतल्याची बातमी समोर येत आहे.

तालिबान व आयएसमधील या संघर्षात अफगाणी जनता होरपळत असल्याची चिंता आंतरराष्ट्रीय विश्‍लेषक तसेच मानवाधिकार संघटना व्यक्त करीत आहेत. त्याचबरोबर तालिबान आपल्या कट्टरपंथिय समर्थकांना खूश करण्यासाठी अफगाणिस्तानातील अल्पसंख्यांकांवर अत्याचार करीत असल्याचा आरोप मानवाधिकार संघटनेने केला.

तालिबानच्या दहशतवाद्यांनी कंदहार, हेल्मंड, उरूझ्गन, दायकूंदी, बल्ख या पाच प्रांतातील हजारा व इतर अल्पसंख्यांकांना राहत्या घरातून हुसकावून लावत त्यांच्या जमिनीवर ताबा घेतल्याचा ठपका मानवाधिकार संघटनेच्या आशिया विभागाचे अध्यक्ष पॅट्रिशिया गॉस्मन यांनी ठेवला. गेल्या महिन्याभरात तालिबानने अल्पसंख्यांकांना गोळ्या घालून ठार केल्याच्या तसेच महिला खेळाडूचा शिरच्छेद केल्याच्या हादरवून टाकणार्‍या घटना समोर आल्या आहेत.

दरम्यान, अफगाणिस्तानच्या हेरात प्रांतात तालिबानच्याच दोन गटांमध्ये संघर्ष पेटल्याच्या बातम्या समोर येत आहेत. काबुलमधील तालिबानच्या राजवटीशी मतभेद असलेल्या गटाचा यात समावेश असल्याचे माध्यमांचे म्हणणे आहे. त्याचवेळी अफगाणी लष्कराचे माजी अधिकारी आयएस-खोरासानला जाऊन मिळाल्याचे दावे केले जातात. तर अफगाणी लष्करातील काहीजण तालिबानच्या विरोधात लढणार्‍या नॉर्दन रेझिस्टन्स फोर्समध्ये सहभागी झाले आहेत. यामुळे तालिबान अफगाणिस्तानात स्थैर्य प्रस्थापित करू शकेल, हे दावे निकालात निघाले असून उलट तालिबान सत्तेवर असताना अफगाणिस्तानात रक्तरंजित संघर्षाचे नवे सत्र सुरू झाल्याचे दिसत आहे.

leave a reply