तैवानचे दुसरे हॉंगकॉंग होऊ देणार नाही

- अमेरिकी सिनेटरचा इशारा

अमेरिकी सिनेटरवॉशिंग्टन/बीजिंग – ‘चीनच्या कम्युनिस्ट राजवटीने हॉंगकॉंगचा ताबा घेतल्यानंतर अभिव्यक्तीस्वातंत्र्य, कायद्याची चौकट व लोकशाही यंत्रणा कशा नाहीशा झाल्या हे सार्‍या जगाने पाहिले आहे. मात्र यापुढे हॉंगकॉंगचे उदाहरण ठेऊन काही करता येईल, अशा भ्रमात राहू नका. तैवानच्या बाबतीत हॉंगकॉंगची पुनरावृत्ती होऊ देणार नाही’, असा इशारा अमेरिकेचे वरिष्ठ सिनेटर डॅन सुलिवन यांनी दिला. अमेरिकेचे संरक्षणमंत्री लॉईड ऑस्टिन यांनीही तैवानच्या सुरक्षेसाठी अमेरिका सर्वतोपरी सहाय्य करील असे आश्‍वासन दिले आहे.

या महिन्याच्या पहिल्या चार दिवसात चीनच्या सुमारे दीडशे विमानांनी तैवानच्या ‘एअर डिफेन्स आयडेंटिफिकेशन झोन’मध्ये (एडीआयझेड) घुसखोरी केली होती. लढाऊ विमानांच्या घुसखोरीव्यतिरिक्त चीनने तैवानवरील आक्रमणासाठी विविध भागांमध्ये सराव सुरू केल्याचे तसेच तैनाती वाढविल्याची माहितीही समोर येत आहे. यामुळे चीन व तैवानमधील तणाव टोकाला पोहोचला असून अनेक विश्‍लेषक व तज्ज्ञांनी इथे संघर्ष भडकेल, अशी चिंता व्यक्त केली आहे. अमेरिका, जपान, ऑस्ट्रेलियासह अनेक देशांनी तैवानच्या मुद्यावरून चीनला कठोर इशारे देण्यासही सुरुवात केली आहे.

अमेरिकी सिनेटरअमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांनी अमेरिका तैवानच्या सुरक्षेसाठी बांधिल असल्याचा दावा नुकताच केला होता. त्यानंतर सिनेटर डॅन सुलिवन यांचा इशारा आला असून अमेरिकेकडून या प्रश्‍नावर चीनला याद्वारे संदेश दिला जात असल्याचे दिसते.

सुलिवन हे अमेरिकी संसदेच्या ‘आर्म्ड् सर्व्हिसेस कमिटी’चे सदस्य असल्याने त्यांचे वक्तव्य लक्ष वेधून घेत आहे. रिपब्लिकन सिनेटरनी आपल्या वक्तव्यात, तैवानची तुलना शीतयुद्धाच्या काळातील ‘वेस्ट बर्लिन’शी केली आहे.

‘चीन व तैवानचे एकत्रीकरण होणार असेल तर ते शांततापूर्ण मार्गानेच होईल. कायदा व नियम हेच सांगतात. तैवान म्हणजे पॅसिफिकमधील एखादी सुरक्षाचौकी नाही हे सर्वांनी लक्षात घ्यायला हवे. शीतयुद्धकाळातील वेस्ट बर्लिनप्रमाणे तैवान ही स्वातंत्र्याची आघाडी आहे’, असे सिनेटर सुलिवन यांनी बजावले. शांततापूर्ण मार्गाव्यतिरिक्त इतर कोणत्याही मार्गाने तैवानचे अमेरिकी सिनेटरभवितव्य ठरविण्याचा प्रयत्न झाला तर तो पॅसिफिकसह अमेरिकेच्या सुरक्षेसाठी धोकादायक असेल व या धोक्याला अमेरिका प्रत्युत्तर देईल, असा इशाराही सुलिवन यांनी दिला.

अमेरिकेचे संरक्षणमंत्री लॉईड ऑस्टिन यांनी अमेरिका ‘वन चायना पॉलिसी’ मानत असली तरी त्याचवेळी तैवानच्या सुरक्षेसाठी सर्व प्रकारचे सहाय्य पुरविले जाईल, असे जाहीर केले आहे. मात्र बायडेन प्रशासनाने चीनबाबत स्वीकारलेले नरमाईचे धोरण तैवानला धोक्यात टाकणारे असल्याची टीका अमेरिकेचे विरोधी पक्षनेते करीत आहेत. राष्ट्राध्यक्ष बायडेन सत्तेवर आल्यानंतरच चीनने तैवानच्या विरोधातील आक्रमकता वाढविली होती, याकडेही अमेरिकेचे विरोधी पक्षनेते लक्ष वेधत आहेत. यामुळे बायडेन प्रशासनाची तैवानबाबतची भूमिका हा अमेरिकेच्या अंतर्गत राजकारणातील महत्त्वाचा मुद्दा बनलेला आहे. या दडपणामुळे बायडेन प्रशासन तैवानच्या प्रश्‍नावर चीनला इशारे देऊ लागल्याचे दिसत आहे.

leave a reply