इराणच्या निदर्शकांकडून रिव्होल्युशनरी गार्ड्‌‍सवर लैंगिक अत्याचाराचे गंभीर आरोप

तेहरान – इराणच्या राजवटीविरोधात निदर्शने करणाऱ्या तरुणी व महिलांवर रिव्होल्युशनरी गार्ड्‌‍सनी लैंगिक अत्याचार केल्याचे गंभीर आरोप होत आहेत. रिव्होल्युशनरी गार्ड्‌‍सशी संबंधित न्याययंत्रणेने सदर प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केल्याचा ठपका निदर्शकांनी ठेवला आहे. याचे पडसाद उमटण्याची दाट शक्यता असून यामुळे इराणच्या राजवटीविरोधातील निदर्शनांचा नवा भडका उडू शकतो. आंतरराष्ट्रीय पातळीवरून इराणवर येणारा दबाव यामुळे अधिकच वाढणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत.

iran protestगेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात इराणच्या रिव्होल्युशनरी गार्ड्‌‍सनी राजवटीच्या विरोधात निदर्शने करणाऱ्या हजारो जणांना अटक केली होती. यापैकी 18 व 23 वर्षाच्या तरुणींवर रिव्होल्युशनरी गार्ड्‌‍सच्या काही जवानांनी चौकशीच्या नावाखाली लैंगिक अत्याचार केले, असे आरोप सदर तरुणींनी केले आहेत. वैद्यकीय तपासामध्येही या तरुणींवर लैंगिक अत्याचार तसेच त्यांचा अमानवी छळ केल्याचे उघड झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

पण इराणच्या न्यायालयाने रिव्होल्युशनरी गार्ड्‌‍सवरील हे आरोप सिद्ध करण्यास नकार दिला. सदर प्रकरण अतिशय संवेदनशील असून ते टॉप सिक्रेट ठेवण्याचा निकाल जाहीर करण्यात आला. रिव्होल्युशनरी गार्ड्‌‍स व न्यायालय हे प्रकरण दडपण्यात यशस्वी ठरले होते. पण काही दिवसांपूर्वीच एका आरोपीने पीडित तरुणीला फोन केला. या तरुणीने सदर आरोपीचे कॉल्स रेकॉर्ड केल्यामुळे हे प्रकरण नव्याने समोर आले.

ब्रिटनमधील आघाडीच्या वर्तमानपत्राने रिव्होल्युशनरी गार्ड्‌‍सवरील या गंभीर आरोपांची माहिती जगासमोर मांडली. गेल्या चार महिन्यांच्या निदर्शनांमध्ये पीडित तरुणीचे हे एकमेव प्रकरण नसून रिव्होल्युशनरी गार्ड्‌‍सनी अटकेत असलेल्या इतरही तरुणी, महिलांवर लैंगिक अत्याचार केल्याचा दावा ब्रिटीश वर्तमानपत्राने केला. दरम्यान, 26 सप्टेंबर रोजी भडकलेल्या निदर्शनानंतर रिव्होल्युशनरी गार्ड्‌‍सनी जवळपास 20 हजार जणांना अटक केली असून यामध्ये तरुणी व महिलांचा मोठा समावेश आहे.

leave a reply