युक्रेनला लढाऊ विमाने पुरविल्यास ब्रिटनला गंभीर परिणाम भोगावे लागतील

रशियाची धमकी

Putin-Russiaमॉस्को/लंडन – ब्रिटनने रशियाच्या विरोधात पावले उचलल्यास त्याला प्रत्युत्तर कसे द्यायचे हे रशियाला ठाऊक आहे, अशी धमकी रशियाने दिली आहे. ब्रिटनकडून युक्रेनला लढाऊ विमाने पुरविण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांनी नुकत्याच केलेल्या युरोप दौऱ्यात ब्रिटनसह जर्मनी व फ्रान्सकडूनही लढाऊ विमानांबाबत सकारात्मक संकेत देण्यात आले होते. या पार्श्वभूमीवर रशियाने ब्रिटनला धमकावले आहे.

‘हिरव्या रंगाचा स्वेटशर्ट घातलेले विनोदवीर झेलेन्स्की युरोपात शस्त्रास्त्रांची भीक मागत आहेत. युक्रेनला आपल्या बचावासाठी शस्त्रे हवी आहेत, असा आव युक्रेनी राजवटीने आणला होता. ब्रिटनने युक्रेनला लढाऊ विमानांसह इतर प्रगत शस्त्रे पुरविल्यास युद्धाचा तीव्र झालेला भडका, अधिक रक्तरंजित संघर्ष, त्यामुळे वाढणारी जीवितहानी व युरोपला भोगावे लागणारे लष्करी तसेच राजकीय परिणाम या सर्वांसाठी ब्रिटनच जबाबदार असेल, याची त्यांनी जाणीव ठेवावी’, अशा शब्दात रशियन दूतावासाने ब्रिटनला धमकावले. रशियाविरोधात उचललेल्या पावलांना कसे प्रत्युत्तर द्यायचे याची आम्हाला जाणीव असल्याचेही रशियन दूतावासाने पुढे बजावले.

Eurofighter-Typhoonरशियाच्या संभाव्य नव्या आक्रमणाचा मुकाबला करण्यासाठी युक्रेनने अमेरिका व युरोपिय देशांकडे लढाऊ विमाने, अधिक प्रगत क्षेपणास्त्रे व रणगाड्यांची मागणी केली आहे. त्यातील रणगाड्यांच्या मागणीला पाश्चिमात्य देशांनी होकार दिला असून त्याच्या पुरवठ्यासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. मात्र लढाऊ विमानांच्या मुद्यावर अमेरिका व काही देशांनी विरोध दर्शविला आहे. पण तरीही झेलेन्स्की यांनी ही मागणी लावून धरली आहे.

युक्रेनला प्रगत लढाऊ विमाने मिळाल्यास रशिया-युक्रेन युद्धाचे स्वरुप बदलू शकते व युरोपिय देशांना त्याचे परिणाम भोगावे लागतील, याकडे विश्लेषक सातत्याने लक्ष वेधत आहेत. पण तरीही ब्रिटनसारख्या देशांनी युक्रेनला आताच अधिकाधिक व प्रगत शस्त्रास्त्रे पुरविण्याची गरज असल्याची भूमिका लावून धरली आहे. या पार्श्वभूमीवर रशियन दूतावासाने दिलेली धमकी लक्ष वेधून घेणारी ठरते.

leave a reply