इथिओपियाच्या तिगरेमधील हवाई हल्ल्यात सात ठार

- संयुक्त राष्ट्रसंघाकडून संघर्षबंदीचे आवाहन

नैरोबी – इथिओपियाच्या तिगरे प्रांतात लष्कराने चढविलेल्या हवाई हल्ल्यात सात जण ठार झाले. तिगरेमधील दहशतवाद्यांवर कारवाई केल्याचा दावा इथिओपियाचे सरकार करीत आहे. तर येथील मुलांच्या उद्यानावर हल्ले झाले असून बळींमध्ये मुलांचा समावेश असल्याचा आरोप तिगरेतील नेत्यांनी केला. दरम्यान, इथिओपियन सरकार आणि तिगरेतील नेत्यांना त्वरीत संघर्ष थांबवून मानवतावादी सहाय्य सुरू करण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन संयुक्त राष्ट्रसंघाचे महासचिव अँतोनियो गुतेरस यांनी केले. इथिओपियामध्ये गेल्या दोन वर्षांपासून सरकार आणि उत्तरेकडील तिगरे प्रांतात जोरदार संघर्ष पेटला आहे. ‘तिगरे डिफेन्स फोर्सेस-टीडीएफ’ या बंडखोर संघटनेत तर इथिओपियन सरकारच्या नियंत्रणाखाली असलेल्या ‘इथिओपियन नॅशनल डिफेन्स फोर्सेस-इएनडीएफ’ लष्करामध्ये 2020 सालच्या नोव्हेंबर महिन्यात संघर्ष पेटला होता. यापैकी इथिओपियन लष्कराने तिगरेत नरसंहार केल्याचा आरोप ‘टीडीएफ’ने केला होता. या हल्ल्यात महिला-मुलांचा मोठ्या प्रमाणात बळी गेल्याचे आरोप होत आहेत. त्यानंतरही तिगरेतील बंडखोर आणि इथिओपियन सरकारमध्ये सुरू झालेला संघर्ष थांबलेला नाही.

चार महिन्यांपूर्वी संयुक्त राष्ट्रसंघाने मध्यस्थी करून इथिओपियन सरकार आणि तिगरेतील बंडखोरांमध्ये संघर्षबंदी घडविली होती. पण इथिओपियन सरकारने तिगरेतील नेत्यांना दहशतवादी घोषित करून इथली कारवाई सुरू ठेवली होती. तिगरेतील बंडखोर नेते इथिओपियन सरकारच्या या हल्ल्यांकडे आंतरराष्ट्रीय समुदायाचे लक्ष वेधत होते. त्यातच इथिओपियाच्या लष्कराने तिगरेतील नवे हवाई हल्ले चढवून संघर्षबंदीचे उघड उल्लंघन केल्याचा ठपका तिगरेतील बंडखोर नेते करीत आहेत. इथिओपियन लष्कराने मुलांच्या मैदानाला लक्ष्य करून राष्ट्रसंघाने लागू केलेली संघर्षबंदी आपण मान्य करणार नसल्याचे दाखवून दिल्याचा आरोप जोर पकडत आहे.

मात्र इथिओपियन सरकारचे प्रवक्ते लेगेसे टुलू यांनी तिगरे नेत्यांचा आरोप फेटाळला. लष्कराच्या हल्ल्यात तिगरेचे दहशतवादीच मारले गेले असून तिगरे नेते बनावट मृतदेह रचून आंतरराष्ट्रीय समुदायाची फसवणूक करीत असल्याचा ठपका टुलू यांनी केला. पण तिगरेतील रुग्णालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी इथिओपियन सरकारचे दावे खोडून काढले आहेत. या हल्ल्यात ठार झालेल्यांचे मृतदेह रुग्णालयात दाखल झाले असून यामध्ये काही मुलांचा समावेश असल्याचे रुग्णालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले. यामुळे इथिओपियाच्या सरकारसमोरील अडचणी वाढल्या आहेत.

दरम्यान, या हल्ल्यानंतर संयुक्त राष्ट्रसंघाचे महासचिव गुतेरस यांनी इथिओपियन सरकार व तिगरेतील बंडखोरांना वाटाघाटीद्वारे ही समस्या सोडविण्याची व त्वरीत संघर्षबंदी लागू करण्याचे आवाहन केले आहे. इथिओपियातील हा संघर्ष शेजारच्या इरिट्रिया आणि जिबौतीच्या सुरक्षा व स्थैर्याला आव्हान देत आहे.

leave a reply