मोसादने इराणवर लष्करी हल्ल्याची तयारी केली आहे

- इस्रायलच्या गुप्तचर विभागाच्या प्रमुखांचा इशारा

जेरूसलेम – ‘‘अमेरिका व इराणमधील नवा अणुकरार इस्रायलला इराणविरोधात कारवाई करण्यापासून रोखू शकत नाही. कारण इराणच्याविरोधात आत्ताच कारवाई केली नाही, तर इस्रायलला असलेला धोका वाढेल. त्यामुळे इस्रायली गुप्तचर यंत्रणा ‘मोसाद’ने इराणवर लष्करी हल्ल्याची तयारी केली आहे’’, असा सज्जड इशारा मोसादचे प्रमुख डेव्हिड बार्नी यांनी दिला. त्यांच्या या इशाऱ्यामुळे आखाती क्षेत्रातील वातावरण ज्वालाग्रही बनत चालल्याचे स्पष्ट होत आहे. कारण याआधी मोसादने इराणच्या अणुप्रकल्पांवर कुणाला कल्पनाही करता येणार नाही, असे जबरदस्त हल्ले चढविले होते. यातील काही हल्ल्यांची माहिती मिळण्यासाठीही इराणला बराच वेळ लागला होता.

अमेरिका आणि इराणमधील अणुकरार अंतिम टप्प्यात पोहोचला असून येत्या काही दिवसात या अणुकराराची घोषणाही होऊ शकते. अशा परिस्थितीत, मोसादच्या प्रमुखांनी इराणसह अमेरिकेला देखील बजावल्याचे दिसत आहे. याआधी इस्रायलचे संरक्षणदलप्रमुख लेफ्टनंट जनरल अविव कोशावी यांनी आपल्या लष्कराला इराणच्या प्रमुख ठिकाणांवर हल्ल्यासाठी तयार राहण्याचे आदेश दिले होते. तसेच या हल्ल्याचा आराखडा तयार असून इस्रायलच्या नेतृत्वाचा इशारा मिळाल्यानंतर कारवाई केली जाईल, असे कोशावी यांनी जाहीर केले होते. पण मोसादचे प्रमुख बार्नी यांनी हा इशारा देण्यासाठी निवडलेली वेळ महत्त्वाची ठरते.

दोन दिवसांपूर्वी इस्रायलचे संरक्षणमंत्री बेनी गांत्झ अमेरिकेच्या दौऱ्यावर गेले आहेत. याच सुमारास मोसादच्या प्रमुखांनी इस्रायलचे पंतप्रधान येर लॅपिड यांच्याबरोबर मोठी बैठक केली होती. यानंतर पुढच्या काही तासात मोसादच्या प्रमुखांनी अमेरिका व इराणमधील अणुकरार यशस्वी झाला तर त्यापासून इस्रायलला असलेल्या धोक्यांबाबत जाहीर इशारा दिला. या अणुकरारात सामील करण्यात आलेल्या अटी इराणला अणुबॉम्ब निर्मितीसाठी आवश्यक साहित्य मिळवून देण्यासाठी परवाना ठरतील व या करारामुळे इराणसाठी अब्जावधी डॉलर्सचे सहाय्य खुले केले जाईल, असा दावा बार्नी यांनी केला.

असे झाले तर अणुबॉम्बची निर्मिती करण्यासाठी इराणला काही वर्षे लागतील. पण त्याचबरोबर अब्जावधी डॉलर्सचे आर्थिक सहाय्य मिळाल्यामुळे इराण व या क्षेत्रातील इराणसंलग्न दहशतवादी संघटना अधिक प्रबळ होतील, असा इशारा मोसादच्या प्रमुखांनी दिला. त्याचबरोबर अशा कुठल्याही अणुकरारावर इस्रायलने स्वाक्षरी केलेली नाही. तसेच इस्रायलला स्वसंरक्षणाचा पूर्ण अधिकार आहे, याची आठवणही बार्नी यांनी करून दिली. त्यामुळे इराणचा धोका वाढत असताना इस्रायल शांत बसणार नाही, हा धोका कसा दूर करायचा, हे मोसादला ठाऊक आहे आणि मोसाद त्याचीच तयारी करीत असल्याचे सूचक उद्गार बार्नी यांनी काढले आहेत.

दरम्यान, याआधी मोसादने इराणचा अणुप्रकल्प व क्षेपणास्त्रनिर्मितीशी संबंधी हजारो कागदपत्रे, सिडी, फोटोग्राफ्स, व्हिडिओ हस्तगत केले होते. मोसादचे माजी प्रमुख योसी कोहेन यांनी इराणमध्ये घुसून स्थानिक एजंटच्या सहाय्याने ही कारवाई पार पाडल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या. तर सुरक्षा रक्षकांच्या कवचातून प्रवास करणारे इराणच्या अणुकार्यक्रमाचे वरिष्ठ शास्त्रज्ञ मोहसिन फखरीझादेह यांची राजधानी तेहरानमध्ये हत्या झाली होती. त्यासाठी देखील इराणने मोसादवर आरोप केले होते. इराणच्या नातांझ येथील अतिसंरक्षित भुयारी अणुप्रकल्पात सेंट्रिफ्यूजेसच्या खाली बसविलेल्या लाद्यांमध्ये स्फोटके पेरून स्फोट घडविण्याची कामगिरीही मोसादने फत्ते केल्याचे दावे केले जातात. अशा परिस्थितीत, मोसादच्या प्रमुखांनी इराणवर लष्करी कारवाईची तयारी झाल्याची केलेली घोषणा साऱ्या जगाचे लक्ष वेधून घेणारी ठरते.

leave a reply