इस्रायल व भूतानदरम्यान राजनैतिक संबंध प्रस्थापित करणाऱ्या करारावर स्वाक्षऱ्या

नवी दिल्ली – इस्रायलशी संबंध जोडण्यासाठी जगातील अनेक देश उत्सुक असून भूतानबरोबर संबंध प्रस्थापित होणे हे शांतीकरारांना मिळालेले अतिरिक्त फळ आहे, या शब्दात इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यान्याहू यांनी भूतानबरोबर राजनैतिक सहकार्य सुरू झाल्याबद्दल समाधान व्यक्त केले. तर इस्रायलला मान्यता देणाऱ्या देशांचे वर्तुळ वाढते आहे, या शब्दात इस्रायलच्या परराष्ट्रमंत्र्यांनी भूतानबरोबरील राजनैतिक संबंधांचे स्वागत केले. या वर्षभरात इस्रायलबरोबर अधिकृत राजनैतिक संबंध प्रस्थापित करणारा भूतान हा जगातील पाचवा देश ठरला आहे.

संबंध प्रस्थापित

शनिवारी भारताची राजधानी नवी दिल्लीतील इस्रायली दूतावासात, भूतानचे भारतातील राजदूत वेत्सोप नामग्येल व इस्रायली राजदूत रॉन माल्का यांच्यात राजनैतिक करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. ‘यापुढील काळात इस्रायल व भूतान जनतेच्या हितासाठी द्विपक्षीय सहकार्य अधिक दृढ करण्यावर भर देतील. कृषी, तंत्रज्ञान, संस्कृती, पर्यटन व व्यापार या क्षेत्रातील संबंध वाढविण्यावर भर दिला जाईल’, असे दोन्ही देशांकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या संयुक्त निवेदनात म्हटले आहे. इस्रायली राजदूत रॉन माल्का यांनी भूतानबरोबर करारावर स्वाक्षऱ्या होणे हा आपल्यासाठी ऐतिहासिक दिवस असल्याचे वक्तव्य केले आहे.

इस्रायलकडून आशियाई देशांशी संबंध विस्तारण्यासाठी प्रयत्न सुरू असून भूतानबरोबर राजनैतिक संबंध प्रस्थापित होणे त्यातील महत्त्वाचा टप्पा ठरतो, अशी प्रतिक्रिया इस्रायलचे परराष्ट्रमंत्री गाबी अश्‍केनाझी यांनी दिली. इस्रायल व भूतानदरम्यान गेल्या अनेक वर्षांपासून राजनैतिक संबंध प्रस्थापित करण्यासाठी गोपनीय पातळीवर चर्चा सुरू होती, अशी माहिती इस्रायलच्या परराष्ट्र विभागाने दिली. गेल्या आठवड्यात दोन देशांच्या परराष्ट्रमंत्र्यांदरम्यान झालेल्या चर्चेनंतर राजनैतिक संबंध प्रस्थापित करण्याच्या करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्याचेही परराष्ट्र विभागाने स्पष्ट केले.

भूतानने आतापर्यंत 54 देशांसह युरोपिय महासंघासह अधिकृत राजनैतिक संबंध प्रस्थापित केले आहेत. गेल्याच महिन्यात भूतानने जर्मनीबरोबर राजनैतिक संबंध स्थापित करण्याच्या करारावर स्वाक्षऱ्या केल्या होत्या. भारताशी अत्यंत जवळचे संबंध असलेल्या भूतानमध्ये गेल्या काही वर्षांपासून चीनच्या कुरापती सुरू असल्याचे समोर आले आहे. या पार्श्‍वभूमीवर भूतानने इस्रायलबरोबर राजनैतिक संबंध प्रस्थापित करण्याबाबत घेतलेला निर्णय लक्ष वेधून घेणारा ठरतो.

leave a reply