इराणवरील अमेरिकेच्या निर्बंधांना रशियाचा कायम विरोध असेल

- रशियन परराष्ट्रमंत्री सर्जेई लॅव्हरोव्ह

विरोध

मॉस्को – इराणच्या क्षेपणास्त्र कार्यक्रमाला सहाय्य करीत असल्याचा आरोप करून अमेरिकेने दोन आठवड्यांपूर्वी रशियाच्या कंपनीवर निर्बंध लादले होते. यामुळे खवळून उठलेल्या रशियाने इराणवरील अमेरिकेच्या निर्बंधांना कायम विरोध असल्याचे असे जाहीर केले आहे. त्याचबरोबर अमेरिकेच्या निर्बंधांना बगल देण्यासाठी रशिया आणि इराण नव्या पद्धतींचा वापर करतील, अशी घोषणा रशियाचे परराष्ट्रमंत्री सर्जेई लॅव्हरोव्ह यांनी केली.

इराणच्या आण्विक तसेच क्षेपणास्त्र कार्यक्रमावर सध्या अमेरिका व युरोपिय देश तसेच संयुक्त राष्ट्रसंघावर चिंता व्यक्त केली आहे. इराण आंतरराष्ट्रीय नियम तसेच 2015 सालच्या कराराचे उल्लंघन करून आण्विक व क्षेपणास्त्र कार्यक्रम राबवित असल्याची टीका अमेरिका व युरोपमधील तीन बडे देश ब्रिटन, फ्रान्स व जर्मनीने केली होती. अमेरिकेच्या कोषागार विभागाने इराणच्या क्षेपणास्त्र कार्यक्रमाशी संलग्न असलेल्या रशिया व चीनच्या पाच कंपन्यांवर निर्बंध लादले होते. तसेच येत्या काळात इराणवर अधिक निर्बंध लादले जातील, अशी घोषणाही अमेरिकेच्या कोषागार विभागाने केली आहे.

विरोध

अमेरिकेच्या या निर्बंधांवर चीनने याआधीच टीका केली. तर रशियाचे परराष्ट्रमंत्री लॅव्हरोव्ह यांनी इराणी माध्यमांशी बोलताना अमेरिकेच्या निर्बंधांचा इराणबरोबरच्या व्यवहारांवर परिणाम होऊ देणार नसल्याचे स्पष्ट केले. अमेरिकेने इराणवर लादलेल्या निर्बंधांना रशियाचा यापुढेही विरोध असेल, असे लॅव्हरोव्ह यांनी स्पष्ट केले. त्याचबरोबर या निर्बंधांना बगल देण्यासाठी आणि इराणबरोबरचे सहकार्य वाढविण्यासाठी रशियाचे प्रयत्न सुरू असतील, असेही परराष्ट्रमंत्री लॅव्हरोव्ह म्हणाले.

या निर्बंधांची पर्वा न करता इतर कुठल्याही देशापेक्षा रशियाने इराणबरोबर अब्जावधी डॉलर्समध्ये व्यापार केल्याचा दावा रशियन परराष्ट्रमंत्र्यांनी दिला. यासाठी लॅव्हरोव्ह यांनी इराणबरोबर झालेल्या गेल्या वर्षीच्या व यावर्षातील सहा महिन्यांच्या व्यापाराची माहिती दिली. 2019 साली रशिया आणि इराणमधील द्विपक्षीय व्यापारात 20 टक्क्यांपेक्षा अधिक वाढ झाली. तर या वर्षाच्या पहिल्या सहा महिन्यातील व्यापारात 8 टक्क्यांनी व्यापार वाढल्याचे लॅव्हरोव्ह म्हणाले.

इराणवरील अमेरिकेच्या निर्बंधांना बगल देण्यासाठी रशियाने याआधीच अमेरिकन डॉलर्समधील व्यवहार बंद केले आहेत. डॉलर्स ऐवजी राष्ट्रीय चलनाचा व्यापार केल्यामुळे आणि आर्थिक व्यवहारांच्या नव्या कल्पक योजना राबविल्यामुळे रशिया आणि इराण व्यापार सोपा झाल्याचे रशियाच्या परराष्ट्रमंत्र्यांनी सांगितले. त्याचबरोबर निर्बंध लादणाऱ्या पाश्‍चिमात्य देशांवर अवलंबून राहण्यात काहीच अर्थ नाही. त्यापेक्षा आंतरराष्ट्रीय नियमांचे पालन करणाऱ्या देशांवर भरवसा ठेवा, असे सांगून लॅव्हरोव्ह यांनी अमेरिका व युरोपिय देशांना अणुकरारावरील चर्चेचा नवा प्रस्ताव देणाऱ्या इराणला संकेत दिले.

leave a reply