चीनच्या सीमेवरील परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात

- भारतीय लष्करप्रमुखांची ग्वाही

नवी दिल्ली – चीनच्या सीमेवरील परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात असल्याची ग्वाही भारताच्या लष्करप्रमुखांनी दिली. असे असले तरी केवळ लडाखच नाही तर चीनच्या सीमेवर तैनात असलेल्या लष्कर व वायुसेनेच्या सर्वच तळांवर कमालीची सतर्कता दाखविली जात असून कुठल्याही क्षणी चीनच्या घुसखोरीला प्रत्युत्तर देण्याची तयारी भारतीय लष्कर व वायुसेनेने ठेवली आहे. लडाखच्या सीमेवर चिनी लष्कराच्या घुसखोरीच्या ही आधी पश्चिम, मध्य आणि पूर्व सीमेवर चिनी जवानांनी घुसखोरी केली होती. पण भारतीय सैनिकांनी वेळीच हा घुसखोरीचा डाव हाणून पाडला होता. त्यामुळे केवळ लडाखच नाही तर इतर ठिकाणी दोन्ही देशांचे सैन्य एकमेकांसमोर खडे ठाकले होते, अशा बातम्या येत आहेत.

China-Borderशुक्रवारी संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांनी लष्करप्रमुख, वायुसेनाप्रमुख आणि नौदलप्रमुखांची बैठक बोलावून देशाच्या सुरक्षेचा आढावा घेतला होता. तर शनिवारी लष्करप्रमुख जनरल नरवणे यांनी चीनलगतच्या सीमेवरील परिस्थिती नियंत्रणात असल्याचे सांगून देशाला आश्वस्त केले. चीनबरोबर सीमावाद निर्माण झालेला असताना आक्रमक व प्रक्षोभक विधाने करुन हा सीमावाद चिघळवयाचा नाही, अशी भारताची अधिकृत भूमिका आहे. चीन देखील अधिकृत पातळीवर आक्रमक विधाने करुन हा वाद पेटविण्याच्या स्थितीत नाही. मात्र भारतावर दडपण वाढवण्यासाठी चीन शक्य तितके प्रयत्न करीत असल्याचे समोर आले आहे. भारताने कलम 370 रद्द करुन लडाखला केंद्रशासित प्रदेश बनविले. यामुळे हा सीमावाद सुरु झाला, असा दावा पाकिस्तानातील चीनच्या दूतावासातील एका राजनैतिक अधिकांऱ्यानी केला आहे. पाकिस्तानातील चिनी दूतावासात कार्यरत असलेले वँग शियांगसेंग यांनी सोशल मीडियावर याबाबतची पोस्ट टाकून सीमावादाचे खापर भारतावरच फोडले. लडाखच्या गलवान व्हॅली आणि पँगोग सरोवर इथे चिनी लष्कराची घुखसोरी होण्याच्याही आधी इतर ठिकाणी चिनी लष्कराने भारतीय सीमेत घुसखोरीचा प्रयत्न करुन पाहिला होता. पण भारतीय सैनिकांनी चिनी जवानांना रोखले होते, अशा बातम्या समोर येऊ लागल्या आहेत. तसेच भारताच्या गुप्तचर विभागाने सीमेलगतच्या भूभागात सुरु असलेल्या चिनी लष्करांच्या हालचालींमध्ये संशयास्पदरीत्या वाढ झाल्याची नोंद केली होती. त्यानंतर चीनलगतच्या पश्चिम, मध्य आणि पूर्व सीमेवर भारतीय लष्कर तसेच वायुसेनेची सर्तकता वाढली आहे. कुठल्याही क्षणी चीनच्या घुसखोरीला उत्तर देण्याची तयारी लष्कर व वायुसेनेने ठेवली आहे.

भारताने सीमाभागात चीन इतकीच तैनाती करुन दिलेल्या प्रत्युत्तरामुळे या देशाच्या प्रचारमोहीमेत सर्वात महत्त्वाची भूमिका पार पडणारी चीनची सरकारी दैनिके बिथरली आहेत. त्यातल्या एका दैनिकात चीनी लष्कराला पर्वतीय क्षेत्रात प्रभावी ठरणारी ‘हॉवित्झर ‘, ‘पीसीएल-181’ तोफा मिळाल्याचे सांगून यामुळे चीनच्या मारकक्षमतेत वाढ झाल्याचे दावे केले आहेत. वजनाने हलकी असलेली ही तोफ पर्वतीय क्षेत्रात कुठेही सहजपणे तैनात केली जाऊ शकते, याचा विशेष उल्लेख चिनी दैनिकाने केला आहे. हा भारतावर दडपण टाकण्याच्या चीनच्या प्रयत्नांचा एक भाग ठरतो. यामुळे चीन भारतावर एकाचवेळी लष्करी व राजनैतिक दडपण वाढवून आपले सामर्थ्य सिद्ध करु पाहत आहेत. मात्र भारताने स्वीकारलेल्या कणखर धोरणांमुळे चीनच्या या प्रयत्नांना फारसे यश मिळू शकलेले नाही. घुसखोरी करणाऱ्या चिनी लष्कराला आज ना उद्या माघार घ्यावीच लागेल. यापेक्षा चीनकडे दुसरा पर्याय नाही, असे भारताचे माजी लष्करी अधिकारी व सामरिक विश्लेषक सातत्याने सांगत आहेत. त्याचवेळी अमेरिकेने या वादात आपण भारताच्या बाजूने उभे राहणार असल्याचा संदेश देऊन चीनला अधिकच अस्वस्थ केले होते. तर चीनला समज देण्यासाठी भारताने पाकिस्तानलगतच्या नियंत्रण रेषेवर अत्यंत आक्रमक भूमिका घेऊन कारवाई सुरु केली होती. यापासून चीनला योग्य तो संदेश मिळाला, याची भारताला खात्री होती. भारताचा हा अंदाज पूर्णपणे खरा ठरला आणि सुरुवातीला आक्रमकता दाखविणारा चीन पाकिस्तानला धडा शिकवल्यानंतर शांततेची भाषा करु लागला. कारण भारताने अधिक लष्करी आक्रमकता दाखविली तर पाकिस्तानातील आपली गुंतवणूक धोक्यात येईल, याची जाणीव चीनला झालेली आहे, असे भारताच्या एका माजी लष्करी अधिकाऱ्यांंनी म्हटले आहे.

leave a reply