चीनमध्ये कोरोनाचे साडेसहा लाख रुग्ण असल्याचा दावा – लष्करी विद्यापीठाच्या नोंदवहीतील माहिती उघड झाल्याने खळबळ

बीजिंग – कोरोनाव्हायरसच्या साथीमुळे चीनमध्ये ४,६३३ जणांचा बळी गेला तर ८२,९४१ कोरोनाबाधित आपल्या देशात असल्याचे चीनने घोषित केले होते. पण या साथीबाबत चीनने लपवाछपवी केल्याचे पुन्हा एकदा उघड झाले आहे. कोरोनाव्हायरसची साथ चीनच्या तब्बल २३० शहरांमध्ये पसरली होती व या साथीचे सुमारे साडेसहा लाख रुग्ण आढळले होते, अशी धक्कादायक माहिती समोर येत आहे. चीनच्या लष्करी विद्यापीठाच्या नोंदवहीमुळे ही खळबळजनक माहिती जगासमोर आली आहे.

चीनच्या हुनान प्रांतातील ‘नॅशनल युनिव्हर्सिटी ऑफ डिफेंस टेक्नोलॉजी’ हे लष्कराच्या नियंत्रणात असलेले विद्यापीठ आहे. या विद्यापीठाच्या नोंदवहीत कोरोनाविषयी दिलेली माहिती चीनचे पितळ उघडे पाडत असल्याचा दावा अमेरिकी व ब्रिटीश माध्यमे करीत आहेत. फेब्रुवारी ते एप्रिल महिन्यातील कोरोनाबाबतची नोंद यात करण्यात आली आहे. कोरोनाचे उगमस्थान असलेल्या वुहान शहराबरोबरच चीनच्या सुमारे २३० शहरांमध्ये ही साथ फैलावल्याचे यात नमूद करण्यात आले आहे. प्रत्येक दिवशी कोणत्या शहरात किती रुग्ण आढळले, याची नोंद यात असल्याचा दावा अमेरिकी माध्यमांनी केला आहे.

संबंधित शहरांमधील रुग्णालयेच नाही तर घरे, बंगले, हॉटेल्स, सुपरमार्केट, रेल्वे स्टेशन्स, शाळा, प्रार्थनास्थळे तसेच फास्टफूड स्टोअर्समध्येही कोरोनाचे रुग्ण सापडल्याचे यात म्हटले आहे. अशा ६,४०,००० हून अधिक नोंदी यात आहेत. यातील काही नोंदीत कोरोनाचे दोन किंवा त्याहून अधिक रुग्ण सापडल्याचे म्हटले आहे. तरीही या प्रत्येक नोंदीमागे कोरोनाचा एक रुग्ण जरी असेल तरी चीनमधील कोरोनाबाधितांची संख्या साडेसहा लाखांच्या जवळ जाते, असा दावा अमेरिकी व ब्रिटीश माध्यमांनी केला आहे. स्थानिकांच्या हवाल्याने विद्यापीठाने ही माहिती गोळा केली होती.

अमेरिकी माध्यमांनी या चिनी विद्यापीठाच्या संकेतस्थळावरुन देखील सदर नोंदवहीतील माहितीची खातरजमा करुन घेतल्याचे म्हटले आहे. सदर संकेतस्थळावर कोरोनाबाधितांची ठिकाणे दाखविणारा नकाशा देखील सापडला आहे. त्यामुळे चीनने जगापासून आपल्या देशातील कोरोनाग्रस्तांची व बळींची खरी माहिती दडविल्याचे या नोंदवहीमुळे समोर आले आहे. याआधी वुहानमधील डॉक्टर्स, व्यावसायिक, पत्रकार त्याचबरोबर वुहान प्रयोगशाळेतील संशोधिका आणि प्रसिद्ध लेखिका वँग वँग यांनी कोरोनाव्हायरसबाबतची खरी माहिती जगजाहीर करण्याचे प्रयत्न केले होते. चीनने हे दावे फेटाळले होते. पण आता फार काळ चीन याबाबत लपवाछपवी करू शकणार नाही, असे स्पष्टपणे दिसू लागले आहे.

अमेरिकेत कोरोनाव्हायरसचे सर्वाधिक बळी गेले असून अमेरिका याबाबत कुठल्याही प्रकारची लपवाछपवी करीत नाही, असे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी जाहीर केले होते. इतर देश मात्र कोरोनाच्या बळींची संख्या लपवीत आहेत, असा आरोप करून ट्रम्प यांनी चीन सर्वात आघाडीवर असल्याचा दावा केला होता. माध्यमांमध्ये आलेल्या या बातमीमुळे अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी चीनवर केलेल्या आरोपांना दुजोरा मिळत असल्याचे दिसते.

leave a reply