अमेरिकेकडून भारताला ‘रोमिओ’ हेलिकॉप्टर्स मिळणार – दोन्ही देशांमध्ये करारावर स्वाक्षऱ्या

नवी दिल्ली – भारतीय नौदलाच्या ताफ्यात अत्याधुनिक ‘एमएच-६०आर’ (रोमिओ) हेलिकॉप्टर्स लवकरच दाखल होतील. या हेलिकॉप्टर्ससाठी 90.5 कोटी डॉलर्सच्या करारावर भारत आणि अमेरिकेमध्ये स्वाक्षऱ्या झाल्या. पाणबुडीविरोधी युद्धतंत्रात अत्यंत प्रभावी ठरू शकणारी ही हेलिकॉप्टर्स भारतीय नौदलाच्या ताफ्यात दाखल झाल्यानंतर नौदलाच्या क्षमतेत प्रचंड वाढ होईल. हिंदी महासागर क्षेत्रात चीनच्या कारवाया आणि चिनी पाणबुड्यांचा वावर वाढलेला असताना भारतीय नौदलाला ही क्षमता प्राप्त करणे आवश्यक बनले होते. भारत अमेरिकेकडून घेत असलेली ही हेलिकॉप्टर्स चीनच्या वाढत्या हालचालींवर लक्ष ठेवून खरेदी करण्यात येत आहेत, असे विश्लेषकांचे म्हणणे आहे.

मुख्य म्हणजे हा व्यवहार थेट अमेरिकी नौदलाच्या देखरेखीखाली होत आहे. अमेरिकी नौदलाने ही हेलिकॉप्टर्स बनविणाऱ्या ‘लॉकहीड मार्टिन’ कंपनीला पहिल्या टप्प्यातील तीन ‘रोमिओ’ हेलिकॉप्टर्सच्या डिलिव्हरी प्रक्रियेला गती देण्याचे निर्देश दिल्याचे वृत्त आहे.

डिसेंबर महिन्यात अमेरिकेने भारताला २४ ‘रोमिओ’ ही बहुउद्देशीय हेलिकॉप्टर्सची विक्री करण्यास मंजुरी दिली होती. सुमारे २.६ अब्ज डॉलर्सच्या हा एकूण खरेदी व्यवहार असणार असून या व्यापक कराराचा भाग असलेल्या 90.5 कोटी डॉलर्सच्या करारावर दोन्ही देशांनी स्वाक्षऱ्या केल्या आहेत. गेल्यावर्षी एप्रिल महिन्यात या कराराबाबत प्रथम घोषणा करण्यात आली होती. ही हेलिकॉप्टरर्स सेंसर आणि कम्युनिकेशन सिस्टीम आणि हेलिफायर क्षेपणास्त्रे , एमके५४ टॉरपिडो आणि प्रिसिजन स्ट्राईक रॉकेट सिस्टिम्ससह भारताला मिळणार आहेत. मात्र हेलिकॉप्टर्सवर तैनात शस्त्रे आणि इतर यंत्रणेविषयी अजून वाटाघाटी सुरु आहेत, अशी माहिती समोर येते.

‘रोमिओ’ हेलिकॉप्टरमध्ये ‘नेव्हल स्ट्राईक मिसाईल’ (एनएसएम) यंत्रणा बसविण्यात आली आहे. एनएसएमद्वारे कुठल्याही युध्दनौकेला १८५ किलोमीटर अंतरावरून लक्ष्य करता येऊ शकते. यावरून या हेलिकॉप्टर्सची क्षमता लक्षात येईल. भारतीय नौदलाने १९७१ साली ब्रिटनकडून ‘सी किंग’ हेलिकॉप्टर्स खरेदी केली होती. हीच ‘सी किंग’ हेलिकॉप्टर्स सध्या नौदलाच्या ताफ्यात आहेत. भारत अमेरिकेकडून खरेदी करीत असलेली ‘एमएच-६०आर’ हेलिकॉप्टर्स ‘सी किंग’ची जागा घेतील. ‘रोमिओ’ हेलिकॉप्टर्स युद्धनौकांवर तैनात होण्यापूर्वी भारतीय नौदलाच्या वैमानिकांना आणि इंजिनिअर्सना याचे प्रशिक्षण दिले जाईल. यासाठी तीन हेलिकॉप्टर्स पहिल्या टप्प्यात भारताला देण्यात येणार आहेत. पुढीलवर्षीपर्यंत भारतीय नौदलाच्या ताफ्यात ही हेलिकॉप्टर्स दाखल होतील.

leave a reply