काही देश कोरोनाच्या संकटाचा गैरफायदा घेत आहेत

- भारताची चीन-पाकिस्तानवर सडकून टीका

नवी दिल्ली – ”कोरोनाव्हायरसच्या संकटाच्या काळात भारत इतर देशांना सहाय्य करीत असताना काही देश या संकटाचा गैरफायदा घेण्यात गुंतले आहेत. हे देश दहशतवाद पसरवित आहेत आणि आक्रमक धोरण राबवीत आहेत.”, अशा शब्दात संयुक्त राष्ट्रातील भारताचे प्रतिनिधी टी. एस. त्रिमूर्ती यांनी पाकिस्तान आणि चीन चे नाव न घेता देशांना लक्ष्य केले. ‘इंडिया यूएन डेव्हलपमेंट पार्टनरशिप फंड’च्या तृतीय वर्धापन दिनानिमित्त बैठकीत त्रिमूर्ती बोलत होते.

संकटाचा गैरफायदा

‘संघर्ष आणि संकटाच्या काळात भारताने नेहमीच सहकाऱ्याला प्राधान्य दिले आहे.’, असे त्रिमूर्ती म्हणाले. कोरोनाचे संकट इतर राष्ट्रांना मदत करण्याची संधी म्हणून भारत पाहतो असे भारताच्या पंतप्रधानांनी वारंवार म्हटले आहे, याची आठवण यावेळी त्रिमूर्ती यांनी करून दिली.

या संकटाच्या काळात भारताने दीडशे देशांना वैद्यकीय सहाय्य पुरवले आहे. भारताने एप्रिलमध्ये केवळ दोन आठवड्यात १00 देशांना ८.५ कोटी हायड्रॉक्सि क्लोरोक्वीन गोळ्या आणि ५० कोटि पॅरासिटॅमॉल गोळ्यांचा पुरवठा केला होता,असे यावेळी त्रिमूर्ती यांनी अधोरेखित केले. याशिवाय नेपाळ,जर्मनी, बांगलादेश, ब्राझील, अमेरिका,स्पेन, भूतान, अफगाणिस्तान, मालदीव, मॉरिशस, डॉमिनिक रिपब्लिक यासारख्या देशांना पुरवठा करण्यात आला. याशिवाय नेपाळ ला व्हेंटिलेटर पुरवण्यात आले असेही त्रिमूर्ती यांनी यावेळी सांगितले.

कोरोनाव्हायरसच्या संकटाच्या काळात काही देश गैरफायदा घेऊन दहशतवाद वाढवीत आहेत. आक्रमक धोरण अवलंबताना दिसत आहेत. इतर देशांना वैद्यकीय मदत पुरवून, आपली राष्ट्रीय आरोग्य क्षमता बळकट करून भारत अशा देशांना उत्तर देत असल्याची सडकून टीका त्रिमूर्ती यांनी केली. त्रिमूर्ती यांनी चीन पाकिस्तान चे नाव घेतले नसले, तरी त्रिमूर्ती यांनी पाकिस्तानची दहशतवाद्यांना पोषक धोरणे आणि चीनच्या आक्रमकतेवर निशाणा साधल्याचे स्पष्ट होते.

leave a reply