सीमेवरील यथास्थिती बदलण्याचा चीनचा प्रयत्न खपवून घेणार नाही

- संरक्षणमंत्री राजनाथ सिंग

नवी दिल्ली – मंगळवारी संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांनी भारत-चीनमधील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील घडामोडींबाबत सरकारची अधिकृत भूमिका नेमक्या आणि परखड शब्दात मांडली. ‘चीन प्रत्यक्ष नियंत्रण रेषा बदलण्याचा एकतर्फी प्रयत्न करुन उभय देशांमध्ये झालेल्या कराराचा भंग करत आहे. भारत ते कधीही खपवून घेणार नाही. आपल्या सार्वभौमत्त्वाशी भारत तडजोड करील, या भ्रमात कुणीही राहू नये’, अशा खणखणीत शब्दात संरक्षणमंत्र्यांनी चीनला इशारा दिला.

खपवून घेणार नाही

संसदेत बोलताना, राजनाथ सिंग यांनी सीमावाद सोडविण्यासाठी चीनबरोबर चर्चा सुरू असल्याचे सांगून वाटाघाटींद्वारे सीमावाद सोडविण्याचा भारताचा निर्धार व्यक्त केला. त्याचवेळी वरकरणी चर्चेचा आग्रह धरणारा चीन प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर घुसखोरी करुन भारताचा विश्वासघात करीत आहे, ही बाब संरक्षणमंत्र्यांनी संसदीय भाषेत मांडली. भारताचा गुप्तचर विभाग, लष्करी गुप्तचर यंत्रणा आणि सुरक्षेशी निगडीत असलेल्या इतर विभागांकडून प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर चीन प्रचंड प्रमाणात लष्कर व शस्त्रास्त्रे यांची जमवाजमव करीत असल्याचे उघड झाले. खबरदारीचा उपाय म्हणून भारतानेही प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील लष्करी तैनाती वाढविली, असे राजनाथ सिंग म्हणाले.

१५ जून रोजी चिनी लष्कराने केलेल्या हल्ल्यात कर्नल संतोष बाबू यांच्यासह २० जवान शहीद झाले. भारताच्या शूर सैनिकांनी इथे या संघर्षात सर्वोच्च बलिदान दिले, त्याचवेळी चीनची जबरदस्त हानी केली. या संघर्षात भारतीय सैनिकांनी जिथे शौर्य दाखविण्याची गरज होती, तिथे शौर्याचे प्रदर्शन केले व जिथे संयम दाखविण्याची गरज होती, तिथे संयम दाखविला, अशा शब्दात संरक्षणमंत्र्यांनी मुक्तकंठाने प्रशंसा केली.

खपवून घेणार नाही

२९-३० ऑगस्ट दरम्यान देखील चीनने प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील परिस्थिती बदलण्याचा प्रयत्न करुन पाहिला. भारताला राजनैतिक वाटाघाटीद्वारे चीनबरोबरील सीमावाद सोडवायचा आहे, पण भारत आपल्या सार्वभौमत्त्वाची तडजोड करणार नाही, याबाबत कोणालाही कुठल्याही प्रकारचा भ्रम होता कामा नये, असे राजनाथ सिंग यांनी सांगून चीनला खरमरीत इशारा दिला. प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील घडामोडींबाबत खूप काही बोलता येईल, पण माझी इच्छा असूनही सुरक्षेच्या कारणास्तव याबाबत अधिक बोलता येणार नाही, असे राजनाथ सिंग यांनी स्पष्ट केले. संरक्षणमंत्र्यांनी संसदेत केलेल्या या निवेदनाचे पडसाद चीनमध्ये उमटले आहेत.

चीनचे सरकारी मुखपत्र ग्लोबल टाईम्सने आपला देश शांतता आणि युद्ध दोन्हीसाठी तयार आहे, असा धमकीचा सूर लावला आहे. याआधी उत्तर कोरियासारख्या बेजबाबदार देशाकडून वापरली जाणारी भाषा आता चीनचे मुखपत्र वापरु लागले असून यातून कम्युनिस्ट राजवटीचे वैफल्य व्यक्त होत आहे. चीनचे लष्कर संयम दाखवित आहे, अन्यथा युद्ध पेटल्यास चिनी लष्कर भारताचा धुव्वा उडवतील, अशी दर्पोक्ती या वर्तमानपत्राने केली आहे.

प्रत्यक्षात भारतीय लष्कर प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर वर्चस्व गाजवित आहे आणि जगभरातील तटस्थ निरिक्षकांनी ही बाब मान्य केली आहे. भारतीय जनता आपल्या सैन्याच्या मागे ठामपणे उभी आहे आणि भारतीय सैन्याचा पराक्रम, मनोबल उच्चकोटीचे आहे. आपण स्वत: सीमाभागातील सैनिकांची भेट घेऊन चर्चा केली व याचा अनुभव घेतल्याचे संरक्षणमंत्र्यांनी संसदेत ठासून सांगितले होते. या दोन्ही गोष्टींचा अभाव चीनच्या लष्कराला भेडसावत आहे. म्हणूनच भारतीय सैनिकांबरोबर संघर्ष करण्यासाठी चीनने आपल्या लष्करी जवानांच्या ऐवजी गुन्हेगार, कैदी, बाक्सर्स, क्लब फायटर्स इत्यादींचा भरणा केला आहे. ही बाब चीनच्या लष्कराची मानसिकता व अव्यावसायिकता सार्‍या जगाला दाखवून देत आहे.

leave a reply