दक्षिण कोरियाकडून विमानवाहू युद्धनौकेसह २५० अब्ज डॉलर्सच्या ‘डिफेन्स प्लॅन’ची घोषणा

सेऊल – उत्तर कोरियाची आण्विक क्षमता व चीनच्या वाढत्या सागरी महत्त्वाकांक्षा यांच्या पार्श्वभूमीवर, दक्षिण कोरियाने स्वदेशी विमानवाहू युद्धनौकेचा समावेश असणाऱ्या २५२ अब्ज डॉलर्सच्या ‘डिफेन्स प्लॅन’ची घोषणा केली आहे. २०२१ ते २०२५ या पाच वर्षांच्या कालावधीसाठी तयार केलेल्या संरक्षण आराखड्यात, दरवर्षी संरक्षणखर्चात सहा टक्के वाढ करण्याची शिफारस करण्यात आली आहे. जपानने काही महिन्यांपूर्वी दोन विमानवाहू युद्धनौकांचे काम सुरू केले असून सिंगापूरनेही विमानवाहू युद्धनौका विकसित करण्याचे संकेत दिले आहेत.

'डिफेन्स प्लॅन'ची घोषणा

दक्षिण कोरियाच्या संरक्षण विभागाने सोमवारी ‘मिडटर्म डिफेन्स ॲक्विझीशन प्लॅन’ प्रसिध्द केला. त्यात ३० हजार टन क्षमता असणारी विमानवाहू युद्धनौका उभारण्याचा प्रस्ताव असून, ‘हुंदाई हेवी इंडस्ट्रीज’कडे त्याचा आराखडा तयार करण्याचे काम सोपविण्यात आले आहे. दक्षिण कोरियाकडून यापूर्वी विकसित करण्यात आलेल्या ‘डोकडो क्लास ॲम्फीबिअस ॲसॉल्ट शिप’चा आधार घेऊन नवी विमानवाहू युद्धनौका तयार करण्यात येणार आहे. ‘व्हर्टिकल टेक ऑफ अँड लँडिंग’ची क्षमता असणारी लढाऊ विमाने व अटॅक हेलिकॉप्टर्स नव्या विमानवाहू युद्धनौकेवर तैनात असतील, अशी माहिती डिफेन्स प्लॅनमध्ये देण्यात आले आहे. ‘लाईट एअरक्राफ्ट कॅरिअर’ प्रकारातील ही विमानवाहू युद्धनौका २०३० सालापर्यंत दक्षिण कोरियाच्या नौदलात सामील होईल, अशी अपेक्षा संरक्षण विभागाने व्यक्त केले आहे.

दक्षिण कोरियाने गेल्यावर्षी अमेरिकेकडून २० ‘एफ-३५बी’ लढाऊ विमाने खरेदी करण्याचा निर्णय घेतला होता. हा निर्णय नव्या विमानवाहू युद्धनौकेवर तैनातीच्या तयारीनेच घेण्यात आला, असा दावा सूत्रांनी केला आहे. विमानवाहू युद्धनौकेबरोबरच नवीन स्वदेशी बनावटीची विनाशिका तसेच आण्विक पाणबुडीही विकसित करण्याचे प्रयत्न दक्षिण कोरियाने सुरू केले आहेत. त्याचवेळी दीर्घ पल्ल्याची क्षेपणास्त्रे, क्षेपणास्त्रभेदी यंत्रणा, अँटी शिप मिसाईल्स व स्वतंत्र नेव्हिगेशन सिस्टीम यांचा उल्लेखही संरक्षण विभागाच्या आराखड्यात आहे. या सर्वांसाठी तब्बल २५२.७ अब्ज डॉलरची तरतूद करण्यात येणार आहे.

'डिफेन्स प्लॅन'ची घोषणा

१९५०-६० च्या दशकात झालेल्या कोरियन युद्धानंतर दक्षिण कोरिया व अमेरिकेमध्ये सामरिक करार करण्यात आला होता. त्यानुसार दक्षिण कोरियाच्या संरक्षणाची जबाबदारी अमेरिकेने स्वीकारली आहे. सध्या अमेरिकेचे २८ हजारांहून अधिक सैनिक दक्षिण कोरियातील तळांवर तैनात आहेत. करारानुसार, युद्धकाळात दक्षिण कोरियाच्या संरक्षणदलांचे नियंत्रण अमेरिकेकडे आहे. २०२२ सालानंतर हे नियंत्रण पुन्हा दक्षिण कोरियाकडे येण्याचे संकेत असून, या पार्श्वभूमीवर, संरक्षण विभागाने घोषित केलेला डिफेन्स प्लॅन लक्ष वेधून घेणारा ठरतो.

दक्षिण कोरियाला सध्या मुख्य धोका उत्तर कोरियाने तयार केलेली अण्वस्त्रे व दीर्घ पल्ल्याच्या क्षेपणास्त्रांचा आहे. उत्तर कोरियाने त्याचा वापर केल्यास विमानवाहू युद्धनौकेसह सुसज्ज असणारे नौदल दक्षिण कोरियाला ‘सेकंड स्ट्राईक कॅपेबिलिटी’चा पर्याय उपलब्ध करून देऊ शकते, असा दावा विश्लेषकांनी केला आहे.

leave a reply