दहशतवादी व त्यांच्या समर्थकांवर कठोर कारवाईखेरीज पर्याय नाही

- इस्रायलच्या पंतप्रधानांची घोषणा

तेल अविव – दहशतवाद्यांवर अधिक तीव्रतेचे हल्ले चढविणे हाच दहशतवादावरील सर्वोत्तम उपाय ठरतो. पुढच्या काळात इस्रायल पूर्व जेरूसलेम व वेस्ट बँकमधील दहशतवादी व दहशतवाद्यांना साथ देणाऱ्यांवर कठोर कारवाई करील. दहशतवाद्यांचे नागरिकत्त्व काढून घेऊन त्यांची हकालपट्टी करण्याच्या योजनेवरही इस्रायल विचार करीत आहे. त्याचबरोबर या देशातील आपली मूळे अधिकाधिक घट्ट करण्यासाठी इस्रायलचे सरकार आक्रमक प्रयत्न करील, असे पंतप्रधान बेंजामिन नेत्यान्याहू यांनी म्हटले आहे.

रविवारी पार पडलेल्या इस्रायली मंत्रिमंडळाच्या बैठकीत पंतप्रधान नेत्यान्याहू यांनी ही घोषणा केली. शुक्रवारी जेरूसलेममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात तीन इस्रायलींचा बळी गेला होता. यात सहा व आठ वर्षांच्या मुलांचा समावेश आहे. इस्रायलच्या सरकारने पूर्व जेरूसलेममधील ज्यूधर्मियांच्या वस्त्यांच्या बांधकामाला वेग दिल्यानंतर पॅलेस्टिनी दहशतवाद्यांचे हल्ले अधिकच तीव्र झाले होते. मात्र दहशतवाद्यांच्या हल्ल्यानंतर या वस्त्यांचे बांधकाम अधिकच वाढविले जाईल, असे इस्रायलच्या पंतप्रधानांनी म्हटले आहे.

दहशतवाद्यांच्या विरोधात कारवाई करताना इस्रायली सुरक्षा दलांना अधिक अधिकार दिले जातील. तसेच दहशतवादी व त्यांना सहाय्य करणाऱ्यांचे नागरिकत्त्व काढून घेऊन त्यांची हकालपट्टी करण्यावरही इस्रायलचे सरकार गंभीरपणे विचार करीत असल्याचे पंतप्रधान नेत्यान्याहू यांनी स्पष्ट केले. तर इस्रायलचे अंतर्गत सुरक्षामंत्री इत्मार बेन-ग्वीर यांनी 150 संशयित दहशतवाद्यांची चौकशी करताना, त्यांना अटक करताना व त्यांची घरे पाडताना देखील इस्रायलच्या सुरक्षा यंत्रणांनी कचरू नये, असे वादग्रस्त विधान केले आहे.

बेन-ग्वीर यांच्या या विधानांवर इस्रायलमध्येच टीका सुरू झाली आहे. पंतप्रधान बेंजामिन नेत्यान्याहू यांनी बेन-ग्वीर यांना ताबडतोब या पदावरून काढून टाकावे, अशी मागणी इस्रायलच्या काही नेत्यांनी केली. इस्रायलमध्ये एकामागोमाग एक दहशतवादी हल्ले होत असताना, बेन-ग्वीर अशी चिथावणीखोर विधाने करून परिस्थिती अधिकच चिघळवत असल्याचा आरोप देखील या नेत्यांनी केला आहे. मात्र कुठल्याही परिस्थितीत दहशतवादी हल्ले खपवून घेणार नाही व दहशतवाद्यांवर कारवाई करताना कुणाच्याही दबावाची पर्वा केली जाणार नाही, असे आक्रमक धोरण इस्रायलच्या पंतप्रधानांनी स्वीकारलेले आहे. इस्रायली मंत्रिमंडळाच्या बैठकीतही पंतप्रधान नेत्यान्याहू यांनी आक्रमक भूमिका स्वीकारून दहशतवाद्यांसह इस्रायलमधील उदारमतवादी नेत्यांना देखील इशारा दिल्याचे दिसत आहे.

leave a reply