इराणच्या राष्ट्राध्यक्षांचा शत्रूदेशांना इशारा

-इराणमध्ये निदर्शने घडविणारे अपयशी ठरल्याचा दावा

तेहरान – इराणमध्ये झालेल्या इस्लामी राज्यक्रांतीला 44 वर्ष पूर्ण झाली. या निमित्ताने राजधानी तेहरानमध्ये आयोजित केलेल्या भव्य समारोहात इराणच्या राष्ट्राध्यक्षांनी देशाच्या ‘शत्रूंना’ इशारा दिला. इराणच्या राजवटीविरोधात सुरू असलेल्या निदर्शनांमागे शत्रूदेशांचा हात आहे व त्यांनीच इराणच्या काही तरुणांची दिशाभूल करून निदर्शने पेटविल्याचा आरोप राष्ट्राध्यक्ष रईसी यांनी केला. मात्र तेहरानच्या आझादी स्क्वेअरमध्ये एकत्र झालेला प्रचंड जनसमुदाय म्हणजे इराणचा आवाज आहे, तो इराणच्या शत्रूंनी ऐकायला हवा, असे इब्राहिम रईसी यांनी म्हटले आहे. अणुकार्यक्रमावर पाश्चिमात्य देशांशी चर्चा करणारे इराणचे प्रतिनिधी ‘अली बाघेरी कानी’ यांनी देखील निदर्शनांचा वापर करून इराणवर दडपण टाकण्याचा पाश्चिमात्य देशांचा डाव फसल्याचा दावा केला आहे.

हिजाबसक्तीच्या विरोधात इराणमध्ये सुरू झालेल्या आंदोलनाचे रुपांतर राजवटीविरोधातील आंदोलनात झाले. या आंदोलनातील बळींची संख्या साडेपाचशेच्या जवळ पोहोचली असून इराणच्या सुरक्षा दलाचे 70 जण देखील यात ठार झाले आहेत. अटक झालेल्या निदर्शकांची संख्या 20 हजारावर असल्याचे सांगितले जाते. इराणच्या सुरक्षा यंत्रणांनी निर्दयपणे कारवाई करून ही निदर्शने मोडून काढण्याचा प्रयत्न केला. पण अजूनही यात सुरक्षा दलांना पूर्णपणे यश मिळालेले नाही. अशा परिस्थितीत आंदोलन करणाऱ्या महिला निदर्शकांवर इराणच्या सुरक्षा दलांच्या जवानांनी लैंगिक अत्याचार केल्याच्या धक्कादायक बातम्या समोर येत आहेत. याचे फार मोठे पडसाद उमटण्याची शक्यता आहे.

या पार्श्वभूमीवर, शनिवारी पार पडलेल्या इराणमधील इस्लामी राज्यक्रांतीला 44 वर्ष पूर्ण झाली व या निमित्ताने भव्य कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. इराणची राजधानी तेहरानमधील आझादी स्क्वेअरमध्ये मोठा जनसमुदाय इराणच्या राजवटीची पाठराखण करण्यासाठी जमा झाला होता. या समुदायाला राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रईसी यांनी संबोधित केले व हा इराणचा खरा आवाज असल्याचे सांगून शत्रूदेशांनी हा आवाज ऐकावा, असे रईसी म्हणाले. इराणमध्ये सुरू असलेली निदर्शने म्हणजे अमेरिका व इस्रायलसह पाश्चिमात्यांनी आखलेल्या कारस्थानांचा भाग असल्याचा घणाघाती आरोप यावेळी राष्ट्राध्यक्ष रईसी यांनी केला.

इराक व अफगाणिस्तानसारख्या देशांमध्ये पाश्चिमात्यांनी अराजक माजविले. पण इराणमध्ये तसाच प्रयोग करण्याचा पाश्चिमात्यांचा डाव होता. मात्र इराणने हे कारस्थान हाणून पाडले, असे राष्ट्राध्यक्ष रईसी म्हणाले. तसेच इराणमध्ये मानवाधिकारांचे हनन होत असल्याच्या आरोपांनाही रईसी यांनी उत्तर दिले. पाश्चिमात्य देशांपेक्षा मानवाधिकारांच्या आघाडीवर इराण खूपच पुढे असल्याचा दावा रईसी यांनी केला.

दरम्यान, तेहरानमधील समुदायाला टेलिकॉन्फरन्स द्वारे संबोधित करीत असलेल्या राष्ट्राध्यक्ष रईसी यांच्या या भाषणात एका मिनिटाचा व्यत्यय आला आणि या काळात इराणच्या राजवटीचा विनाश होवो, अशा घोषणा देणारी व मास्क परिधान केलेली माहिला या भाषणाच्या मध्येच इराणच्या जनतेसमोर आली. काही हॅकर्सनी हे घडवून आणल्याचा दावा केला जातो. याआधीही आंतरराष्ट्रीय हॅकर्सचे गट इराणमधील निदर्शकांच्या बाजूने उभे असून ते इराणच्या राजवटीला लक्ष्य करीत असल्याचे समोर आले होते.

पाश्चिमात्य देशांनी इराणवर दडपण टाकण्यासाठी निदर्शनांचा वापर करून पाहिल्याचा ठपका इराणचे प्रतिनिधी अली बाघेरी कानी यांनी केला. पण पाश्चिमात्यांचा हा डाव देखील फसल्याचे सांगून पाश्चिमात्य देशांनी इराणची क्षमता जोखण्यात फार मोठी चूक केल्याचा टोला अली बाघेरी कानी यांनी लगावला आहे.

leave a reply