पाकिस्तानच्या लष्करप्रमुखांच्या दौऱ्यात गिलगीटमध्ये जोरदार निदर्शने

हुंझा (पीओके) – पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल कमर जावेद बाजवा हे पाकव्याप्त काश्मीरच्या दौऱ्यावर असताना गिलगीटमध्ये जोरदार निदर्शने झाली आहेत. गिलगीट-बाल्टिस्तानच्या जनतेच्या विरोधात काम करणाऱ्या पाकिस्तानी प्रशासनाला आव्हान देणाऱ्या बाबा जान या नेत्यासह इतर तेरा जणांना सोडण्यात यावे, अशी मागणी निदर्शकांनी करीत होते. नुकतेच पाकिस्तानच्या इम्रान खान सरकारने गिलगिट-बाल्टिस्तानला आपला पाचवा प्रांत घोषित करण्याची तयारी करून येथे निवडणुकांची घोषणा केली आहे. याला पीओके आणि गिलगीट-बाल्टिस्तानमधून जोरदार विरोध होत आहे. या पार्श्वभूमीवर जनरल बजावा पीओके दौऱ्यावर असताना झालेली ही निदर्शने लक्षवेधी ठरतात.

पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल बाजवा यांनी मंगळवारी गिलगिटमध्ये सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजी पार्कचे उद्घाटन केले. त्याचवेळी अलिबाद हुंजा या भागात जोरदार निदर्शने झाली. विशेष म्हणजे या निदर्शनांमध्ये पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्या ‘पाकिस्तान तेहरीक-ए-इंसाफ (पीटीआय) या पक्षांच्या कार्यकर्त्यांसह ‘पाकिस्तान पीपल्स पार्टी’ (पीपीपी), ‘पाकिस्तान मुस्लिम लीग-नवाज’ (पीएमएल-एन) या पक्षांच्या कार्यकर्ते सहभागी झाले होते. तसेच स्थानिक धार्मिक नेते, संघटना आणि पाकिस्तानी लष्कराकडून ताब्यात घेण्यात आलेल्या कार्यकर्त्यांच्या कुटुंबीयांनीही भाग घेतला होता. या सर्वांनी काराकोरम हायवे जाम केला आणि पाकिस्तानी लष्कर आणि सरकार विरोधात जोरदार घोषणा दिल्या.

निदर्शने

पाकिस्तानी लष्कराचे अत्याचार आणि पाकिस्तानी सरकारच्या पीओकेतील जनतेच्या हिताविरोधातील धोरणांना आव्हान देणारे गिलगिटमधील नेते बाबा जान यांच्यासह १४ जणांचे पाकिस्तानी लष्कराने २०११ साली अपहरण केले होते. या सर्वांना नंतर जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात आली होती. या १४ जणांना सोडून द्यावे यासाठी ही निदर्शने झाली. मात्र जनरल बाजवा यांचा दौरा सुरू असताना झालेल्या या निदर्शनांकडे ताज्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर पाहिले जात आहे.

पाकिस्तान सरकारने गिलगीट-बाल्टिस्तान मध्ये नुकत्याच निवडणुका जाहीर केल्या आहेत. गिलगिट बाल्टिस्तानलाआपला पाचवा प्रांत घोषित करून हा भाग गिळण्याचा प्रयत्न करत आहे. या निर्णयाला पीओके आणि गिलगीट-बाल्टिस्तानमधील जनता जोरदार विरोध करत आहे. पाकिस्तान विरोधात असंतोष खदखदत आहे. पाकिस्तान बाहेर असलेले जगभरातील गिलगीट-बाल्टिस्तानचे कार्यकर्ते येथील जनता भारतात सामील होण्यास इच्छुक असल्याचे दावे करीत आहेत आणि येथील जनतेला प्राण्यांप्रमाणे वागविणाऱ्या पाकिस्तानवर सडकून टीका करत आहेत.

निदर्शने

चीनला आंदण देण्यासाठी पाकिस्तान गिलगीट-बाल्टिस्तानला पाचवा प्रांत घोषित करीत असल्याचे आरोप होत आहेत. इम्रान खान सरकारच्या या निर्णयाचा त्यांच्या पक्षातूनही जोरदार विरोध होत आहे. या पार्श्वभूमीवर जनरल बाजवा यांच्या दौऱ्यादरम्यान झालेली ही निदर्शने पाकिस्तान लष्करासाठी इशाराघंटा ठरत आहेत.

दरम्यान, पीओकेचे कथित पंतप्रधान राजा फारूक हैदर यांच्याविरोधात पाकिस्तानात राजद्रोहाचा गुन्हा दाखल झाला आहे. पाकिस्तानविरोधात कट रचल्याची तक्रार करण्यात आली आहे. पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांनी नुकतीच लंडनमधून आपल्या पक्षाच्या सदस्यांची व्हिडीओ कॉन्फरन्स बैठक घेतली होती. यामध्ये त्यांनी पाकिस्तानी लष्करावर जोरदार तोफ डागली होती. या बैठकीत राजा फारुकी हे सुद्धा सहभागी झाले होते. माजी पंतप्रधान शरीफ यांनी पाकिस्तानी लष्कराला काही जळजळीत प्रश्न विचारले होते. त्यानंतर शरीफ यांच्यासह पीएमएल-एनच्या सर्वच प्रमुख नेत्यांवर लाहोरमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये राजा राजा फारूक यांचाही समावेश आहे. या गुन्ह्याबाबत पाकिस्तानचे पंतप्रधान आणि त्यांच्या पक्षाचे नेते आपल्याला काही माहित नसल्याचे दाखवत असले तरी, हा गुन्हा त्यांच्याच पक्षाच्या स्थानिक नेत्यांनी दाखल केल्याचे समोर आले आहे.

leave a reply