चीनने तैवानचा ताबा घेण्याचा प्रयत्न करू नये

- अमेरिकेचा इशारा

वॉशिंग्टन – पहिल्या महायुद्धापूर्वी जर्मन नौदलाने ब्रिटनच्या ‘रॉयल नेव्ही’ला आव्हान देण्यासाठी आपले सामर्थ्य मोठ्या प्रमाणात वाढवले होते. चीनही त्याच प्रमाणात नौदल सामर्थ्य वाढवीत असून त्या जोरावर अमेरिकेला पॅसिफिकमधून माघार घेण्यास भाग पाडून तैवानवर आक्रमण करण्याची चीनची योजना असल्याचे अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार रॉबर्ट ओब्रायन यांनी बजावले. मात्र तैवानबाबतच्या अमेरिकेच्या धोरणाकडे लक्ष वेधून चीनने असा प्रयत्न करू नये, असा खरमरीत इशाराही त्यांनी दिला. यावेळी अमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांनी, तैवानने चीनचा मुकाबला करण्यासाठी संरक्षणखर्च वाढविण्याची गरज असल्याचा सल्लाही दिला.

तैवानचा ताबा

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर चीनची सत्ताधारी कम्युनिस्ट राजवट साऊथ चायना सी तसेच ईस्ट चायना सी क्षेत्रातील काही भागांवर ताबा मिळविण्याचा प्रयत्न करेल, असा इशारा अमेरिकेच्या वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांनी मे महिन्यात दिला होता. हा इशारा देण्यापूर्वी तसेच त्यानंतरच्या काळात चीनकडून तैवानविरोधातील हालचाली जास्तच वाढल्याचे दिसून येते. मे महिन्याच्या अखेरीस चीनमध्ये झालेल्या एका बैठकीत कम्युनिस्ट पार्टीच्या वरिष्ठ नेत्यांनी तसेच लष्करी अधिकाऱ्यांनी तैवानवर हल्ला चढवण्यासाठी हीच वेळ योग्य असल्याची आग्रही भूमिका मांडली होती. तैवानचे परराष्ट्रमंत्री जोसेफ वु यांनीही चीनची सत्ताधारी राजवट विविध पातळ्यांवर अपयशी ठरली असून, त्या अपयशापासून जनतेचे लक्ष विचलित करण्यासाठी तैवानला बळीचा बकरा बनवून त्यावर हल्ला चढविला जाऊ शकतो, असे बजावले होते.

तैवानचा ताबाअमेरिकेच्या सुरक्षा सल्लागारांनी दिलेल्या इशाऱ्याला गेल्या दोन महिन्यात चीनने तैवानच्या सीमेनजीक एकामागोमाग केलेले सराव, लढाऊ विमानांची घुसखोरी व धमक्या यांची पार्श्वभूमी आहे. यावेळी सुरक्षा सल्लागारांनी ब्रिटन व जर्मनीसह पहिल्या महायुद्धाचा दिलेला संदर्भ लक्ष वेधून घेणारा ठरला आहे. ‘”चीनने आपल्या नौदल क्षमतेत प्रचंड प्रमाणात वाढ केली आहे. पहिल्या महायुद्धापूर्वी जर्मनीने ब्रिटनच्या रॉयल नेव्हिला आव्हान देण्यासाठी आपले नौदल सामर्थ्य वाढविले होते. त्यानंतरच्या काळात कोणत्याही देशाने आपल्या नौदलाची क्षमता इतक्या मोठ्या प्रमाणात वाढवली नव्हती. चीनच्या या हालचालींमागे अमेरिकेला पश्चिम पॅसिफिक महासागरातून माघारी ढकलण्याचा डाव आहे. त्यानंतर ‘अँम्फीबियस लँडिंग’ने तैवानवर आक्रमण करून तो ताब्यात घेण्याची चीनची योजना आहे”, असे अमेरिकी सल्लागारांनी बजावले.

चीन व तैवानमध्ये १५० किलोमीटर्सहून अधिक अंतर आहे आणि ही बाब लक्षात घेतली तर चीनसाठी ‘अँम्फीबियस लँडिंग’ची योजना खूपच कठीण ठरेल, अशा सूचक शब्दात ओब्रायन यांनी चीनला समज दिली. ‘तैवानवर आक्रमण करणे सोपे नाही, हे लक्षात ठेवा. चीनने तैवानवर हल्ला केल्यास अमेरिका त्याला कसे प्रत्युत्तर देईल याबाबतच्या अमेरिकेच्या धोरणातही संदिग्धता आहे’, या शब्दात अमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांनी चीनला इशारा दिला. तैवानच्या सुरक्षेबाबत अमेरिकेने स्वीकारलेले धोरण ‘स्ट्रॅटेजिक अँबिगिटी’ म्हणून ओळखण्यात येते. या धोरणानुसार, चीनने तैवानवर हल्ला चढविल्यास त्याला अमेरिका कसेही व कोणत्याही प्रकारे प्रत्युत्तर देऊ शकते.

तैवानचा ताबा

नेव्हाडा युनिव्हर्सिटीत झालेल्या कार्यक्रमात ओब्रायन यांनी, तैवानला चीनविरोधात संरक्षणसज्जता वाढविण्याचा सल्लाही दिला. ‘चीन गेली सात दशके सातत्याने लष्करी सामर्थ्य वाढवित असताना, जीडीपीच्या केवळ १.२ टक्के संरक्षणखर्च करून चीनला रोखता येणार नाही, याची तैवानने जाणीव ठेवावी’, असे अमेरिकी सल्लागारांनी सांगितले. त्याचवेळी तैवानने लष्करीदृष्ट्या स्वतःला काटेरी साळिंदराप्रमाणे बनवावे, असा सल्लाही त्यांनी दिला. सिंहाला काटेरी साळिंदर खायला आवडत नाही, हे लक्षात ठेवा, या शब्दात ओब्रायन यांनी तैवानला चीनला रोखण्याबाबत संकेत दिले.

दरम्यान, तैवानमधील विरोधी पक्ष ‘केएमटी’ने मांडलेल्या नव्या प्रस्तावां वरून चीनने धमकावले आहे. तैवानने चीनला रोखण्यासाठी अमेरिकेचे सहाय्य घ्यावे आणि अमेरिकेबरोबर अधिकृत पातळीवर राजनैतिक संबंध प्रस्थापित करावेत, असे प्रस्ताव ‘केएमटी’ने मंजूर केले आहेत. ‘केएमटी’ हा चीनसमर्थक पक्ष म्हणून ओळखण्यात येत असल्याने या पक्षाने घेतलेली भूमिका लक्ष वेधून घेणारी ठरली आहे. चीनकडून यावर तीव्र प्रतिक्रिया उमटली असून, तैवानच्या स्वातंत्र्यासंदर्भातील कोणतेही प्रयत्न खपवून घेतले जाणार नसल्याचे चीनच्या प्रवक्त्यांनी बजावले आहे. तर आता तैवानला धडा शिकविण्यासाठी पूर्ण सज्ज होऊन युद्ध करणे हा एकच पर्याय राहिल्याचा इशारा चिनी प्रसारमाध्यमांकडून देण्यात आला आहे.

 

leave a reply