मजबूत व एकजूट असलेले पॅसिफिक क्षेत्र सर्वांच्याच हिताचे

- ‘पॅसिफिक आयलंड फोरम’मध्ये ऑस्ट्रेलियाच्या परराष्ट्रमंत्र्यांची ग्वाही

फिजी – चीनच्या विस्तारवादी कारवाया व वाढत्या हस्तक्षेपाच्या पार्श्वभूमीवर पॅसिफिक क्षेत्रातील बेटदेशांचा गट असणाऱ्या ‘पॅसिफिक आयलंडस्‌‍ फोरम’ची बैठक नुकतीच पार पडली. या बैठकीला ऑस्ट्रेलियाची उपस्थिती लक्ष वेधून घेणारी ठरली. बैठकीदरम्यान, एकजूट असलेले व मजबूत पॅसिफिक क्षेत्र सर्वांच्याच हिताचे ठरेल अशी ग्वाही ऑस्ट्रेलियाच्या परराष्ट्रमंत्री पेनी वाँग यांनी दिली. अमेरिका व चीन यांच्यात पॅसिफिक क्षेत्रातील वर्चस्वावरून सुप्त संघर्ष सुरू असून या पार्श्वभूमीवर फिजीत झालेली बैठक आणि ऑस्ट्रेलियन मंत्र्यांचे वक्तव्य महत्त्वाचे ठरते.

गेल्या वर्षी किरिबाती या बेटदेशाने चीनबरोबर अधिकृत राजनैतिक संबंधांना मान्यता दिली होती. त्यानंतर सदर देश ‘पॅसिफिक आयलंडस्‌‍ फोरम’मधून बाहेर पडला होता. त्यापाठोपाठ चीनने सॉलोमन आयलंडस्‌‍ या बेटदेशाबरोबर सुरक्षाविषयक करार करण्यात यश मिळविले होते. गेल्या काही वर्षात चीनने पॅसिफिक क्षेत्रातील बेटदेशांना कोट्यावधी डॉलर्सचे अर्थसहाय्य पुरविले असून त्या जोरावर त्यांना अंकित करून घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत. गेल्या वर्षी मे महिन्यात चीनने १० पॅसिफिक बेटदेशांबरोबर व्यापार व सुरक्षाविषयक कराराचा प्रस्ताव पुढे रेटला होता. मात्र अमेरिका व ऑस्ट्रेलियाने बेटदेशांना आश्वस्त करीत सदर करार उधळण्यात यश मिळविले.

त्यानंतरही चीनकडून पॅसिफिक क्षेत्रात वर्चस्व मिळविण्याच्या हालचाली सुरू आहेत. चीनच्या युद्धनौका, मासेमारी करणारी जहाजे तसेच लढाऊ विमानांचा या क्षेत्रातील वावर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. चिनी कंपन्यांकडून छोटी बेटे (आईसलेटस्‌‍) ताब्यात घेण्याचे प्रयत्नही सुरू आहेत. चीनच्या या कारवाया ऑस्ट्रेलिया व जपानसह अमेरिकेला अस्वस्थ करणाऱ्या ठरल्या आहेत. त्यामुळे या देशांनी पॅसिफिक बेटदेशांना चीनपासून लांब ठेवण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. ऑस्ट्रेलियाच्या परराष्ट्रमंत्री पेनी वाँग यांनी गेल्या नऊ महिन्यात पॅसिफिक क्षेत्रातील १५ बेटदेशांना भेटी दिल्या आहेत.

पॅसिफिक आयलंडस्‌‍ फोरमसाठी फिजीतील उपस्थिती ही वाँग यांनी फिजीला भेट देण्याची तिसरी वेळ ठरते. याच महिन्यात त्यांनी किरिबातीलाही भेट दिली होती. या भेटींच्या माध्यमातून ऑस्ट्रेलिया पॅसिफिक देशांना आपल्या बाजूला खेचण्यासाठी प्रयत्न करीत असल्याचे दिसते. फोरममधील उपस्थिती व त्यात केलेले वक्तव्यही त्याचाच भाग दिसत आहे.

leave a reply