उत्तर कोरियाकडून चार क्रूझ क्षेपणास्त्रांची चाचणी

- सात दिवसांमधील तिसरी क्षेपणास्त्र चाचणी

प्योनग्यँग/सेऊल – उत्तर कोरियाने गुरुवारी चार क्रूझ क्षेपणास्त्रांची चाचणी घेतली. अमेरिका व दक्षिण कोरिया उत्तर कोरियाच्या वाढत्या धोक्यांरविरोधात ‘सिम्युलेशन एक्सरसाईज’ करीत असतानाच ही चाचणी घेण्यात आली. उत्तर कोरियाने क्षेपणास्त्र चाचणी करण्याची गेल्या सात दिवसांमधील ही तिसरी घटना आहे. या नव्या चाचणीवर जपान व दक्षिण कोरियाने तीव्र टीकास्त्र सोडले आहे. उत्तर कोरियाच्या चाचण्या या चिथावणीखोर कारवाया असल्याचे या देशांनी बजावले.

गुरुवारी उत्तर कोरियाच्या ईशान्य भागात असलेल्या हॅमग्याँग प्रांतातील किनारपट्टीवरून क्रूझ क्षेपणास्त्रे डागण्यात आली. अणुहल्ला झाल्यास त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी क्षेपणास्त्रे कशी कार्यरत करता येतील याची चाचणी घेण्यासाठी सदर क्षेपणास्त्रे डागण्यात आल्याची माहिती उत्तर कोरियाच्या वृत्तसंस्थेने दिली आहे. या चारही क्षेपणास्त्रांनी जवळपास तीन प्रवास केल्याचे तसेच दोन हजार किलोमीटर्सवरील लक्ष्य भेदल्याचा दावाही करण्यात आला आहे. उत्तर कोरियाने डागलेली क्षेपणास्त्रे ‘हवसाल-२’ असल्याचे सांगण्यात येते.

गुरुवारी केलेली चाचणी ही गेल्या सात दिवसांमध्ये घेण्यात आलेली तिसरी तर नव्या वर्षातील चौथी चाचणी ठरली आहे. यापूर्वी १ जानेवारीला उत्तर कोरियाने छोट्या पल्ल्याच्या तीन बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांची चाचणी घेतली होती. त्यानंतर गेल्या आठवड्यात शनिवारी आंतरखंडीय बॅलिस्टिक क्षेपणास्त्राची चाचणी घेण्यात आली. सोमवारी २० फेब्रुवारीला उत्तर कोरियाने आपल्या पूर्व किनारपट्टीवरील तळावरून एकापाठोपाठ एक अशी दोन बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे डागली होती. दोन्ही क्षेपणास्त्रांचा पल्ला ३३५ ते ४०० किलोमीटर्सच्या दरम्यान होता व लाँचर्सच्या सहाय्याने क्षेपणास्त्रे प्रक्षेपित करण्यात आली होती.

काही दिवसांपूर्वीच उत्तर कोरियाचा हुकूमशहा किम जाँग-उन याने आपल्या लष्कराला युद्धाची तयारी करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर दोन दिवसांनी उत्तर कोरियन लष्कराचे सर्वात मोठे संचलन पार पडले होते. या संचलनात ११ आंतरखंडीय बॅलिस्टिक व एक द्रव-इंधनावर आधारीत लांब पल्ल्याचे क्षेपणास्त्र पहिल्यांदाच प्रदर्शित करण्यात आले होते. उत्तर कोरियाच्या हुकूमशाही राजवटीतील हे आत्तापर्यंतचे सर्वात मोठे लष्करी सामर्थ्यप्रदर्शन ठरले होते. या प्रदर्शनानंतर दक्षिण कोरिया, जपान तसेच अमेरिकेतील माध्यमांनी उत्तर कोरियाच्या वाढत्या धोक्याकडे लक्ष वेधले होते.

या पार्श्वभूमीवर, गेल्या सात दिवसांमध्ये घेण्यात आलेल्या सलग चाचण्यांमुळे उत्तर कोरियाच्या आक्रमकतेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. गेल्या काही दिवसांपासून उत्तर कोरियाने अमेरिका व दक्षिण कोरियात होणाऱ्या युद्धसरावाविरोधात धमकावण्यास सुरुवात केली होती. नुकताच उत्तर कोरियाने अमेरिका व दक्षिण कोरिया या दोन्ही देशांना गंभीर परिणामांचा इशारा दिला होता. अमेरिका आणि दक्षिण कोरियातील युद्धसराव म्हणजे आपल्यावरील हल्ल्याची पूर्वतयारी असल्याचा आरोप उत्तर कोरियाने केला होता. या सरावाला उत्तर कोरिया प्रत्युत्तर देईल, असेही बजावण्यात आले होते. नव्या चाचण्या त्याचाच भाग दिसत आहे.

जपान व दक्षिण कोरिया या दोन्ही देशांनी क्षेपणास्त्र चाचणीबद्दल निषेध व्यक्त केला आहे. गेल्याच आठवड्यात दक्षिण कोरियाने उत्तर कोरियाचा शत्रूदेश व सर्वात मोठा धोका असा उल्लेख करणारा ‘डिफेन्स रिपोर्ट’ प्रसिद्ध केला होता. त्यात उत्तर कोरियाच्या अण्वस्त्रांसह बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांच्या धोक्याकडे लक्ष वेधण्यात आले होते. उत्तर कोरिया थेट अमेरिकेपर्यंत मारा करणाऱ्या क्षेपणास्त्रांची चाचणी घेऊन या क्षेत्रातील तणाव वाढवीत आहे. उत्तर कोरियाच्या क्षेपणास्त्र चाचण्या व सज्जता अमेरिकेच्या सुरक्षा यंत्रणांना आव्हान देऊ शकतात, अशी चिंता अमेरिकन माध्यमे व विश्लेषकांनी व्यक्त केली आहे.

leave a reply