अहमदनगरच्या रुग्णालयातील आगीत ११ रुग्णांचा दुर्दैवी मृत्यू

- सहा जणांची स्थिती गंभीर

अहमदनगर – महाराष्ट्रात अहमदनगरमधील जिल्हा सामान्य रुग्णालयाला लागलेल्या आगीत आयसीयूमध्ये कोरोनावर उपचार घेत असलेल्या ११ रुग्णांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. तर सहा जणांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती मिळत आहे. पंतप्रधानांनी या घटनेबद्दल दु:ख व्यक्त केले आहे. तसेच राज्य सरकारने मृतांच्या नातेवाईकांना ५ लाखांची मदत जाहीर केली आहे.

अहमदनगरच्या रुग्णालयातील आगीत ११ रुग्णांचा दुर्दैवी मृत्यू - सहा जणांची स्थिती गंभीरशनिवारी सकाळी ११ च्या सुमारास अहमदनगरच्या जिल्हा सामान्य रुग्णालयातील कोरोनाचे रुग्णांवर उपचार सुरू असलेल्या अतिदक्षता विभागात आग लागली. अतिदक्षता विभागातून आगीचे व धुराचे लोट बाहेर पडत असल्याचे लक्षात आल्यावर ताबडतोब येथील रुग्णांना हलविण्याचे काम सुरू झाले. यावेळी आयसीयूमधील ऑक्सिजन पुरवठा बंद करावा लागला. ऑक्सिजन पुरवठा खंडीत झाल्याने, तर काही रुग्णांचा धुरामुळे गुदमरून मृत्यू झाल्याचा निष्कर्ष काढला जात आहे. तसेच काही रुग्णांवर जळाल्याचे व्रणही सापडले आहेत. आग लागली त्यावेळी कोरोना रुग्णांसाठी राखीव आयसीयू विभागात २५ जण उपचार घेत होते.

आगीचे निश्‍चित कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पण प्राथमिक तपासानंतर ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागल्याचे सांगितले जाते. या घटनेचा संपूर्ण चौकशीचे आदेश राज्य सरकारने दिले आहेत. गेल्या दीड वर्षात राज्यात विविध रुग्णालयात आगीच्या अशा घटनांची नोंद झाली आहे. मुंबईत भांडूप, मुलूंड, विरारमध्ये आगीच्या घटना घडल्या आहेत. बीड, नागपूर, भंडारामधील रुग्णालयात आगीच्या मोठ्या घटना घडल्या होत्या. त्यावेळीही रुग्णालयातील अग्नीसुरक्षेच्या मुद्यावर प्रश्‍न उपस्थित झाले होते.

leave a reply