इस्रोच्या ‘एलव्हीएम३’चे यशस्वी प्रक्षेपण

- ३६ उपग्रह अंतराळात सोडले

श्रीहरिकोट्टा – उपग्रह प्रक्षेपणाच्या आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत भारताच्या इस्रोने आपले स्थान अधिकच भक्कम केले आहे. रविवारी सकाळी ९ वाजता इस्रोने ब्रिटनच्या ‘वन वेब ग्रूप कंपनी’चे तब्बल ३६ उपग्रह प्रक्षेपित केले. या साऱ्या उपग्रहांकडून सिग्नल मिळू लागल्याची माहिती या कंपनीने दिली. यासाठी इस्रोने ‘एलव्हीएम३’ रॉकेटचा वापर केला व याला मिळालेले यश खूपच महत्त्वाचे मानले जाते. कारण इस्रोच्या गगनयान मोहीमेसाठी असेच रॉकेट वापरले जाणार आहे. पंतप्रधानांनी या यशासाठी इस्रोचे अभिनंदन केले.

इस्रोच्या ‘एलव्हीएम३’चे यशस्वी प्रक्षेपण - ३६ उपग्रह अंतराळात सोडलेश्रीहरिकोट्टा येथील सतीश धवन स्पेस सेंटरमधील प्रक्षेपण तळावरून रविवारी सकाळी ९ वाजता ‘एलव्हीएम३’ रॉकेट ३६ उपग्रह घेऊन आकाशात झेपावले. नियोजित वेळेनुसार या रॉकेटपासून १६ उपग्रह वेगळे झाले व त्यानंतर उरलेले उपग्रह देखील आपल्या कक्षेत स्थिर झाल्याची माहिती इस्रोने दिली. भारताची अंतराळ संशोधन संस्था इस्रोची व्यवसायिक शाखा असलेल्या ‘न्यू स्पेस इंडिया लिमिटेड-एनएसआयएल’द्वारे हे प्रक्षेपण करण्यात आले.

ब्रिटनच्या वन वेब कंपनीने इस्रोबरोबर ७२ उपग्रह प्रक्षेपित करण्याचा करार केला होता. यापैकी ३६ उपग्रह गेल्या वर्षी २३ ऑक्टोबर रोजी प्रक्षेपित करण्यात आले होते. रविवारी उरलेले ३६ उपग्रह प्रक्षेपित करण्यात आले आहेत. इस्रोच्या ‘एनएसआयएल’ला मिळालेले हे फार मोठे यश ठरते. या प्रक्षेपणातून इस्रोला तब्बल ११०० कोटी रुपयांचा महसूल मिळणार असल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या आहेत.

उपग्रह प्रक्षेपणाच्या बाजारपेठेत भारताने आपले स्थान अधिकच भक्कम केले असून यामुळे देशाची आत्मनिर्भरता अधिकच ठळकपणे समोर आल्याचे पंतप्रधान मोदी यांनी म्हटले आहे. तर इस्रोचे प्रमुख एस. सोमनाथ यांनी या यशासाठी सर्वच संशोधक व तंत्रज्ञांचे अभिनंदन केले असून त्यांच्या अथक परिश्रमाची प्रशंसा केली.

या प्रक्षेपणामुळे इस्रोच्या गगनयान मोहिमेसाठीचा आत्मविश्वास अधिकच वाढल्याचा दावा सोमनाथ यांनी केला. गगनयान मोहिमेसाठी ‘एलव्हीएम३’ सारखेच रॉकेट वापरले जाणार आहे. त्यामुळे रविवारच्या प्रक्षेपणाला मिळालेले यश अतिशय महत्त्वाचे ठरते, असा दावा केला जातो.

उपग्रह प्रक्षेपणाची बाजारपेठ २०२२ सालापर्यंत १६.७ अब्ज डॉलर्सवर होती. २०२७ सालापर्यंत ही बाजारपेठ २९ अब्ज डॉलर्सच्याही पुढे जाईल, अशी माहिती देणारा अहवाल काही काळापूर्वी प्रसिद्ध झाला होता. अशा परिस्थितीत इस्रोला मिळालेले हे घवघवीत यश लक्षणीय ठरते. युक्रेनच्या युद्धानंतर निर्माण झालेली परिस्थिती लक्षात घेता, इस्रो उपग्रह प्रक्षेपणाच्या बाजारपेठेत ‘स्पेस एक्स’ या आघाडीच्या कंपनीशीही स्पर्धा करील, असा विश्वास विख्यात उद्योग सुनील मित्तल यांनी व्यक्त केला आहे.

हिंदी

 

leave a reply