अमेरिकेच्या हवाई हल्ल्यावर सिरिया व इराणचे टीकास्त्र

तेहरान – अमेरिकेने सिरियात चढविलेल्या हवाई हल्ल्यात १९ जण ठार झाले होते. यावर सिरिया व इराणची तीव्र प्रतिक्रिया आली आहे. अमेरिकेचे हे हल्ले म्हणजे आपल्या सार्वभौमत्त्वाचे उल्लंघन असल्याचा ठपका सिरियन सरकारने ठेवला आहे. तर इराणने सिरियामध्ये आपले लष्करी सल्लागार असून सिरियन सरकारच्या विनंतीनुसार ते या देशात असल्याचा दावा केला. अशा स्थितीत अमेरिकेचे इराणच्या हितसंबंधांवरील हे हल्ले खपवून घेता येणार नाहीत, असे सांगून इराणच्या सरकारने याला प्रत्युत्तर देण्याचा इशारा दिला आहे.

अमेरिकेच्या हवाई हल्ल्यावर सिरिया व इराणचे टीकास्त्सिरियातील अमेरिकेच्या लष्करी तळावर झालेल्या ड्रोन हल्ल्यात अमेरिकी कंत्राटदार ठार झाला होता. तसेच या हल्ल्यात अमेरिकेचे पाच जवान जखमी झाले होते. याचे तीव्र पडसाद अमेरिकेत उमटले. शत्रूदेशांना आता अमेरिकेचा धाक वाटेनासा झाला आहे आणि याला राष्ट्राध्यक्ष बायडेन यांचे बोटचेपे धोरण जबाबदार असल्याची टीका अमेरिकेच्या विरोधी पक्षनेत्यांनी केली होती. ही टीका होत असतानाच, अमेरिकेने सिरियाच्या देर अल-झोर भागात हवाई हल्ले चढवून १९ जणांचा बळी घेतला. याबरोबरच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बायडेन यांनी इराणला धमकावले होते.

अमेरिकेला इराणशी संघर्ष करायचा नाही. पण वेळ आलीच, तर अमेरिका इराणवर कारवाई करताना कचरणार नाही, असे राष्ट्राध्यक्ष बायडेन यांनी बजावले होते. त्यानंतर अमेरिकेच्या हल्ल्यावर सिरिया तसेच इराणच्या सरकारने प्रतिक्रिया दिली. आयएस या दहशतवादी संघटनेवर कारवाईच्या नावाखाली अमेरिका सिरियात हल्ले चढवित आहे. पण प्रत्यक्षात अमेरिकेला सिरियाच्या साधनसंपत्तीची विशेषतः नैसर्गिक इंधनाची लूट करायची आहे, अशी जळजळीत टीका सिरियन सरकारने केली. तर इराणच्या सरकारने अमेरिकेच्या या हल्ल्याला प्रत्युत्तर देण्याची इशारा दिला.

सिरियन सरकारच्या विनंतीनुसार इराणचे लष्करी विश्लेषक या देशात आहेत. याच्या व्यतिरिक्त इराणची सिरियामध्ये लष्करी तैनाती नाही, असा निर्वाळा इराणच्या सरकारने दिली. अशा परिस्थितीत अमेरिकेने सिरियामधील इराणच्या नागरिकांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न केलाच, तर त्याला प्रत्युत्तर मिळाल्यावाचून राहणार नाही, असे इराणने बजावले आहे. दरम्यान, सिरियाच्या देर अल-झोरमध्ये अमेरिकेने चढविलेल्या हवाई हल्ल्याचे आदेश राष्ट्राध्यक्ष बायडेन यांनी दिले होते, अशी माहिती संरक्षणमंत्री ऑस्टिन लॉईड यांनी दिली होती. त्यानंतर राष्ट्राध्यक्ष बायडेन यांनी इराणला थेट इशारा दिला. हे सारे राष्ट्राध्यक्ष बायडेन कमकुवत असल्याच्या व इराणबाबतचे त्यांचे धोरण कचखाऊ असल्याच्या आरोपांना प्रत्युत्तर देण्यासाठीच असल्याचे संकेत मिळत आहेत.

हिंदी

 

leave a reply