खाजगी कंपनीकडून विकसित पहिल्या क्रायोजेनिक इंजिनची चाचणी यशस्वी

बंगळुरू – ‘स्कायरुट एअरोस्पेस’ या हैदराबादस्थित अंतराळ तंत्रज्ञानाविषयक स्टार्टअप कंपनीने क्रायोजेनिक इंजिन बनविले आहे. ३डी प्रिंटींग तंत्रज्ञानाचा वापर करून विकसित करण्यात आलेल्या या क्रायोजेनिक इंजिनाची गुरुवारी घेण्यात आलेली चाचणी यशस्वी ठरली. कंपनीने या क्रायोजेनिक इंजिनाचे नाव ‘धवन-१’ असे ठेवले आहे. भारतात अवकाश तंत्रज्ञानाचा पाया मजबूत करणारे संशोधक सतिश धवन यांच्या सन्मानार्थ कंपनीने क्रायोजेनिक इंजिनाला हे नाव दिले आहे.

खाजगी कंपनीकडून विकसित पहिल्या क्रायोजेनिक इंजिनची चाचणी यशस्वीदेशातील खाजगी कंपनीने विकसित केलेल्या पहिल्या क्रायोजेनिक इंजिनाची चाचणी यशस्वी झाली आहे. गेल्यावर्षी ‘स्कायरुट एअरोस्पेस’ने रमण नावाच्या रॉकेट इंजिनाची चाचणी घेतली होती. हे इंजिनही ३डी प्रिंटींग तंत्रज्ञानाच्या मदतीने तयार करण्यात आले होते. हे रॉकेट इंजिन खाजगी कंपनीने विकसित केलेले देशातील पहिले रॉकेट इंजिन ठरले होते. यानंतर या स्टार्टअप कंपनीने ३डी प्रिटिंग तंत्रज्ञानाच्या सहाय्याने क्रायोजेनिक इंजिन तयार करून आणखी एक मान पटकावला आहे.

नागपूर येथील सोलार इंडस्ट्रियल लिमिटेडमध्ये या क्रायोजेनिक इंजिनाची चाचणी पार पडली. कंपनीने तयार केलेले ‘धवन-१’ क्रायोजेनिक इंजिन लिक्विड नॅचरल गॅस (एलएनजी) आणि लिक्विड ऑक्सिजन (एलओएक्स) या दोन रॉकेट प्रोपेलन्टवर काम करते. कंपनीकडून भारताच्या अंतराळ कार्यक्रमाचे संस्थापक विक्रम सराभाई याच्या नावाने उपग्रह प्रक्षेपणासाठी रॉकेटची साखळी विकसित केली जात आहे. यापैकी विक्रम-२ ऑर्बिटरच्या प्रोपल्शन तंत्रज्ञानाची क्षमताही या चाचणीतून दाखवून दिली. ३डी प्रिंटिंग तंत्रज्ञानाच्या सहाय्याने क्रायोजेनिक इंजिन विकसित करण्याचा कार्यक्रम कंपनीने गेल्यावर्षी हाती घेतला होता. हे इंजिन रॉकेटसाठी अतिशय प्रभावी प्रोपल्शन यंत्रणा असल्याचा आणि उणे १५० डिग्री सेल्सियस तापमानातही काम करू शकत असल्याचा दावा केला जात आहे.

गेल्यावर्षी अंतराळ क्षेत्रात काम करणार्‍या खाजगी कंपन्यांसाठी भारत सरकारने हे क्षेत्र खुले केले होते. यानुसार कित्येक देशी व परदेशी कंपन्यांनी या क्षेत्रात गुंतवणूक सुरू केली आहे. भारतात या क्षेत्रात गुंतवणूक करणार्‍या भारतीय कंपन्यांना इस्रोच्या सुविधांचा लाभ घेता येणार आहे. ‘स्कायरुट एअरोस्पेस’ सप्टेंबर महिन्यातच यासंदर्भात इस्रोबरोबर करार केला होता. इस्रोबरोबर अशा प्रकारचा करार करणारी ‘स्कायरुट एअरोस्पेस’ पहिली भारतीय कंपनी ठरली होती. दरम्यान, कंपनी पुढील वर्षी विक्रम साखळीतील पहिले प्रक्षेपण यान ‘विक्रम-१’ची चाचणी घेणार आहे.

leave a reply