पॅसिफिक क्षेत्रातील ‘सॉलोमन आयलंड’वर चीनच्या विरोधात हिंसक निदर्शने

- ऑस्ट्रेलियाकडून लष्कर तैनात

‘सॉलोमन आयलंड’कॅनबेरा/हॉनिआरा/बीजिंग – पॅसिफिक क्षेत्रातील चीनधर्जिणी राजवट असणार्‍या ‘सॉलोमन आयलंड’वर हिंसक दंगली भडकल्या आहेत. चीनच्या दबावाखाली येऊन तैवानशी संबंध तोडणार्‍या पंतप्रधान मनासेह सोगावारे यांच्याविरोधात सुरू झालेल्या आंदोलनाचे रुपांतर दंगलीत झाल्याचे सांगण्यात येते. हिंसक जमावाने राजधानी हॉनिआरामधील ‘चायनाटाऊन’ भागासह सरकारी कार्यालये व पोलीस स्टेशनला लक्ष्य करीत पेटवून दिली आहेत. परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेल्याची माहिती मिळाल्यानंतर ऑस्ट्रेलियाने आपले पोलिसदल तसेच लष्करी तुकडी ‘सॉलोमन आयलंड’वर तैनात केल्याची माहिती पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांनी दिली.

गेल्या काही वर्षात चीन ‘इंडो-पॅसिफिक’सह संपूर्ण पॅसिफिक महासागरात आपला प्रभाव वाढविण्यासाठी जोरदार हालचाली करीत आहे. त्यासाठी चीनने आपल्या आर्थिक बळाचा वापर सुरू केला होता. पॅसिफिक क्षेत्रातील आठ ‘आयलंड नेशन्स’ना जवळपास दोन अब्ज डॉलर्सचे अर्थसहाय्य व कर्ज दिल्याचे विविध अहवालांमधून समोर आले होते. दोन वर्षांपूर्वी चीनच्या राजवटीने ‘सॉलोमन आयलंड’मधील सरकारला तैवानबरोबरील राजनैतिक संबंध तोडण्यास भाग पाडले होते. त्यानंतर ‘सॉलोमन आयलंड’चा भाग असणार्‍या ‘तुलागी आयलंड’वर चिनी कंपनीने ताबा मिळविला होता.

‘सॉलोमन आयलंड’या घटना ‘सॉलोमन आयलंड’च्या जनतेमधील वाढत्या नाराजीचे कारण ठरल्या आहेत. पंतप्रधान सोगावारे सातत्याने चीनधर्जिणे निर्णय घेत असून स्थानिक जनतेच्या हितसंबंधांकडे दुर्लक्ष करीत आहेत, असे आरोप सुरू झाले आहेत. तैवानबरोबर राजनैतिक संबंध असताना देशातील सामान्य जनतेला मोठ्या प्रमाणात लाभ मिळाले होते. मात्र आता सामान्य जनतेच्या सुविधांकडे दुर्लक्ष होत असल्याचे सांगण्यात येत असून त्याविरोधात तीव्र असंतोष निर्माण झाला आहे. याच असंतोषातून मलैटा आयलंड भागातील निदर्शकांनी बुधवारी थेट देशाच्या संसदेवर धडक मारली.

‘सॉलोमन आयलंड’निदर्शक संसदेपर्यंत आल्याने सरकारने संचारबंदीची घोषणा केली. मात्र ही संचारबंदी धुडकावून निदर्शकांनी आक्रमक पवित्रा घेतला गुरुवारी राजधानी हॉनिआरामधील ‘चायनाटाऊन डिस्ट्रिक्ट’मध्ये दुकाने, कार्यालये, सरकारी इमारती तसेच पोलिस स्टेशनवर हल्ले करून जाळपोळ करण्यात आली. स्थानिक पोलिसांनी परिस्थिती हाताबाहेर गेल्याचे म्हटले आहे. या पार्श्‍वभूमीवर पंतप्रधान सोगावरे यांनी ऑस्ट्रेलियाशी संपर्क साधून सहाय्याची मागणी केली. त्यानंतर गुरुवारी ऑस्ट्रेलियाने आपले १००हून अधिक पोलीस तसेच लष्करी जवानांचा समावेश असलेली तुकडी ‘सॉलोमन आयलंड’मध्ये धाडली.

‘सॉलोमन आयलंड’मधील चीनच्या दूतावासाने देशातील हिंसक घटनांवर तीव्र चिंता व्यक्त केली आहे. ऑस्ट्रेलियाच्या तैनातीनंतर पंतप्रधान सोगावारे यांनी देशाची सूत्रे आपल्याकडेच असून परिस्थितीवर नियंत्रण मिळविण्यात येत असल्याचे म्हटले आहे. ‘सॉलोमन आयलंड’वरील चीनविरोधी दंगली हा आंतरराष्ट्रीय पातळीवर चीनच्या कारवायांविरोधात येणार्‍या तीव्र प्रतिक्रियेचा भाग असल्याचा दावा विश्‍लेषकांकडून करण्यात येत आहे.

leave a reply