मारक क्षमता वाढलेल्या ‘ब्रह्मोस’ची यशस्वी चाचणी

बालासोर – बुधवारी भारताने ‘ब्रह्मोस’ या सुपरसोनिक क्रूझ क्षेपणास्त्राच्या आधुनिक आवृत्तीची यशस्वी चाचणी घेतली. आधुनिक आवृत्तीत ‘ब्रह्मोस’ची मारक क्षमता वाढविण्यात आली असून हे क्षेपणास्त्र ४०० किलोमीटरच्या लक्ष्याचा अचूक वेध घेण्यास सक्षम आहे. चीनबरोबर तणाव असताना भारताने सुपरसोनिक ‘ब्रह्मोस’, ‘आकाश’, ‘निर्भय’ ही काही क्षेपणास्त्रे लडाखच्या सीमेवर तैनात केली आहेत. अशावेळी ‘ब्रह्मोस’ची घेण्यात आलेली चाचणी महत्वाची ठरते. संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांनी ब्रह्मोस क्षेपणास्त्राच्या यशस्वी चाचणीबद्दल ‘संरक्षण संशोधन आणि विकास संस्थे’चे (डीआरडीओ) अभिनंदन केले आहे.

'ब्रह्मोस'

‘संरक्षण संशोधन आणि विकास संस्थे’ने (डीआरडीओ) ओडिशातील बालासोर येथे बुधवारी सकाळी साडेदहा वाजता ‘ब्रह्मोस’ क्षेपणास्त्राच्या विस्तारित मारक क्षमता असलेल्या आवृत्तीची यशस्वी चाचणी घेतली. ब्रह्मोस सुपरसोनिक क्षेपणास्त्राच्या विस्तारित श्रेणीची आतापर्यंत घेण्यात आलेली ही दुसरी चाचणी आहे. ब्रह्मोसच्या विकसित आवृत्तीत या क्षेपणास्त्राची मारक क्षमता २९० वरून ४०० किलोमीटरपर्यंत वाढविण्यात आली आहे.

आवाजाच्या तिप्पट वेगाने लक्ष्याचा भेद घेणाऱ्या या क्षेपणास्त्राचे एअरफ्रेम आणि बूस्टर स्वदेशी आहेत. ह्या क्षेपणास्त्राची निर्मिती डीआरडीओ आणि रशियन कंपनी एनपीओएमने बनविले असून प्रथमच स्वदेशी बूस्टरद्वारे हे क्षेपणास्त्र डागण्यात आले आहे. ब्राम्होसची ही अत्याधुनिक आवृत्ती जमिनीसोबत युध्दनौका, पाणबुडी आणि लढाऊ विमानांमधून डागता येऊ शकते.

‘ब्रह्मोस’ हे भारताचे सर्वात अत्याधुनिक आणि घातक क्षेपणास्त्र असून जगातील सर्वात वेगवान सुपरसोनिक क्रूझ क्षेपणास्त्र मानले जाते. ब्रह्मोस हवेतून हवेत आणि हवेतून जमिनीवर मारा करण्यास सक्षम आहे.. या क्षेपणास्त्राचे वैशिष्टय म्हणजे ‘सुखोई-३० एमकेआय’ या लढाऊ विमानामधूनही हे क्षेपणास्त्र डागता येऊ शकते.

भारतीय संरक्षण दलाच्या तीनही विभागाकडे ‘ब्रह्मोस’ क्षेपणास्त्र आहेत. बुधवारी ब्रह्मोसच्या या विस्तारित आवृतीच्या यशस्वी चाचणीमुळे संरक्षण दलाचे सामर्थ्य वाढणार आहे. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनीही ब्रह्मोस सुपरसोनिक क्रूझ क्षेपणास्त्राच्या यशस्वी उड्डाण चाचणीसाठी डीआरडीओचे अभिनंदन केले आहे. “या कामगिरीमुळे भारताच्या आत्मनिर्भर भारत मोहिमेला चालना मिळेल,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

leave a reply