महाराष्ट्रात ‘कॉंगो’ फिवरबाबत सतर्कतेचा इशारा

पालघर – कोरोनाव्हायरसचे देशभरात थैमान सुरू असताना ‘क्रिमियन कॉंगो हेमोरेजिक फिवर'(सीसीएचएफ) या साथीच्या आजाराचा राज्यात फैलाव होईल, असा इशारा देण्यात आला आहे. प्राण्यांमधून माणसाला संसर्ग होऊ शकणारा हा साथीचा रोग गुजरातमध्ये पसरत असल्याचे लक्षात आले आहे. येथे काही गुरांना याची लागण झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे गुजरातला लागून असलेल्या महाराष्ट्राच्या जिल्ह्यांमधून हा रोग राज्यात दाखल होण्याची भीती व्यक्त केली जाते.

'कॉंगो'

सध्या गुजरातच्या बोताड आणि कच्छ जिल्ह्यात ‘कांगो फिवर’ या साथीच्या आजारांचे रूग्ण वाढत असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे गुजरातच्या सीमेला लागून असलेल्या पालघरमध्ये या कॉंगो तापासंदर्भात अलर्ट जारी केला आहे. जिल्ह्यातील पशूसंवर्धन आयुक्त कार्यालयांमार्फत याबाबतचे परिपत्रक जारी करण्यात आले आहे. ‘गुजरातमधील काही भागात अशा तापाची काही प्रकरणे आढळली आहेत. आता हा ताप महाराष्ट्रातील सीमा भागात पसरण्याची शक्यता आहे. पालघर हे गुजरातच्या वलसाड जिल्ह्याला लागून आहे. तसेच नंदूरबार, धुळे, जळगाव हे जिल्हेही गुजरात सीमेला लागून असून या जिह्यांमध्ये गुजरातमधून गुरांची वाहतूक होते. यामुळे महाराष्ट्रात हा रोग शिरकाव करू शकतो, अशी भीती व्यक्त केली जाते.

या पार्श्वभूमीवर गुजरात सीमेवरून महाराष्ट्र सीमेवर जनावरे आणण्याबाबत योग्य तपासणीचे आदेश देण्यात आले आहेत अशी माहिती पालघर पशुसंवर्धन विभागाचे उपायुक्त डॉ. प्रशांत कांबळे यांनी दिली आहे. ‘कांगो फिवर’ हा आजार जनावरांमार्फत मानवाला होणारा आजार आहे. हा आजार ‘नॅरो व्हायरस’ विषाणू हायग्लोमा या जातीच्या गोचिडाद्वारे एका जनावरापासून दुसऱ्या जनावराला व बाधित जनावरांमार्फत मानवामध्ये पसरतो. पाळीव जनावरांमार्फत याचा मोठ्या प्रमाणात प्रसार होतो. जनावरांमध्ये या आजाराची लक्षणे दिसून येत नाही. पण अशा बाधित जनावरांच्या संपर्कात येणाऱ्या मानवाला या आजाराची लागण होण्याची दाट शक्यता असते. यापूर्वी कॉंगो, दक्षिण आफ्रिका, चीन, हंगेरी, ईराण या देशांमध्ये या आजाराचे उद्रेक पाहायला मिळाले आहेत.

मानवाला आजाराची लागण झाल्यानंतर या आजाराच्या प्रसाराबाबत माहिती न मिळाल्यास किंवा वेळेवर उपचार न मिळाल्यास ३० टक्के रुग्णांच्या जीवाला धोका उद्भवू शकतो. कॉंगो तापाचा मृत्यू दर १०-४० टक्के आहे. बाधित रूग्णाला डोकेदुखी, जास्त ताप येणे, सांधेदुखी, पोटदुखी, उलटी आदी लक्षणे दिसून येतात. आजार जास्त बळावल्यास नाक व लघवीतून रक्तस्राव ही लक्षणे आढळतात. या आजारांवर कोणतीही लस उपलब्ध झालेली नाही. त्यामुळे प्रभावी प्रतिबंधात्मक उपाययोजना हाच सर्वोत्तम उपाय आहे.

leave a reply