सोमालियाची राजधानी मोगादिशुतील आत्मघाती स्फोटात पाचजणांचा बळी

मोगादिशुमोगादिशु – सोमालियातील ‘अल शबाब’ या दहशतवादी संघटनेने राजधानी मोगादिशुत घडविलेल्या आत्मघाती स्फोटात पाच जणांचा बळी गेला असून १४जण अधिक जखमी झाले आहेत. बळींमध्ये दोन तुर्की नागरिकांचा समावेश असून चार तुर्की नागरिक जखमी झाले आहेत. हल्ल्यात सोमालियन लष्कराच्या तीन जवानांचाही बळी गेला. सोमालियातील अमेरिकेच्या सैन्यमाघारीनंतर झालेला हा पहिला दहशतवादी हल्ला ठरला आहे.

गेल्या दशकभरात तुर्कीचे राष्ट्राध्यक्ष रेसेप एर्दोगन यांनी सोमालियातील प्रभाव वाढविण्यासाठी जोरदार हालचाली चालविल्या असून जवळपास एक अब्ज डॉलर्सहून अधिक गुंतवणूक केली आहे. यात ‘तुर्कसोम’ या लष्करी तळासह देशातील सर्वात मोठे हॉस्पिटल, राजधानी मोगादिशुमधील विमानतळ, दूतावास, पायाभूत सुविधांचे प्रकल्प, तंत्रज्ञान क्षेत्रातील सहकार्य यांचा समावेश आहे.

राजधानी मोगादिशुत तुर्की कंपन्यांकडून अनेक प्रकल्प राबविण्यात येत असून ‘बोको हराम’ने या प्रकल्पांना लक्ष्य करण्यास सुरुवात केली आहे.शनिवारी घडविण्यात आलेल्या स्फोटही याचाच भाग मानला जातो. राजधानी मोगादिशुत तुर्की कंपनीकडून महामार्गाचे काम सुरू असून कर्मचार्‍यांच्या गटालाच लक्ष्य करण्यात आले आहे.

तुर्कीकडून या हल्ल्यावर प्रतिक्रिया उमटली असून, तुर्की नागरिकांचे बळी घेणार्‍या या हल्ल्याचा तीव्र शब्दात निषेध करीत आहोत असे परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्यांनी म्हटले आहे. गेल्या दोन वर्षात तुर्की कंपन्या तसेच लष्करी तळानजिकही हल्ल्याचे प्रयत्न झाले असून, तुर्कीचा वाढता प्रभाव खपवून घेतला जाणार नाही, असे ‘अल शबाब’ या दहशतवादी संघटनेने बजावले आहे.

दरम्यान, अमेरिकी नौदलातील ‘एक्सपिडिशनरी सी बेस’ म्हणून ओळखण्यात येणारी महाकाय युद्धनौका ‘युएसएस हर्शेल वुडी विल्यम्स’ सोमालियाच्या सागरी हद्दीत तैनात करण्यात आल्याची माहिती अमेरिकेच्या ‘आफ्रिकॉम’ तळाकडून देण्यात आली आहे.

leave a reply