पाकिस्तानच्या कराचीतील आत्मघाती हल्ल्यात चीनचे तीन नागरिक ठार

- चीनकडून सूत्रधारांविरोधात कठोर कारवाईची मागणी

इस्लामाबा – पाकिस्तानच्या कराची शहरात मंगळवारी झालेल्या आत्मघाती स्फोटात चार जणांचा बळी गेला. यामध्ये चीनच्या तीन नागरिकांचा समावेश आहे. बलूच लिबरेशन आर्मीने या बंडखोर संघटनेने हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली. आपल्या नागरिकांना लक्ष्य करणाऱ्या या हल्ल्यावर चीनने संतप्त प्रतिक्रिया दिली. तसेच पाकिस्तानचे सरकार व सुरक्षा यंत्रणांनी चिनी नागरिकांच्या सुरक्षेसाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना कराव्या आणि हल्ल्याच्या सूत्रधारांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी चीनने केली.

पाकिस्तानची आर्थिक राजधानी कराचीतील विद्यापीठाच्या आवारात हा हल्ला झाला. विद्यापीठाच्या आवारात प्रवेश केलेल्या मोटारीत महिला आत्मघाती हल्लेखोर होती. तिने घडविलेल्या स्फोटात तीन चिनी नागरिक व एका पाकिस्तानी नागरिकाचा बळी गेला. हे तिघे चिनी नागरिक कराची विद्यापीठात ‘कन्फ्युशिअस इन्स्टिट्यूट’मध्ये काम करीत होते. ‘बलोच लिबरेशन आर्मी-बीएलए’ या बंडखोर संघटनेने कराची विद्यापीठातील या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली. तसेच पहिल्यांदाच आपल्या संघटनेतील महिलेने आत्मघाती हल्ला चढविल्याचे बीएलएने जाहीर केले.

बीएलए ही संघटना स्वतंत्र बलोचिस्तान आणि बलोचिस्तानच्या अधिकारांसाठी पाकिस्तानच्या यंत्रणांविरोधात संघर्ष करीत आहे. पाकिस्तानने अवैधरित्या बलोचिस्तानचा ताबा घेऊन आमची लूट केल्याचा आरोप बीएलए व इतर बलोच बंडखोर संघटना करीत आहेत. तर पाकिस्तानने बीएलए आणि इतर बलोच बंडखोर संघटनांना दहशतवादी गट जाहीर केले आहे. या बलोच बंडखोर संघटनांविरोधात पाकिस्तानी लष्कराने कारवाई हाती घेतली होती. पण गेल्या वर्षी अफगाणिस्तानात तालिबानची राजवट आल्यापासून बलोच बंडखोरांच्या पाकिस्तानी लष्करावरील हल्ल्यांमध्ये वाढ झाल्याचा आरोप पाकिस्तान करीतआहे.

कराचीतील या हल्ल्यावर चीनने संताप व्यक्त केला. पाकिस्तानातील चीनच्या दूतावासाने या हल्ल्याची कठोर शब्दात निर्भत्सना केली. तसेच पाकिस्तानातील चिनी नागरिकांनी आवश्यकता नसेल तर घराबाहेर पडू नये, असे आवाहन केले. तर पाकिस्तानातील सर्व स्तरावरील यंत्रणांनी चिनी नागरिकांच्या सुरक्षेसाठी वास्तववादी हालचाली कराव्या, असे परखड शब्दात चीनच्या दूतावासाने फटकारले. या स्फोटाची सखोल चौकशी करून यामागील सूत्रधारांवर कठोर कारवाई करण्याची मागणी चीनच्या दूतावासाने केली. दरम्यान, कन्फ्युशिअस इन्स्टिट्यूट ही चीनच्या कम्युनिस्ट राजवटीचा प्रचार करणारी संस्था असल्याची टीका केली जाते.

leave a reply