अखेरीस अमेरिका व फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांची चर्चा पार पडली

पॅरिस/वॉशिंग्टन – सोमवारी फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युअल मॅक्रॉन यांच्याशी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांची चर्चा झाली. याच्या आधी आपण मॅक्रॉन यांचे अभिनंदन करण्यासाठी फोन केला होता, पण ते आपल्याशी बोलले नाहीत, अशी तक्रार अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी केली होती. आंतरराष्ट्रीय माध्यमांनी याची दखलघेऊन ही बाब अमेरिका व फ्रान्सच्या संबंधांवर प्रकाश टाकणारी असल्याचे दावे केले होते. त्यामुळे सोमवारी दोन्ही देशांच्या राष्ट्राध्यक्षांमध्ये झालेली चर्चा महत्त्वाची ठरते.

फ्रान्समध्ये पार पडलेल्या निवडणुकीत मॅक्रॉन यांना मोठे यश मिळाले आहे. जगभरातील प्रमुख देशांनी मॅक्रॉन यांना यासाठी अभिनंदनाचे संदेश पाठविले होते. आपण मॅक्रॉन यांचे अभिनंदन करण्यासाठी फोन केला. पण ते आयफेल टॉवरवर मजेत आपला वेळ घालवत होते. त्यांच्याशी आपले बोलणे होऊ शकले नाही, असा टोला अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी लगावला होता. युक्रेनच्या मुद्यावर फ्रान्सने पूर्णपणे रशियाच्या विरोधात भूमिका स्वीकारण्याचे नाकारले आहे. यावरून फ्रान्स व अमेरिकेचे मतभेद जगजाहीर झाले आहेत. अशा परिस्थितीत अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी मारलेले शेरे दोन्ही देशांच्या संबंधांवर प्रकाशझोत टाकणारे ठरतात, असे दावे माध्यमांकडून करण्यात येत होते.

या पार्श्वभूमीवर, सोमवार राष्ट्राध्यक्ष बायडेन व मॅक्रॉन यांची चर्चा पार पडली. मात्र या चर्चेनंतरही युक्रेन तसेच अन्य मुद्यांवर अमेरिका व फ्रान्सचे एकमत होण्याची फारशी शक्यता नाही. विशेषतः युक्रेनमधील विध्वंसाला नरसंहार म्हणता येणार नाही, असे सांगून राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन यांनी तसे दावे करणाऱ्यांना खडसावले होते. युक्रेनमधील विध्वंसाचा आपल्याला खेद वाटत आहे, पण त्याला वंशसंहार म्हणणे चुकीचे ठरेल, असे सांगून मॅक्रॉन यांनी याबाबत आपली ठाम भूमिका मांडली होती. तसेच युक्रेनचे युद्ध सुरू झाल्यापासून रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांच्याशी मॅक्रॉन यांची अनेकवार चर्चा पार पडली होती.

या चर्चेला फार मोठे यश मिळालेले नसले, तरी फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांचा रशियन राष्ट्राध्यक्षांबरोबरील संवाद अमेरिका तसेच रशियाच्या विरोधात असलेल्या इतर पाश्चिमात्य देशांना खटकत असल्याचे वारंवार समोर आले होते. राष्ट्राध्यक्ष बायडेन यांनी फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांबाबत केलेल्या विधानांना ही पार्श्वभूमी लाभलेली आहे. दरम्यान, मॅक्रॉन यांना मिळालेले यश युरोपिय महासंघावर सकारात्मक परिणाम करणारे ठरते. युक्रेनचे युद्ध पेटलेले असताना, याबाबत सुस्पष्ट भूमिका स्वीकारणारे राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन यांचे नेतृत्त्व फ्रान्ससाठी व युरोपिय महासंघासाठीही अत्यंत महत्त्वाची बाब ठरणार आहे.

leave a reply