‘आयएसआय’च्या इशाऱ्यावर टार्गेट किलिंग, खलिस्तानी दहशतवादी सुखमीत पालचे दुबईतून प्रत्यार्पण

- चौकशीत मोठे खुलासे होण्याची शक्यता

नवी दिल्ली – खलिस्तानी दहशतवादी सुखमीत पाल सिंग उर्फ भिकरीवाल याचे दुबईतून प्रत्यार्पण करण्यात आले आहे. सुखमीत पाल याचे पाकिस्तानची कुख्यात गुप्तचर संघटना ‘आयएसआय’शी संबंध असून त्याच्या अटकेमुळे मोठे खुलासे होण्याची शक्यता वर्तविली जाते. ऑक्टोबर महिन्यात पंजाबच्या तरणतारण जिल्ह्यात शौर्यचक्र विजेते बलविंदर सिंग भिखीविंड यांची हत्या करण्यात आली होती. या हत्येचा मास्टरमार्इंड सुखमीत पाल असल्याचे सांगितले जाते. 7 डिसेंबरला दिल्लीमध्ये थरारक पाठलाग, चकमकीनंतर पाच दहशतवाद्यांना अटक करण्यात आली होती. यातील दोन खलिस्तानी दहशतवादी होते. हे दहशतवादीही बलविंदर सिंग भिखीविंड यांच्या हत्येत सहभागी होते. त्यांच्या अटकेनंतर दुसऱ्याच दिवशी सुखमीत पालला दुबईत अटक झाली होती, असे वृत्त आहे.

गुरुवारी खलिस्तानी दहशतवादी सुखमीत पाल सिंग याला दुबई पोलिसांनी भारतीय यंत्रणांच्या स्वाधीन केला. दुबईतून आलेलया विमानातून सुखमीतची रवानगी भारतात करण्यात आली. दिल्ली विमानतळावर उतरताच त्याला अटक करण्यात आली. पंजाब पोलीस सुखमीतला ट्रांझिट रिमांड पंजाबमध्ये आणण्याच्या तयारीत आहेत. सुखमीत पालचे संबंध ‘आयएसआय’शी असून ‘आयएसआय’च्या इशाऱ्यावर सुखमीत आणि त्याच्या टोळीने पंजाबमध्ये टार्गेट किलिंग सुरू केले होते.

शौर्यचक्र विजेते बलविंदर सिंग भिखीविंड यांची हत्याही याच टार्गेट किलिंगचा भाग होती. 1980-90 च्या दशकात पंजाबमध्ये खलिस्तानी दहशतवाद पेटलेला असताना याविरोधात खडे ठाकण्याची हिम्मत बलविंदर सिंग आणि त्यांच्या कुटुंबियांंनी दाखविली होती. इतकेच नाही बलविंदर सिंग यांनी दहशतवादाविरोधात नागरिकांना एकजूट केले होते. याच कामगिरीमुळे त्यांना शौर्यचक्र देऊन गौरविण्यात आले होते. बलविंदर सिंग भिखीविंड यांची आयएसआयच्या इशाऱ्यावर हत्या करून पंजाबमध्ये पुन्हा दहशतवाद माजविण्याची योजना होती. ही हत्या सुखमीत पाल सिंगने आपल्या साथीदारांच्या मदतीने घडवून आणली.

2016 साली पंजाबच्या नाभा मध्यवर्ती कारागृहाचे सुरक्षा कवच भेदून सहा गुन्हेगार फरार झाले होते. यामध्ये दोन खलिस्तानी दहशतवादी होते. खलिस्तानी लिब्रेशन फोर्सचा(केएलएफ) प्रमुख हरमिंदर सिंग मिंटोचा या कारागृहातून फरार झालेल्या दहशतवाद्यांमध्ये समावेश होता. या नाभा तरुंग फोडीच्या कटातही सुखमीत पाल सिंग उर्फ भिकरीवालचा हात होता, असा दावा केला जातो. त्यामुळे सुखमीत पालला झालेली अटक मोठे यश मानले जात आहे. याशिवाय अमली दहशतवाद, सीएए आणि एनआरसीविरोधात हिंसक आदोलनामध्येही सुखमीत पालचा सहभाग असल्याचे आरोप आहेत. तसेच दिल्ली-एनसीआरमध्ये सुखमीत पाल काही जणांच्या सातत्याने संपर्कात होता, अशीही माहिती मिळत आहे. त्यामुळे सुखमीत पालला झालेली अटक मोठे यश मानले जात आहे.

सुखमीत पाल नाव बदलून आणि बनावट कागदपत्रांच्या आधारे या बदललेल्या नावाचा पासपोर्ट मिळवून दुबईत राहत होता. 25 दिवसांपूर्वी दिल्लीत ‘हिजबुल मुजाहिद्दीन’च्या तीन दहशतवाद्यांसह दोन खलिस्तानी दहशतवाद्यांना अटक करण्यात आली होती. हे दहशतवादी बलविंदर सिंग यांच्या हत्येत सहभागी होते. त्यांच्याच चौकशीत सुखमीत पाल दुबईन नाव व वेष बदलून राहत असल्याची आणि त्याच्या ठावठिकाण्याची माहिती मिळाली होती. यानंतर दुबईच्या सुरक्षा यंत्रणेला ताबडतोब याची माहिती देत प्रत्यार्पणाची प्रक्रिया सुरू करण्यात आली. 8 डिसेंबरला सुखमीत पालला दुबईच्या सुरक्षा यंत्रणांनी ताब्यात घेतले होते.

leave a reply