सौदीचे येमेनमधील हौथी बंडखोरांवर हवाई हल्ले

- विमानतळावरील हल्ल्यासाठी इराण जबाबदार असल्याचा येमेनचा आरोप

रियाध/सना – सौदी अरेबिया आणि अरब मित्रदेशांच्या आघाडीने येमेनची राजधानी सनावर हल्ले चढवून हौथी बंडखोरांच्या ठिकाणांना लक्ष्य केले. येमेनच्या विमानतळावर झालेल्या हल्ल्यासाठी हौथी बंडखोर जबाबदार असल्याचा आरोप करून सौदीने आपल्या कारवाईचे समर्थन केले. विमानतळावरील या हल्ल्यात २६ जणांचा बळी गेला तर ११० जण जखमी झाले आहेत. दरम्यान, एडनच्या विमानतळावर हल्ला चढविणार्‍या हौथी बंडखोरांना इराणच्या अधिकार्‍यांनी सहाय्य केल्याचा थेट आरोप येमेनच्या पंतप्रधानांनी केला आहे.

येमेनमधील हौथी बंडखोरांची वृत्तवाहिनी म्हणून ओळखण्यात येणार्‍या ‘मसिरा’ने प्रसिद्ध केलेल्या बातमीनुसार, गुरुवारी सौदी व अरब देशांच्या लढाऊ विमानांनी हल्ले चढविले. येमेनची अधिकृत राजधानी व सध्या हौथी बंडखोरांच्या ताब्यात असलेल्या सना शहरातील विमानतळ तसेच हौथींच्या एकूण १५ ठिकाणांवर ही कारवाई करण्यात आली. या हल्ल्यात हौथींच्या झालेल्या नुकसानाचे तपशील समोर आलेले नसले तरी यात हौथींचे मोठे नुकसान झाल्याचा दावा केला जातो.

दोन दिवसांपूर्वी येमेनच्या दक्षिणेकडील एडन या व्यापारी दृष्टीने अतिमहत्त्वाच्या शहरवर दोन हल्ले झाले. सौदीचे समर्थन असलेले येमेनचे संयुक्त आघाडी सरकारचे विमान येथील आंतरराष्ट्रीय विमानतळावर दाखल झाल्यानंतर या ठिकाणी भीषण हल्ला झाला. या हल्ल्याचे स्वरुप स्पष्ट होऊ शकलेले नाही. पण काही व्हिडिओ फुटेजवरुन हा क्षेपणास्त्र हल्ला असल्याचा दावा केला जातो. या हल्ल्यात २६ जणांचा बळी गेला असून यामध्ये महिला, मुले व पत्रकारांचा समावेश आहे.

काही मिनिटानंतर विमानतळापासून जवळ असलेल्या येमेनच्या राष्ट्राध्यक्षीय निवासस्थानावर ड्रोन्सने रॉकेट हल्ले चढविले. येमेनच्या लष्कराने सदर ड्रोन नष्ट केले. हल्ला झाला तेव्हा राष्ट्राध्यक्षांच्या निवासस्थानामध्ये विमानतळावरुन सुरक्षितरित्या आणलेले आघाडी सरकारमधील कॅबिनेट मंत्री होते. त्यामुळे अवघ्या अर्ध्या तासात येमेनच्या आघाडी सरकारच्या नेत्यांवर दोन जीवघेणे हल्ले झाल्याचे समोर येत आहे.

येमेनचे पंतप्रधान अब्दुलमलिक यांनी या दोन्ही हल्ल्यांसाठी हौथी बंडखोरांना जबाबदार धरले. त्याचबरोबर इराणच्या समर्थनामुळेच हौथींनी हे हल्ले चढविल्याचे सांगून पंतप्रधान अब्दुलमलिक यांनी इराणला दोषी धरले. त्याचबरोबर ज्या ठिकाणाहून विमानतळावर हल्ला झाला, त्या ठिकाणी हौथी बंडखोरांना सहाय्य करण्यासाठी इराणचे किमान दोन अधिकारी उपस्थित होते. याची प्राथमिक माहिती आपल्याकडे असल्याचा दावा पंतप्रधान अब्दुलमलिक यांनी केला.

येमेनच्या सरकारचे हे आरोप इराणने फेटाळले आहेत. सौदी अरेबिया व अरब मित्रदेशांनी चढविलेल्या हल्ल्यांमुळे येमेनमध्ये अस्थैर्य निर्माण झाले आहे. त्यामुळे विमानतळावरील हल्ल्यासाठी सौदीच जबाबदार ठरतो, असा ठपका ठेवून सौदीमुळे येमेनवर भीषण संकट कोसळल्याचे इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे.

leave a reply