भारतीय लष्कराला एक लाख स्वदेशी बुलेट प्रुफ जॅकेटचा पुरवठा

नवी दिल्ली – संरक्षण राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी लष्कर प्रमुख जनरल मनोज मुकुंद नरवणे यांच्याकडे एक लाख बुलेट प्रुफ जॅकेट सुपूर्द केली. ही जॅकेट स्वदेशी बनावटीची असून मेक इन इंडियाअंतर्गत ही बुलेट प्रुफ जॅकेट बनविण्यात आली आहेत. तसेच वेळेआधीच या बुलेट प्रुफ जॅकेटचा पुरवठा लष्कराला करण्यात आला आहे. देशाच्या जवानांच्या सुरक्षेला सरकारचे सर्वोच्च प्राधान्य आहे. तसेच संरक्षण दलांना आवश्यक शस्त्रसामुग्री उपलब्ध करून देणे ही सरकारची जबाबदारी आहे, असे यावेळी संरक्षण राज्यमंत्री श्रीपाद नाईक म्हणाले.

चीन आणि पाकिस्तानच्या सीमेवरील तणावाच्या पार्श्‍वभूमीवर भारत सरकारने संरक्षणदलांना आवश्यक त्या संरक्षणसाहित्याने सज्ज करण्याला वेग दिला आहे. भारतीय लष्कराला तीन लाख बुलेटप्रुफ जॅकेटची आवश्यकता होती. या संदर्भात या जॅकेटच्या पुरवठ्यासाठी खाजगी कंपन्यांबरोबर करार करण्यात आले आहेत. यातील एक कंपनी एसएमपीपी प्रायव्हेट लिमिटेडला दिलेले बुलेट प्रुफ जॅकेटची ऑर्डर वेळेआधीच बनून तयार झाली असून संरक्षण राज्यमंत्र्यांच्या हस्ते ही जॅकेट लष्कराकडे सुपूर्द करण्यात आली.

लष्कराला पुरविण्यात आलेले ही जॅकेट स्वदेशी बनावटीची आहेत. एसएमपीपी प्रायव्हेट लिमिटेडनेच ही जॅकेट विकसित केली होती. तसेच त्यांनाच मेक इन इंडिया कार्यक्रमाअंतर्गत ऑर्डर देण्यात आली होती. कंपनीने चार महिने आधीच ही जॅकेट बनवून सुपूर्द केली आहेत. गेल्या चार महिन्यातच कंपनीने ४० हजार बुलेट प्रुफ जॅकेट तयार केली. याबद्दल केंद्रीय संरक्षण राज्यमंत्र्यांनी कंपनीचे कौतूक केले. ही अत्याधुनिक बुलेट प्रुफ जॅकेट आपल्या जवानांच्या अनमोल प्राणांचे संरक्षण करतील, असे श्रीपाद नाईक म्हणाले. एके-४७ सारख्या घातक रायफलीच्या स्टिल काडतूसांपासूनही ही बुलेट प्रुफ जॅकेट जवानांचे संरक्षण करतील, असा दावा कंपनीने याआधी केला होता.

leave a reply