चीनच्या ‘स्पाय बलून’ची अमेरिका व कॅनडात टेहळणी

- ‘पेंटॅगॉन’कडून लढाऊ विमाने अलर्टवर

वॉशिंग्टन – गेल्या काही दिवसांपासून चीनने पाठविलेल्या ‘बलून’च्या सहाय्याने अमेरिकेत हेरगिरी सुरू असल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. अमेरिकेच्या संरक्षण विभागाने याची गंभीर दखल घेतली असून राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांनी तपासाचे आदेश दिले आहेत. अमेरिकेबरोबरच कॅनडामध्येही चिनी बलूनने हेरगिरी केल्याची घटना उघड झाली असून काही माध्यमांनी दोन बलून्स आढळल्याचे दावे केले आहेत. चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाकडून यावर प्रतिक्रिया उमटली असून अमेरिका अवास्तव दावे करीत असल्याचे म्हटले आहे.

अमेरिकेच्या मोंटाना प्रांतात गेल्या काही दिवसांपासून प्रचंड मोठ्या आकाराचा पांढऱ्या रंगाचा बलून आकाशात फिरत असल्याचे दावे समोर आले होते. हा बलून ‘हाय अल्टिट्यूड सर्व्हिलन्स’ प्रकारातील बलून असून अमेरिकेच्या संरक्षण विभागाची त्यावर नजर असल्याचे पेंटॅगॉनचे प्रवक्ते ब्रिगेडिअर जनरल पॅट्रिक रायडर यांनी स्पष्ट केले. सदर बलून अमेरिकेच्या उत्तर भागातील मोंटाना प्रांतात फिरत असून व्यापारी व प्रवासी विमानांपेक्षा अधिक उंचीवरून प्रवास करीत असल्याचेही रायडर यांनी सांगितले. बलूनने संवेदनशील क्षेत्रातून प्रवास केला असला तरी त्यापासून धोका नसल्याचा दावा पेंटॅगॉनच्या प्रवक्त्यांनी केला.

मात्र अमेरिकेच्या राजकीय वर्तुळात याचे आक्रमक पडसाद उमटले आहेत. मोंटाना प्रांतातील सिनेटर स्टिव्ह डेन्स यांनी संरक्षण विभागाला खरमरीत पत्र लिहून तीव्र चिंता व्यक्त केली. चीनचा हेरगिरी करणारा बलून मोंटानातील हवाईदलाच्या तसेचअण्वस्त्रांच्या तळांना लक्ष्य करू शकतो, अशी भीती डेन्स यांनी पत्रात व्यक्त केली आहे. सदर बलूनचा मार्ग व त्याची उद्दिष्टे याबाबत अमेरिकेच्या संरक्षण विभागाने विस्तृत खुलासा द्यावा, अशी मागणीही त्यांनी केली. अमेरिकेतील काही संसद सदस्यांनी या मुद्यावर संसदेत तातडीने ‘सिक्युरिटी ब्रिफिंग’ देण्यात यावे, अशी आक्रमक भूमिका घेतली आहे.

अमेरिकेच्या संरक्षण विभागाने सदर घटनेची माहिती राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांना दिली आहे. बायडेन यांनी सदर घटनेचा सखोल तपास करण्याचे आदेश दिले आहेत. बायडेन यांच्याकडून बलून पाडण्याची सूचना करण्यात आली होती, मात्र पेंटॅगॉनने ती नाकारल्याचे वृत्त काही माध्यमांनी दिले. पण त्याला ठोस दुजोरा देण्यात आलेला नाही. मोंटाना तसेच जवळच्या प्रांतांमधील हवाईतळांना अलर्टवर राहण्याचे निर्देश देण्यात आले असून बलूनच्या टेहळणीसाठी काही लढाऊ विमाने धाडण्यात आल्याचेही सांगण्यात येते. यापूर्वीही अशा प्रकारे बलून फिरण्याच्या घटना आढळल्याचा दावा पेंटॅगॉनशी निगडीत सूत्रांनी दिला.

अमेरिकेपूर्वी सदर बलूनने कॅनडाच्या काही भागांमध्ये टेहळणी केल्याचेही उघड झाले आहे. कॅनडामध्ये अशाच प्रकारच दुसरा चिनी बलून आढळल्याची माहितीही समोर येत आहे. याप्रकरणी आपण अमेरिकेच्या सहकार्याने पावले उचलत आहोत, असे कॅनडाकडून सांगण्यात आले. दरम्यान चीनने याप्रकरणी खुलासा करणारे निवेदन प्रसिद्ध केले आहे.

‘चीनने हवामानविषयक संशोधनासाठी बलून्स तैनात केले होते. मात्र वाऱ्यांमुळे सदर बलून्स नियोजित मार्गापासून भटकले व अमेरिकेच्या हवाईहद्दीत गेले. अमेरिकेच्या हद्दीतील प्रवेशावरून आम्ही तीव्र खेद व्यक्त करतो’, असे चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने आपल्या निवेदनात म्हटले आहे. त्यापूर्वी चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्यांनी अमेरिका सदर घटनेला अवाजवी महत्त्व देत असल्याचा आरोप केला होता.

leave a reply