चिनी कंपनीची फॅक्टरी अमेरिकेच्या सुरक्षेसाठी गंभीर धोका

- अमेरिकेच्या हवाईदलाचा इशारा

वॉशिंग्टन/नॉर्थ डाकोटा – चिनी कंपनीकडून नॉर्थ डाकोटा प्रांतात उभारण्यात येणारी ‘कॉर्न मिल’ ही अमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षेसाठी गंभीर धोका ठरु शकतो, असा इशारा अमेरिकेच्या हवाईदलाने दिला आहे. या इशाऱ्यामुळे चीनच्या ‘फुफेंग ग्रुप’ची नॉर्थ डाकोटात फॅक्टरी उभारण्याची योजना उधळली गेल्याचे सांगण्यात येते.

गेल्या वर्षी या कंपनीने नॉर्थ डाकोटामध्ये तब्बल ३०० एकर्स जागा खरेदी केल्याचे प्रकरण समोर आले होते. यानंतर चीनने अमेरिकेत खरेदी केलेल्या जमिनी व इतर मालमत्तांचा मुद्दा ऐरणीवर आला होता. चीनच्या फुफेंग ग्रुपकडून उभारण्यात येणाऱ्या ‘कॉर्न मिल’ची जागा अमेरिकी हवाईदलाच्या ‘ग्रँड फोर्क्स’ या महत्त्वाचा व संवेदनशील तळापासून अवघी १२ मैलांच्या अंतरावर आहे. चिनी कंपनीकडून होणारी कारखान्याची उभारणी नजिकच्या काळात तसेच दीर्घकालिन दृष्टिकोनातून विचार करता धोकादायक ठरु शकते, असे अमेरिकी हवाईदलाने आपल्या पत्रात म्हटले आहे. रिपब्लिकन पक्षाच्या संसद सदस्यांनी हे पत्र व त्यातील तपशील उघड केला आहे. त्याचवेळी स्थानिक प्रशासनाला चिनी कंपनीचा प्रकल्प तातडीने रद्द करण्याचे आवाहनही केले.

चिनी कंपनीने आपल्यावरील आरोप फेटाळले असून हवाईतळाला कंपनीपासून कोणत्याही प्रकारचा धोका नसल्याचा खुलासा केला. मात्र स्थानिक जनतेत प्रकल्पाला होणारा विरोध वाढत असून चिनी प्रकल्पाविरोधात तीव्र असंतोषाची भावना असल्याचे समोर आले आहे. स्थानिक मेयर ब्रँडन बॉचेंस्की यांनी याची दखल घेतली असून प्रकल्पाला दिलेल्या परवानग्या रद्द करण्यात येतील, अशी घोषणा केली. यापूर्वी प्रसिद्ध झालेल्या एका अहवालात चीनने अमेरिकेतील जवळपास दोन लाख एकर जमीन खरेदी केल्याची माहिती समोर आली होती. फ्लोरिडा प्रांताचे गव्हर्नर रॉन डेसँटिस यांनी या मुद्यावर आक्रमक भूमिका घेतली असून चीनच्या वाढत्या प्रभावाविरोधात कठोर विधेयक आणण्याचा इशारा दिला होता.

leave a reply