स्वीडन, फिनलँड लवकरच नाटोत सामील होतील – ब्रिटनच्या दैनिकाचा दावा

लंडन – ‘युक्रेनवर हल्ला चढवून रशियाने धोरणात्मक घोडचूक केली आहे. कारण यामुळे युरोपमधील रशियाच्या शेजारी नॉर्डिक देशांमध्ये असुरक्षिततेची भावना वाढीस लागली आहे. यामुळे लवकरच ते नाटोमध्ये सामील होतील व नाटोचा विस्तार होईल’, असा दावा ब्रिटनच्या आघाडीच्या दैनिकाने केला. येत्या जून महिन्यात स्वीडन आणि फिनलँड हे नाटोचे सदस्य बनतील, असे या दैनिकाने म्हटले आहे. पण नाटोचा विस्तार करून युरोपमध्ये स्थैर्य परतणार नाही, असा इशारा रशियाने दिला.

नाटोत सामीलगेल्या आठवड्यात ब्रुसेल्स येथे नाटो देशांच्या परराष्ट्रमंत्र्यांची बैठक पार पडली. युक्रेन युद्ध आणि नाटोची भूमिका या मुद्यावर सदर बैठकीत चर्चा झाली. रशियाचा धोका वाढत असल्याचे सांगून काही सदस्य देशांनी नाटोचा विस्तार करण्याची मागणी केली होती. तर नाटोचे प्रमुख जेन्स स्टॉल्टनबर्ग यांनी रशियाच्या आक्रमकतेमुळे पूर्व युरोपातील काही देश नाटोत सहभागी होण्यासाठी उत्सुक असल्याचे म्हटले होते.

ब्रिटनच्या ‘द टाईम्स’ या दैनिकाने नाटोच्या विस्ताराबाबत सोमवारी बातमी प्रसिद्ध केली. यामध्ये येत्या जून महिन्यात रशियाचे दोन शेजारी देश नाटोमध्ये सहभागी होणार असल्याचा दावा या दैनिकाने केला. दीड महिन्यापूर्वी युक्रेनमध्ये चढविलेला हल्ला ही रशियाची घोडचूक असल्याचे सदर दैनिकाने अमेरिकी अधिकार्‍यांचा हवाल्याने म्हटले आहे.

नाटोत सामीलयेत्या जून महिन्यात सर्वप्रथम फिनलँड नाटोत सहभागी होण्याचा निर्णय घेईल व त्यानंतर स्वीडन त्याचे अनुकरण करील, अशी माहिती या दैनिकाने दिली. फिनलँडच्या पंतप्रधान सॅना मरिन यांनी काही दिवसांपूर्वीच नाटोतील सहभागावर फेरविचार करण्याची आवश्यकता असल्याचे म्हटले होते, याकडे या दैनिकाने लक्ष वेधले.

फिनलँड आणि स्वीडन या दोन्ही देशांनी आत्तापर्यंत नाटोत सामील होण्याचे टाळले होते. दोन्ही देशांच्या जनतेने देखील नाटोतील सहभागाला विरोध केला होता. पण युक्रेनच्या युद्धामुळे या दोन्ही देशांमधील जनमत बदलू लागल्याचा दावा ब्रिटनच्या दैनिकाने केला. अमेरिकी अधिकार्‍यांच्या हवाल्याने प्रसिद्ध झालेल्या या बातमीवर फिनलँड आणि स्वीडनने प्रतिक्रिया दिलेली नाही. पण रशियाने या बातमीची दखल घेतली. तसेच नाटो युद्धखोर संघटना असून युद्धासाठीच तिची स्थापना झालेली आहे, असा ठपका रशियन सरकारचे प्रवक्ते दिमित्रि पेस्कोव्ह यांनी ठेवला. अशा या लष्करी संघटनेच्या विस्तारामुळे युरोपिय देशांमध्ये स्थैर्य परतणार नसल्याचा इशारा पेस्कोव्ह यांनी दिला.

दरम्यान, नाटो ही शीतयुद्धाच्या काळात स्थापन झालेली लष्करी संघटना होती. त्यामुळे शीतयुद्ध संपल्यानंतर ही संघटना मोडीत काढणे आवश्यक होते. पण शीतयुद्धाच्या समाप्तीनंतरही ही संघटना सक्रीय ठेवून अमेरिका व नाटोने आपली मानसिकता दाखवून दिल्याचा आरोप रशियाने करीत आहे. त्याचवेळी स्वीडन व फिनलँडच्या नाटोतील सहभागावरून रशियाने याआधीच सज्जड इशारे देऊन ठेवलेले आहेत.

leave a reply