रशिया-युक्रेन युद्धामुळे जागतिक स्तरावर ‘फूड क्रायसिस’ उद्भवेल

- संयुक्त राष्ट्रसंघाचा इशारा

रोम – रशिया-युक्रेन युद्धामुळे अन्नधान्यासह खतांच्या दरांमध्ये प्रचंड वाढ झाली झाली आहे. याने पुढील काळात अन्नधान्याची समस्या अधिकच तीव्र होईल. यामुळे ‘ग्लोबल फूड क्रायसिस’चा सामना करावा लागेल, असा इशारा संयुक्त राष्ट्रसंघटनेच्या ‘फूड ऍण्ड ऍगिकल्चर ऑर्गनायझेशन’ने (एफएओ) दिला. जागतिक स्तरावर सध्या अन्नधान्य व खतांचे दर विक्रमी स्तराला पोहोचले आहेत. याचे परिणाम काही देशांमध्ये दिसू लागले आहेत. अशा परिस्थितीत हे संकट भयावह स्वरुप धारण करील या ‘एफएओ’ने दिलेल्या इशार्‍याचे गांभीर्य वाढले आहे.

गेल्या आठवड्यात ‘फूड ऍण्ड ऍग्रिकल्चर ऑर्गनायझेशन’ने (एफएओ) अहवाल प्रसिद्ध केला. त्यात अन्नधान्यासह खतांच्या दरांमध्ये झालेल्या वाढीची विशेष नोंद घेण्यात आली. मार्च २०२२मध्ये ‘एफएओ’चा ‘फूड प्राईस इंडेक्स’ १५९.३ अशा विक्रमी पातळीवर पोहोचला आहे. ‘एफएओ’ने निर्देशांकाची नोंद ठेवण्यास सुरुवात केल्यानंतरची ही सर्वोच्च पातळी ठरली आहे. फेब्रुवारी महिन्याच्या तुलनेत निर्देशांकात तब्बल १७.९ अंकांची वाढ झाली व हा देखील उच्चांक ठरला आहे.

अन्नधान्यांमध्ये तृणधान्ये अर्थात ‘सिरिअल्स’च्या दरांमध्ये प्रचंड मोठी वाढ नोंदविण्यात आली आहे. गहू, मका व बार्लीच्या किंमतींमधील वाढ विक्रमी असल्याचे ‘एफएओ’ने म्हटले आहे. गव्हाचे दर २० टक्क्यांहून अधिक तर मक्याच्या किंमतीत १९ टक्के वाढीची नोंद झाली आहे. सर्वात मोठी वाढ खाद्यतेलाच्या दरांमध्ये झाली असून अवघ्या महिन्याभरात खाद्यतेलाचे दर २३.२ टक्क्यांनी भडकले आहेत. दूध व दुग्धजन्य उत्पादने, मांस तसेच साखरेच्या दरांमध्येही ऐतिहासिक स्तरावर वाढ नोंदविण्यात आल्याचे ‘एफएओ’ने म्हटले आहे.

अन्नधान्याबरोबरच खतांच्या किंमतींमध्येही मोठी वाढ होत असून रशिया व बेलारुसवर लादलेल्या निर्बंधांमुळे त्याच्या पुरवठ्यावरही परिणाम झाले आहेत. खतांच्या बाजारपेठेत रशियाचा हिस्सा तब्बल १३ टक्क्यांचा आहे. रशियाच्या निर्यातीला लक्ष्य केल्याने नजिकच्या काळात खतांची टंचाई निर्माण होऊन त्याचा फटका जागतिक स्तरावरील शेतीला बसू शकतो, असा दावा वर्ल्ड बँकेने केला आहे. रशिया व युक्रेन या देशांचा उल्लेख जगाचे ‘ब्रेडबास्केट’ असा करण्यात येतो. गहू, कडधान्य, मका, सूर्यफूल यांच्या उत्पादनात हे देश आघाडीवर आहेत. जागतिक कडधान्याच्या एकूण निर्यातीपैकी सुमारे १४ टक्के निर्यात रशिया व युक्रेनमधून केली जाते. दोन्ही देशांमध्ये पेटलेल्या युद्धामुळे ही निर्यात बाधित झाली आहे. याचा परिणाम काही देशांमध्ये स्पष्टपणे दिसू लागला आहे.

आशिया, आफ्रिका व आखातातील गरीब देश रशिया तसेच युक्रेनमधून आयात होणार्‍या अन्नधान्य तसेच खतांवर मोठ्या प्रमाणात अवलंबून आहेत. त्यामुळे या देशांमध्ये ‘फूड क्रायसिस’ अर्थात अन्नधान्यांच्या संकटाचे परिणाम समोर येऊ लागल्याचे ‘एफएओ’च्या अधिकार्‍यांनी बजावले आहे. आर्थिक संकटाबरोबरच अन्नधान्याची टंचाई व महागाई याने संतापलेली जनता रस्त्यावर उतरून आपल्या देशातील सरकारविरोधात निदर्शने करीत आहे. या निदर्शनांमधून पुढच्या काळात दंगली पेटतील व त्यावर नियंत्रण ठेवणे, हे गरीब व अविकसित देशांबरोबर प्रगत देशांसाठीही मोठे आव्हान ठरेल. एफएओने आपल्या अहवालातून सार्‍या जगाला या भीषण वास्तवाची जाणीव करून दिली आहे.

leave a reply