१२ वर्षानंतर सिरिया पुन्हा अरब लीगमध्ये सामील

- इराकच्या सरकारी माध्यमाचा दावा

बगदाद – अरब-आखाती देशांच्या ‘अरब लीग’ने सिरियाला नव्याने संघटनेत सामील करण्याचा निर्णय घेतला आहे. संघटनेच्या परराष्ट्रमंत्र्यांच्या बैठकीत यावर एकमत झाल्याचा दावा इराकच्या सरकारी माध्यमाने केला. १२ वर्षानंतर सिरियाला या संघटनेचे सदस्यत्त्व देण्याची अधिकृत घोषणा १९ मे रोजी करण्यात येईल. अरब लीगचा हा निर्णय अमेरिकेचा आखातातील प्रभाव ओसरत असल्याचे दाखवून देत आहे.

१२ वर्षानंतर सिरिया पुन्हा अरब लीगमध्ये सामील - इराकच्या सरकारी माध्यमाचा दावा२०११ सालच्या अरब स्प्रिंगच्या आंदोलनामुळे अरब-आखाती देशांमधील राजवटी उलथल्या होत्या. सिरियातील बशर अल-अस्साद यांच्या राजवटीविरोधातही असाच प्रयत्न झाला. मात्र अस्साद राजवटीने इराण व रशियाच्या सहाय्याने बंडखोरांना एका मर्यादेबाहेर यश मिळू दिले नाही. बळाचा वापर करून अस्साद यांनी आपली राजवट टिकविली. त्यांच्या लष्करी कारवाईवर अमेरिका व इतर पाश्चिमात्य देशांनी टीकास्त्र सोडले होते. अरब देशांनी देखील याला दुजोरा देऊन अरब लीगने सिरियाचे सदस्यत्व काढून घेतले होते. तसेच सिरियावर आर्थिक निर्बंधही टाकले होते.

पण गेल्या काही दिवसांपासून अरब-आखाती देश सिरियातील अस्साद राजवटीबरोबर नव्याने सहकार्य प्रस्थापित करण्यासाठी पुढाकार घेत आहेत. जॉर्डनची राजधानी अम्मान येथे अरब देश व सिरियामध्ये चर्चा पार पडली होती. यानंतर अरब देशांच्या परराष्ट्रमंत्र्यांमध्ये स्वतंत्र बैठक झाली. यामध्ये सिरियाला अरब लीगमध्ये सामील करण्यावर एकमत झाले.

हा अमेरिकेसाठी धक्का असल्याचे दिसत आहे. तसेच सिरियातील इराणसमर्थक दहशतवादी संघटनांच्या तळांवर हल्ले चढविणाऱ्या इस्रायलसाठीही सिरियाचे अरब लीगचे सदस्यत्त्व आव्हानात्मक बाब ठरू शकते.

हिंदी

 

leave a reply