अमेरिकी हितसंबंधांच्या सुरक्षेसाठी युक्रेनपेक्षा तैवानला अधिक प्राधान्य द्यायला हवे

- अमेरिकी संसद सदस्य जोश हॉले यांची मागणी

तैवानला अधिक प्राधान्यवॉशिंग्टन – अमेरिकेने आपले सुरक्षाविषयक हितसंबंध जपण्यासाठी युक्रेनच्या ऐवजी तैवानला अधिक प्राधान्य द्यायला हवे, अशी मागणी अमेरिकेचे सिनेटर जोश हॉले यांनी केली. हॉले यांनी यासंदर्भात अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाला एक पत्र लिहून त्यात युक्रेनला पुरविण्यात येणाऱ्या शस्त्रसहाय्यावर टीकास्त्र सोडले आहे. युक्रेनला मोठ्या प्रमाणावर शस्त्रसाठे देऊन अमेरिकेने आशियातील हितसंबंधांकडे दुर्लक्ष केले आहे, असा ठपका अमेरिकी सिनेटरनी ठेवला आहे.

गेल्या वर्षभरात अमेरिकेने युक्रेनला 20 अब्ज डॉलर्सहून अधिक संरक्षणसहाय्य पुरविले आहे. यात क्षेपणास्त्रे, हेलिकॉप्टर्स, तोफा, रॉकेट सिस्टिम्स, रडार तसेच इलेक्ट्रॉनिक वॉरफेअरशी संबंधित यंत्रणांचाही समावेश आहे. अमेरिका सध्या उपलब्ध असलेल्या शस्त्रसाठ्यातून हे सहाय्य युक्रेनला पुरवित आहे. त्यामुळे अमेरिकेच्या संरक्षणदलातील आवश्यक शस्त्रसाठा कमी झाल्याची टीका विश्लेषक व माजी अधिकाऱ्यांकडून करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर हॉले यांनी थेट परराष्ट्र विभागाला पत्र लिहून मुद्दा उपस्थित करणे लक्ष वेधून घेणारे ठरते.

तैवानला अधिक प्राधान्यसिनेटर हॉले यांनी लिहिलेल्या पत्रात तैवानला प्राधान्य देण्याची मागणी करण्यात आली आहे. जर तैवान व युक्रेन या दोन्ही देशांकडून शस्त्रांची मागणी करण्यात आली तर पहिली तैवानची मागणी पूर्ण करायला हवी, असे अमेरिकी सिनेटरनी म्हटले आहे. चीनने जर तैवानवर हल्ले चढविले तर तैवानला शस्त्रपुरवठा करणे पुढील काळात कठीण होऊ शकते, याकडे हॉले यांनी लक्ष वेधले. तैवान हा अमेरिकेच्या आशियातील सुरक्षाविषयक हितसंबंधांसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे, याची जाणीवही त्यांनी पत्रात करून दिली आहे.

राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांनी सूत्रे स्वीकारल्यानंतर अमेरिकेचा तैवानला होणाऱ्या शस्त्रपुरवठ्याचा वेग कमी झाल्याचे समोर आले आहे. तैवान सरकारनेही उघडपणे हा मुद्दा मांडताना अमेरिकेने मंजुरी दिलेली अनेक शस्त्रे अजून तैवानला मिळालेली नसल्याची तक्रार केली होती. मात्र बायडेन प्रशासनाने त्याकडे सर्रास दुर्लक्ष करीत चीनधार्जिणी भूमिका स्वीकारली असून तैवानला आवश्यक व प्रगत शस्त्रे देण्यात टाळाटाळ करण्यात येत आहे.

English हिंदी

leave a reply