अमेरिका-ऑस्ट्रेलियाचे चीनविरोधी आघाडीत सहभागी होण्यासाठी जपानला आवाहन

चीनविरोधी आघाडीत सहभागीवॉशिंग्टन – या क्षेत्रातील देशांना त्यांचे भवितव्य निश्चित करण्याचा अधिकार असलाच पाहिजे, यावर अमेरिका आणि ऑस्ट्रेलियाचे एकमत आहे. पण इंडो-पॅसिफिक क्षेत्रात अमेरिका व ऑस्ट्रेलियाच्या या समान दृष्टीकोनाला आव्हान देणाऱ्या आक्रमक व घातक कारवाया चीनकडून सुरू आहेत. तैवान, पॅसिफिक क्षेत्रातील बेटदेश व ईस्ट तसेच साऊथ चायना सी क्षेत्रातील चीनच्या कारवाया क्षेत्रिय शांतता व स्थैर्याला आव्हान देत आहेत, असे अमेरिकेचे संरक्षणमंत्री लॉईड ऑस्टिन यांनी बजावले. याविरोधात अमेरिका व ऑस्ट्रेलियाने लष्करी सहकार्य अधिक दृढ करण्याचा निर्धार केल्याची घोषणाही अमेरिकेच्या संरक्षणमंत्र्यांनी केली. तसेच अमेरिका व ऑस्ट्रेलियाच्या या सहकार्यात जपाननेही सहभागी व्हावे असे आवाहन उभय देशांच्या संरक्षणमंत्र्यांनी केले आहे.

ऑस्ट्रेलियाचे संरक्षणमंत्री रिचर्ड मार्लेस अमेरिकेच्या दौऱ्यावर असून त्यांची अमेरिकेचे संरक्षणमंत्री लॉईड ऑस्टिन यांच्याशी चर्चा पार पडली. या चर्चेत उभय देशांमधील संरक्षणविषयक सहकार्य अधिकच दृढ करण्यावर एकमत झाले. विशेषतः इंडो-पॅसिफिक क्षेत्रातील चीनच्या घातक व आक्रमक कारवायांमुळे निर्माण झालेल्या अस्थैर्याच्या पार्श्वभूमीवर अमेरिका आणि ऑस्ट्रेलियाच्या संरक्षणमंत्र्यांनी आपल्या लष्करी सहकार्यात या क्षेत्रातील इतर देशांनाही सहभागी होण्याचे आवाहन केले. अमेरिका व ऑस्ट्रेलिया यांच्या लष्करी सहकार्यात जपाननेही सहभाग घ्यावा, असे आवाहन संरक्षणमंत्री लॉईड ऑस्टिन व संरक्षणमंत्री रिचर्ड मार्लेस यांनी केले. या आठवड्याच्या अखेरीस जपानमध्ये जाऊन अमेरिका-ऑस्ट्रेलियाच्या लष्करी सहकार्यात सहभागी होण्याचे आमंत्रण देण्याची देता येईल, असे उद्गार संरक्षणमंत्री रिचर्ड मार्लेस यांनी काढले आहेत.

अमेरिका व ऑस्ट्रेलियाच्या संरक्षणमंत्र्यांमधील चर्चेत रशियाच्या युक्रेनवरील हल्ल्याचा दाखला देऊन चीन देखील इंडो-पॅसिफिक क्षेत्रात अशा स्वरुपाची कारवाई करणार असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला. विशेषतः तैवानच्या क्षेत्रातील चीनच्या बेजबाबदार कारवाया त्याचेच संकेत देत असल्याचे दावे संरक्षणमंत्री ऑस्टिन व संरक्षणमंत्री मार्लेस यांनी केले आहेत. मात्र जपानला या लष्करी सहकार्यात सहभागी करून घेत असताना, तसेच या क्षेत्रातील इतर देशांनाही तसे आवाहन करीत असताना, भारताचा उल्लेख जाणीवपूर्व टाळण्यात आल्याचे स्पष्टपणे दिसत आहे. याआधी भारत, अमेरिका, जपान व ऑस्ट्रेलिया या देशांच्या क्वाड संघटनेची स्थापना झाली असून ही चीनच्या विरोधातील भक्कम आघाडी असल्याचे दावे केले जात होते.

मात्र अमेरिकेत राष्ट्राध्यक्ष बायडेन सत्तेवर आल्यानंतर, त्यांनी क्वाडचे संघटन केवळ घोषणाबाजीपुरते मर्यादित ठेवले. प्रत्यक्षात अमेरिका, ब्रिटन व ऑस्ट्रेलियाची ऑकस आघाडी सुरू करून बायडेन यांनी क्वाडचे महत्त्व कमी करण्याचा प्रयत्न केला. त्यापाठोपाठ आता क्वाडचेच सहकारी देश असलेल्या ऑस्ट्रेलिया व जपानला भारतापासून वेगळे काढून अमेरिका स्वतंत्र लष्करी आघाडी सुरू करू पाहत आहे. भारताने अमेरिकेच्या मागणीनुसार रशियाच्या विरोधात भूमिका घेण्यास नकार दिल्याने, भारताला चीनविरोधी आघाडीपासून वेगळे काढण्याचा डाव अमेरिकेने आखल्याचे संकेत मिळत आहेत.

English हिंदी

leave a reply