भारताने पुरविलेल्या हेलिकॉप्टरद्वारे हल्ले चढविल्याचा तालिबानचा आरोप

हेलिकॉप्टरद्वारे हल्लेकाबुल – अफगाणी लष्कराने भारताने पुरविलेल्या हेलिकॉप्टरद्वारे हेल्मंडमधील रुग्णालयावर हल्ले चढविल्याचा आरोप तालिबानचा प्रवक्ता झबिहुल्ला मुजाहिदने केला. अफगाण लष्कराचा हा हवाई हल्ला म्हणजे युद्धगुन्हा असल्याची ओरड तालिबानच्या प्रवक्त्याने केली.

हेल्मंड प्रांताची राजधानी लश्करगह येथील रुग्णालयावर अफगाणी लष्कराने चढविलेल्या हवाई हल्ल्यात एकाचा बळी गेला तर तीन जखमी झाले. अफगाणी लष्कराच्या या कारवाईसाठी तालिबानच्या प्रवक्त्याने अप्रत्यक्षरित्या भारताला जबाबदार धरले. या हल्ल्याची माहिती देताना मुजाहिदने भारताने दिलेल्या हेलिकॉप्टरचा जाणीवपूर्वक उल्लेख केला.

तालिबानच्या प्रवक्त्याने केलेला भारताचा हा उल्लेख पाकिस्तानी माध्यमांनी उचलून धरला. भारत अफगाणी लष्कराला तालिबानविरोधी कारवाईसाठी सहाय्य करीत असल्याचा आरोप पाकिस्तानी माध्यमे करीत आहेत. आठवड्यापूर्वीही तालिबानच्या एका ठिकाणावर भारताने दिलेल्या हेलिकॉप्टरचा वापर केला होता, याकडे ही माध्यमे लक्ष वेधत आहेत. त्यामुळे अफगाण सरकारच्या युद्धगुन्ह्यांसाठी भारत देखील जबाबदार असल्याचा दावा पाकिस्तानी पत्रकार करीत आहेत.

पण भारताने 2018 साली अफगाणी लष्करासाठी चार ‘एमआय24’ लढाऊ तर तीन ‘चितल’ हेलिकॉप्टर भेट म्हणून दिले होते. आंतरराष्ट्रीय मान्यता असलेल्या अफगाणिस्तानच्या लोकनियुक्त सरकारला भारताने हे सहाय्य केले होते. त्यावर आक्षेप घेऊन पाकिस्तानची माध्यमे आपले हसे करून घेत आहेत. काही पाकिस्तानी पत्रकारांनी तर तालिबानवर हल्ले चढविणारे वैमानिक देखील भारतीय होते, असा आरोप करीत आहेत.

leave a reply